YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 23

23
पुढार्‍यांना यहोशुआचा निरोप
1पुष्कळ काळ होऊन गेला होता आणि याहवेहने इस्राएली लोकास सभोवतालच्या सर्व शत्रूपासून विश्रांती दिली, तोपर्यंत यहोशुआ अतिशय वयस्कर झाला होता, 2यहोशुआने सर्व इस्राएली लोकास, त्यांच्या वडीलजनास, पुढार्‍यांना, न्यायाधीशांना आणि अधिकार्‍यांना बोलाविले; आणि त्यांना म्हटले, “मी फार वृद्ध झालो आहे. 3याहवेह, तुमचे परमेश्वरांनी तुमच्यासाठी या सर्व राष्ट्रांचे जे काही केले, ते सर्वकाही तुम्ही स्वतःच पाहिले आहे. ते याहवेहच तुमचे परमेश्वर होते जे तुमच्यासाठी लढले. 4आठवण करा, कशाप्रकारे यार्देनपासून पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत या उर्वरित राष्ट्रांना मी जिंकले व ती तुमच्या गोत्रांना तुमचे वतन म्हणून वाटून दिले. 5याहवेह तुमचे परमेश्वर स्वतः त्यांना तुमच्यासाठी बाहेर हाकलून देतील. तुमच्यासमोर ते त्यांना बाहेर काढतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला अभिवचन दिल्यानुसार तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घ्याल.
6“अत्यंत बलवान व्हा; मोशेच्या नियमशास्त्रात जे सर्व लिहिले आहे, त्याचे काळजीपूर्वक पालन करा, त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका. 7तुमच्यामध्ये जी उर्वरित राष्ट्रे आहेत त्यांच्याशी संगती करू नका; त्यांच्या दैवतांची नावे घेऊ नका किंवा त्यांची शपथही घेऊ नका. तुम्ही त्यांची सेवा करू नये किंवा त्यांना नमन करू नये 8परंतु आतापर्यंत जसे तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वर यांना धरून राहिलात तसेच राहा.
9“याहवेहने तुमच्यापुढून महान आणि शक्तिशाली राष्ट्रे घालवून दिली आहेत, कोणतेही राष्ट्र आजपर्यंत तुमच्यापुढे टिकू शकले नाही. 10तुमच्यातील एकजण हजारांना पळवून लावतो, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे, याहवेह तुमच्यासाठी लढतात, 11म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करण्याबाबत फार सावध असा.
12“परंतु जर तुम्ही मागे फिराल आणि या राष्ट्रांतील उर्वरित जे लोक तुमच्यामध्ये राहतात त्यांच्याबरोबर स्वतःला जोडाल, त्यांच्याबरोबर सोयरीक कराल आणि त्यांची संगत धराल 13तर खचित हे जाणून घ्या की, याहवेह तुमचे परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या समोरून आणखी घालवून देणार नाही. परंतु हा चांगला देश, जो याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिला आहे, त्यातून तुमचा नाश होईपर्यंत, ती राष्ट्रे तुमच्यासाठी पाश व सापळा अशी होतील, तुमच्या पाठीवर चाबूक आणि तुमच्या डोळ्यात काटे असतील.
14“आता मी लवकरच सर्व जग जाते त्या वाटेने जाणार आहे. तुम्हाला तुमच्या सर्व हृदयाने व जिवाने माहीत आहे की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या अभिवचनातील एकही निष्फळ झाले नाही. प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले आहे; एकही निष्फळ झाले नाही. 15तर याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला अभिवचन दिल्याप्रमाणे सर्व चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याच प्रकारे याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला चेतावणी दिल्याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या या चांगल्या देशातून तुमचा समूळ नाश होईपर्यंत प्रत्येक वाईट गोष्ट याहवेह तुमच्यावर आणतील. 16याहवेह तुमच्या परमेश्वरांनी जो करार तुम्हास आज्ञापिला आहे त्याचे जर तुम्ही उल्लंघन केले, आणि जाऊन इतर दैवतांची सेवा केली आणि त्यांना नमन केले, तर याहवेहचा क्रोध तुमच्याविरुद्ध भडकेल आणि या चांगल्या प्रदेशातून जो त्यांनी तुम्हाला दिला आहे त्यातून तुमचा लवकरच नाश होईल.”

सध्या निवडलेले:

यहोशुआ 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन