YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 36

36
1एलीहू पुढे म्हणाला:
2“अजून थोडा वेळ माझ्याशी धीर धरून राहा आणि मी तुला दाखवेन
की परमेश्वराच्या बाजूने मला आणखी पुष्कळ बोलायचे आहे.
3माझे ज्ञान मला फार दुरून मिळते;
माझ्या निर्माणकर्त्याचे न्यायीपण मी वर्णन करून सांगेन.
4ही खात्री करून घे की माझे शब्द खोटे नाहीत;
ज्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे तो तुझ्याबरोबर आहे.
5“परमेश्वर सामर्थ्यवान आहे, परंतु कोणाचा तिरस्कार करीत नाही;
ते बलवान असून त्यांच्या योजनांमध्ये स्थिर आहेत.
6दुष्टांना ते जिवंत ठेवत नाही
परंतु पीडितांना त्यांचे हक्क देतात.
7न्यायी मनुष्यावरून त्यांची नजर सरकत नाही;
राजांबरोबर त्यांना ते राजासनावर बसवितात
आणि सर्वकाळासाठी त्यांना थोर बनवितात.
8परंतु जर लोक साखळ्यांनी बांधलेले आहेत,
आणि दुःखाच्या दोरखंडात जखडलेले आहेत,
9त्यांनी काय केले आहे हे परमेश्वर त्यांना सांगतात—
त्यांनी गर्विष्ठपणात पाप केले आहे.
10ते त्यांना सुधारणा ऐकून घेण्यास भाग पाडतात
आणि त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची आज्ञा करतात.
11जर त्यांनी आज्ञा पाळल्या आणि परमेश्वराची सेवा केली,
तर त्यांच्या आयुष्याचे बाकीचे दिवस ते समृद्धीत घालवतील
आणि संतृप्तीची वर्षे बघतील.
12परंतु जर ते ऐकणार नाहीत,
तर तलवारीने ते नाश होतील
आणि ज्ञाना अभावी मरण पावतील.
13“देवहीन हृदयाचे लोक संताप साठवून ठेवतात;
त्यांना बेड्या बांधल्या, तरी ते मदतीसाठी रडत नाही.
14त्यांच्या भर तारुण्यातच
मंदिरांना जीवन समर्पित असलेल्या पुरुषगामींसह#36:14 मूळ अर्थ मंदिरात लैंगिक व्यवसायात लावलेले ते मरण पावतात.
15परंतु जे क्लेश सहन करतात त्यांना परमेश्वर क्लेशातून मुक्त करतात;
त्यांच्या दुःखात ते त्यांच्याशी बोलतात.
16“दुःखाच्या जाभाड्यातून ते तुला निमंत्रण देतात
आणि विशाल व मर्यादा नसलेल्या ठिकाणी,
तुझ्या आरामदायी मेजावर मिष्टान्नांनी परमेश्वर तुला तृप्त करतात.
17परंतु आता दुष्टांमुळे तुझ्यावर दंड लादला आहे;
शिक्षा आणि न्याय यांनी तुझी पकड घेतली आहे.
18सावध राहा की कोणीही आपल्या श्रीमंतीने तुला भुरळ पाडू नये;
आणि मोठी लाच देऊन तुला कोणी भटकू देऊ नये.
19तुझी श्रीमंती किंवा तुझे शक्तिशाली प्रयत्न
संकटात पडण्यापासून तुला उचलून धरतील काय?
20लोकांना त्यांच्या घरातून ओढून दूर नेण्यासाठी,
रात्रीच्या समयाची इच्छा करू नकोस.
21दुष्टतेकडे तू वळणार नाहीस याची काळजी घे,
कारण असेच दिसते की तू कष्टापेक्षा दुष्टतेची निवड करतोस.
22“परमेश्वर त्यांच्या सामर्थ्यात उंचावलेले आहेत.
त्यांच्यासारखा दुसरा शिक्षक कोण आहे?
23त्यांचे मार्ग त्यांच्यासाठी कोणी विदित केले आहेत,
किंवा, ‘तुम्ही दुष्कृत्य केले आहे’ असे त्यांना कोण म्हणणार?
24ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली,
ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर.
25सर्व मानवजातीने हे पाहिले आहे;
मनुष्य दुरूनच त्याच्याकडे टक लावून पाहतात.
26परमेश्वर किती महान आहे—ते समजणे आमच्या बुद्धीपलीकडे आहे!
त्यांच्या आयुष्याच्या संख्येचे आकलन करता येत नाही.
27“ते पाण्याचे थेंब वर आकर्षून घेतात,
आणि झर्‍यासाठी त्याचे रूपांतर पावसात करतात;
28मेघ आपले दहिवर खाली ओततात
आणि मनुष्यांवर भरपूर वृष्टी होते.
29ढगांना त्यांनी कसे पसरविले आहे,
आपल्या मंडपातून ते कसे गडगडाट करतात हे कोणाला समजते?
30पाहा ते कशाप्रकारे आपल्या सभोवती वीज विखरून ठेवतात,
आणि समुद्राच्या खोलीला झाकून घेतात.
31अशाप्रकारे परमेश्वर राष्ट्रांवर अधिकार#36:31 किंवा पोषण करतात
आणि विपुलतेने अन्न पुरवितात.
32चमकणार्‍या विजेला ते आपल्या हातात भरतात
आणि त्याच्या नेमाने तडाखा करण्यास आज्ञा करतात.
33त्यांचा गडगडाट येणार्‍या वादळाची घोषणा करते;
पशूप्राण्यांना सुद्धा त्यांच्या येण्याचे पूर्वज्ञान होते.

सध्या निवडलेले:

इय्योब 36: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन