इय्योब 39
39
1“रानशेळ्या कधी प्रसवितात हे तू जाणतो काय?
हरिणी आपल्या पाडसाला जन्म देताना तू पाहतो का?
2प्रसवे पर्यंत त्यांचे महिने तू मोजतो काय?
त्यांचा प्रसविण्याचा समय तुला कळतो काय?
3त्या ओणवतात आणि आपल्या पिलांना प्रसवितात;
व त्यांच्या प्रसूती वेदना संपतात.
4त्यांच्या पिल्लांची भरभराट होते व मोकळ्या रानात ते जोमाने वाढतात;
ते सोडून जातात व परत येत नाहीत.
5“रानगाढवांना कोणी मोकळे सोडून दिले?
त्यांचे दोर कोणी सोडले?
6मीच त्यांना रान त्यांचे घर म्हणून दिले आहे,
आणि क्षारभूमी त्यांचे वसतिस्थान म्हणून दिले आहे.
7नगरातील गोंधळाला ते हसतात;
चालकाची ओरड त्याला ऐकू येत नाही.
8टेकड्यांवर कुरणासाठी ते रांगा धरतात
आणि जे काही हिरवेगार ते शोधत असतात.
9“रानबैल तुझी सेवा करण्यासाठी संमती देईल काय?
रात्रीच्या वेळी तो तुझ्या गोठ्यात राहील काय?
10त्याला जुंपणीने बांधून तुला नांगरणी करता येईल काय?
तुझ्यामागे जमिनीची मशागत तो करेल काय?
11त्याच्या मोठ्या बलावर तू अवलंबून राहशील काय?
तुझी जड कामे तू त्याच्यावर सोडशील काय?
12खळ्यातून तुझे धान्य खेचून घेऊन
ते तुझ्या मळणीपर्यंत तो ते आणेल असा तू त्याच्यावर विश्वास ठेवशील काय?
13“जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्याशी
त्यांची तुलना करता येत नाही
तरी शहामृगाचे पंख आनंदाने फडफडतात.
14ती धुळीत आपली अंडी देते
आणि वाळूमध्ये ती उबविते,
15एखाद्याच्या पायाखाली ती चिरडली जातील,
किंवा कोणी वन्यपशू त्याला तुडवतील हे ती लक्षात घेत नाही.
16ती आपल्या पिलांना कठोरतेने वागवते, जसे काय ते तिचे नाहीत;
तिच्या प्रसूती वेदना व्यर्थ गेल्या याचे तिला काहीच वाटत नाही,
17कारण परमेश्वराने तिला ज्ञान बहाल केले नाही
किंवा तिला समजूतदारपणाचा वाटा दिला नाही.
18परंतु जेव्हा ती धावण्यासाठी आपले पंख पसरते,
तेव्हा ती घोडा व त्याच्या स्वाराकडे बघून हसते.
19“घोड्याला त्याचे बळ तू देतोस काय
अथवा त्याच्या मानेवर आयाळ तू पांघरलेस काय?
20टोळाप्रमाणे त्याला तू उड्या मारण्यास लावतोस काय?
जे त्यांच्या गर्विष्ठपणात आतंक व्यक्त करतात?
21ते यांच्या भयंकर पंजाने ओरखडत आपल्या बळात उल्हास करतो,
आणि शत्रूशी सामना करण्यासाठी धावून येतो.
22तो भयास हसतो आणि कशालाही घाबरत नाही;
तलवारीपासून तो मागे हटत नाही.
23त्याच्या पाठीवर असलेला भाता;
व त्याच्याबरोबर ठेवलेला चमकणारा भाला व बरची खणखणत असते.
24तो बेभान आवेशात भूमी गिळंकृत करतो;
रणशिंगाच्या गर्जनेने तो स्तब्ध उभा राहू शकत नाही.
25तुतारीच्या नादाला तो ‘वाह!’ असे ओरडतो,
दुरूनच तो लढाईचा वास घेतो,
मग ती सेनापतीची ओरड असो किंवा रणगर्जना.
26“बहिरी ससाणा उंच उडतो,
आणि आपले पंख दक्षिणेकडे पसरतो, ते तो तुझ्या ज्ञानाने करतो काय?
27तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्या मारत
आणि आपले घरटे उंचावर बांधतात काय?
28तो उंच कडांवर वसतो आणि रात्री तिथेच राहतो;
खडकाळ सुळका त्याचा भक्कम किल्ला आहे.
29तिथूनच तो आपले भक्ष्य शोधतो;
त्याच्या नेत्रास ते दुरूनच दिसते.
30तिची पिल्ले रक्त पिऊन मेजवानी करतात.
आणि जिथे मेलेले असतात, तिथे ती असतात.”
सध्या निवडलेले:
इय्योब 39: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.