विलापगीत 4
4
1सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे,
उत्तम सोने निस्तेज झाले आहे!
पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या
कोपऱ्यात विखुरली आहेत.
2सुवर्णतुल्य असलेल्या,
सीयोनाच्या लेकरांना,
आता कुंभाराच्या हातांनी
घडविलेल्या मातीच्या पात्रांप्रमाणे लेखले जात आहे!
3कोल्हीदेखील आपल्या पिलांना
स्तनपान करते,
पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे
निर्दयी झाले आहेत.
4तहानेमुळे शिशूंच्या जिभा
टाळूला चिकटल्या आहेत;
भाकरीसाठी लेकरे याचना करीत आहेत,
पण त्यांना कोणीही देत नाही.
5उत्तम पक्वान्ने खाणारे
आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत.
जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले
आता राखेत लोळत आहेत.
6माझ्या लोकांची शिक्षा
सदोमापेक्षाही घोर झाली आहे,
ज्यांना इतर कोणी मदत करण्याआधी
त्यांचा एका क्षणात नायनाट झाला.
7त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी
आणि दूधापेक्षा अधिक धवल होते,
त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत,
सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती.
8पण आता ते चेहरे काजळीपेक्षा काळेकुट्ट झाले आहेत;
त्यांना वाटेत कोणी ओळखू शकत नाही.
त्यांची कातडी हाडांना चिकटली आहे;
ती काठीसारखी शुष्क झाली आहे.
9उपासमारीने हळूहळू मरण्यापेक्षा
तलवारीने मरणारे फार बरे;
कारण शेतातील उपज नसल्यामुळे
भुकेपायी व्याकूळ होऊन ते क्षय पावतात.
10करुणामयी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने
आपलीच मुले-बाळे शिजविली,
जेव्हा माझ्या लोकांचा नायनाट झाला,
ती त्यांचे अन्न बनली.
11याहवेहने त्यांच्या क्रोधास निर्बंध सोडले आहे;
त्यांचा अत्यंत भयानक क्रोध ओतला गेला आहे.
त्यांनी सीयोनमध्ये अग्नी पेटविला
त्या अग्नीने तिच्या पायांना भस्म करून टाकले आहे.
12यरुशलेमच्या वेशीतून आत
एखादा शत्रू वा विरोधी शिरू शकेल,
यावर संपूर्ण पृथ्वीवरील राजांनी
तसेच जगातील कोणत्याही लोकांनी विश्वास ठेवला नाही.
13तेथील संदेष्ट्यांनी केलेली पापे
आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त
या नगरीत सांडून
याजकांनी केलेला अधर्मामुळे तसे घडले.
14आता तेच लोक आंधळ्यासारखे झोकांड्या
खात चालले आहेत.
ते रक्ताने माखून असे भ्रष्ट झाले आहेत
की त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करण्याचे कोणीही धाडस करीत नाही.
15लोक त्यांच्यावर खेकसतात: “चालते व्हा! तुम्ही अशुद्ध आहात!
दूर! दूर! आम्हाला स्पर्श करू नका!”
जेव्हा ते पलायन करतात आणि तिथे भटकतात,
त्या देशातील लोक म्हणतात,
“ते आता इथे राहू शकत नाहीत.”
16स्वतः याहवेहने त्यांची पांगापांग केली आहे;
ते आता त्यांचा सांभाळ करणार नाहीत.
याजक सन्मानयोग्य राहिले नाहीत,
वडीलजन कृपेयोग्य राहिले नाहीत.
17शिवाय, मदतगार शोधून
आमची दृष्टी मंद झाली आहे;
जे आमच्या मदतीसाठी येणार नाहीत
अशा राष्ट्रांवर आमच्या बुरुजांवरून आम्ही लक्ष ठेवले.
18आम्हाला बाहेर रस्त्यांवर चालता येत नाही,
कारण लोक प्रत्येक पावलावर आमचा पाठलाग करतात.
आमचा अंत जवळ आला आहे, आणि आमचे मोजकेच दिवस राहिले आहेत.
आमचा अंत आलेलाच आहे.
19आमचा पाठलाग करणारे
आकाशातील गरुडांपेक्षा वेगवान आहेत;
ते पर्वतांवरही आम्हाला शोधून काढतात
आणि वाळवंटात आमची वाट पाहत दबा धरून बसलेले असतात.
20याहवेह द्वारा अभिषिक्त, आमच्या जीवनाचा श्वास,
त्यांच्या जाळ्यात अडकला.
आम्ही विचार केला होता की त्यांच्या छत्राखाली
कोणत्याही परकीय राष्ट्रात आम्ही रहिवास करू.
21ऊस प्रांतात राहणार्या एदोम कन्ये,
हर्ष कर व उल्हासित हो.
परंतु तुझ्याकडे देखील तो प्याला आणल्या जाईल;
तू तो पिऊन मदोन्मत्त होऊन पूर्णतः निर्वस्त्र होशील.
22सीयोनकन्ये, तुझी शिक्षा संपेल,
ते तुझा बंदिवास वाढविणार नाहीत.
पण एदोम कन्ये, तुझ्या पापांची ते तुला शिक्षा देतील,
आणि तुझी दुष्टता उघडकीस आणतील.
सध्या निवडलेले:
विलापगीत 4: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.