यहूदा 1
1
1येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा भाऊ यहूदा, याजकडून,
जे पाचारलेले, परमेश्वर पित्याच्या प्रीतिस पात्र आणि येशू ख्रिस्तामध्ये राखलेले आहेत त्यास,
2दया, शांती आणि प्रीती तुम्हाला अधिकाधिक प्राप्त होवो.
परमेश्वरहीन लोकांचे पाप व त्यांचा नाश
3प्रिय बंधुंनो, आपणास समान असलेल्या तारणाबद्दल मी तुम्हाला लिहिण्यास उत्सुक होतो, परंतु मला तुम्हाला लिहिण्याचे आणि विनंती करण्याचे अगत्य वाटले की जो विश्वास परमेश्वराच्या पवित्र लोकांना एकदाचाच सोपवून दिला होता, तो राखण्याविषयी तुम्ही झटावे. 4ज्यांचा दंड फार पूर्वीच लिहून ठेवलेला होता असे काही लोक तुमच्यामध्ये गुपचूप आत घुसले आहेत. हे अनीतिमान लोक, परमेश्वराची कृपा विकृत करून तिला अनैतिकतेचे स्वरूप देतात आणि येशू ख्रिस्त आपला एकच सार्वभौम प्रभुला नाकारतात.
5जरी हे सर्व तुम्हाला अगोदरच माहीत आहे, तरी तुम्हाला आठवण करून देतो की प्रभुने एका वेळी त्यांच्या लोकांचा इजिप्तमधून बचाव केला, परंतु नंतर त्यांच्यावर विश्वास न ठेवणार्यांचा त्यांनी नाश केला. 6आणि ज्या दूतांनी आपल्या अधिकारांचे पद न राखता आपले योग्य स्थान सोडले त्यांना त्याने अंधकारात, अनंतकालिक बंधनात मोठ्या न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे. 7त्याचप्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारची गावे यांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्निची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.
8अगदी त्याचप्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राण्यांची निंदा करतात. 9परंतु प्रमुख देवदूत मीखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरुन सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याची निंदा करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!” 10तरी हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्याची निंदा करतात, आणि ज्या गोष्टी त्यांना अविवेकी प्राण्यांप्रमाणे उपजत स्वभावाने समजतात त्यायोगे ते नाश करून घेतात.
11त्यांना धिक्कार असो! त्यांनी काइनाचा मार्ग स्वीकारला आणि लाभासाठी बलामाच्या अयोग्य मार्गात त्वरेने पदार्पण केले; कोरहाच्या बंडात त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला.
12हे लोक प्रीती भोजनात डाग, लपलेले खडक असून तुमच्याबरोबर जेवतात—स्वतःचे पोट भरणारे मेंढपाळ. ते निर्जल मेघासारखे वार्याने उडून जाणारे; शरद ऋतुत फळ न देणारे, दोनदा मेलेले आणि उपटलेल्या झाडांसारखे आहेत. 13ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे.
14आदामानंतर सातव्या पिढीचा मनुष्य हनोख, याने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली: “पाहा, प्रभू आपल्या हजारो आणि हजारो पवित्र जणांसह येत आहेत 15सर्वांचा न्याय करण्यासाठी, आणि जे सर्व अनीतिमान कृत्ये त्यांनी अनीतिमानामध्ये केली, आणि अनीतिमान पाप्यांनी त्याच्याविरुद्ध जे सर्व विद्रोही शब्द बोलले त्या सर्वांना तो दोषी ठरवेल.” 16हे लोक कुरकुर करणारे आणि दोष शोधणारे, त्यांच्या स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागणारे, स्वतःची घमेंड मारणारे आणि त्यांच्या स्वतःच्या लाभासाठी इतरांची चापलूसी करणारे आहेत.
टिकून राहण्यास आवाहन
17परंतु, प्रिय मित्रांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या प्रेषितांनी तुम्हाला जे पूर्वी सांगितले, त्याची आठवण ठेवा. 18त्यांनी तुम्हाला सांगितले, “शेवटच्या दिवसात निंदा करणारे स्वतःच्या अनीतिमान वासनांच्या मागे लागतील.” 19हे लोक तुमच्यामध्ये फूट पाडणारे, उपजत स्वभावाने वागणारे आणि पवित्र आत्मा नसलेले असे आहेत.
20परंतु तुम्ही, प्रिय मित्रांनो, आपल्या स्वतःला परमपवित्र विश्वासाच्या पायावर बांधा आणि पवित्र आत्म्याद्वारे प्रार्थना करा. 21आपला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्यांच्या कृपेने ज्या अनंतकाळच्या जीवनात नेणार आहे त्याची वाट पाहत असताना आपणास परमेश्वराच्या प्रीतीमध्ये राखा.
22जे संशय धरतात त्यांच्यावर दया करा; 23काहींना अग्नितून ओढून काढा आणि वाचवा; आणि इतरांना भीतिमिश्रीत दया दाखवून देहामुळे डागाळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा.
ईशस्तवन
24आता जो तुम्हाला अडखळण्यापासून राखण्यास आणि त्याच्या गौरवी समक्षतेत दोषरहित आणि अति आनंदात प्रस्तुत करण्यास समर्थ आहे— 25जो आपला तारणारा एकच परमेश्वर आहे त्यांना येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे गौरव, वैभव, राज्य आणि अधिकार, युगारंभापूर्वी पासून आता आणि सदासर्वकाळ असो आमेन.
सध्या निवडलेले:
यहूदा 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.