YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 11

11
शुद्ध व अशुद्ध अन्न
1याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, 2“इस्राएली लोकांना सांग: पृथ्वीवर राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ शकता. 3ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.
4“जे प्राणी फक्त रवंथ करतात किंवा त्यांचे फक्त खूर दुभागलेले आहेत, ते तुम्ही खाऊ नयेत. उंट जरी रवंथ करतात तरी त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत. 5रानससा जरी रवंथ करतो तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. 6ससा जरी रवंथ करतो, तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात; तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. 7डुकरे देखील अशुद्ध आहेत; जरी त्यांचे दुभागलेले खूर आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत. 8त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
9“समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता. 10पण ज्यांना कल्ले व खवले नाहीत—मग ते समुद्रात राहणारे वा इतर जलचर असोत—असे सर्व मासे तुम्हाला निर्विवाद अशुद्ध असून निषिद्ध आहेत. 11तुम्ही ते अशुद्ध समजावे व ते खाऊ नयेत किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्शही करू नये. 12ज्यांना कल्ले व खवले नाहीत असा प्रत्येक जलचर प्राणी तुम्हाला निषिद्ध आहे.
13“जे पक्षी तुम्ही अशुद्ध समजावेत आणि ते तुम्ही खाऊ नयेत कारण ते अशुद्ध आहेत ते हे: गरुड, गिधाड, काळे गिधाड, 14लाल पतंग, कोणत्याही जातीचे काळे पतंग, 15कोणत्याही जातीचे कावळे, 16शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे, 17लहान घुबड, करढोक, मोठे घुबड, 18पांढरे घुबड, वाळवंटी घुबड, कुरर, 19करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.”
20चार पाय असलेले उडणारे कीटक तुम्ही खाऊ नये, ते तुमच्यासाठी अशुद्ध समजले जातात. 21तरीसुद्धा उडणारे कीटक, जे त्यांच्या चारही पायांवर चालतातः जमिनीवर उड्या मारण्याकरिता ज्यांच्या पायांवर एकजोड असतो, ते तुम्ही खाऊ शकता. 22उड्या मारीत चालणारे सर्व जातींचे टोळ, नाकतोडे, खरपुडे व गवतेटोळ तुम्ही खावेत. 23मात्र चार पाय असून जे उडतात ते सर्व कीटक तुम्हाला निषिद्ध आहेत.
24वर उल्लेखलेल्या प्राण्यांमुळे तुम्ही अशुद्ध व्हाल, जो कोणी त्यांच्या मृतशरीराना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. 25जे कोणी त्यांचे मृतदेह उचलतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील.
26ज्या प्राण्यांचे खूर अर्धवट दुभागलेले आहेत किंवा जे प्राणी रवंथ करीत नाहीत, अशा प्राण्यांच्या मृतशरीरांना तुम्ही स्पर्श केलात, तर तुम्ही अशुद्ध व्हाल. 27पंजांवर चालणारा प्रत्येक प्राणी खाण्यास तुम्हाला मनाई आहे. अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 28जो कोणी त्याचे मृतदेह उचलून नेईल त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. तो प्राणी तुम्ही अशुद्ध समजावा.
29जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, सरडे, 30घोरपड, घुशी, पाल, मगर, गोगलगाय व गुहिर्‍या सरडा. 31जमिनीवर सरपटणार्‍यापैकी ही सर्व तुम्हाला निषिद्ध होत; जो कोणी त्यांच्या मृत शरीराला स्पर्श करेल, त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 32त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडले तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; काष्ठपात्रे, वस्त्रे, कातडे, गोणपाट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; नंतर ते शुद्ध होईल. 33त्यापैकी एखादा प्राणी मातीच्या पात्रात पडला, तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे. 34अशाप्रकारे अशुद्ध झालेली वस्तू धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा जर एखाद्या पदार्थाला स्पर्श झाला, तर ते सर्व अशुद्ध समजावे. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध आहे. 35अशा प्राण्यांच्या मृत शरीराचा स्पर्श चुलीला किंवा एखाद्या भांड्याला झाला तर ते अशुद्ध होय. अशा अशुद्ध चुलीचा व भांड्याचा नाश करावा. 36जर एखाद्या प्राण्याचे मृतदेह पाणी असलेल्या एखाद्या झर्‍यात किंवा हौदात पडले, तरी ते पाणी शुद्धच राहते. तरीपण जो त्या मृत शरीराला स्पर्श करेल त्याला अशुद्ध समजावे. 37जर शेतात पेरण्याच्या बियाण्यांना त्यांच्या मृत शरीराचा स्पर्श झाला तर ते शुद्धच राहते; 38पण ओल्या बियाण्यावर मृतदेह पडले तर ते बियाणे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
39तुम्हाला खाण्यास मोकळीक असलेला प्राणी आजारी पडून मेला, तर अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो कोणी स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. 40त्याचप्रमाणे जो कोणी त्या प्राण्याचे मांस खाईल किंवा त्याचे मृतदेह वाहून नेईल, त्याने आपली वस्त्रे धुवावीत; तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
41जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत. ते खाऊ नयेत. 42जे पोटावर सरपटतात, चार पायांवर खुरडत चालतात वा ज्यांना अनेक पाय असतात असे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते अशुद्ध आहेत. 43झुंडीने राहणाऱ्या अशा कोणत्याही प्राण्यांना स्पर्श करून तुम्ही अशुद्ध होऊ नये. त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका. 44मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये. 45मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.
46“पशू, पक्षी, प्रत्येक जलचर आणि प्रत्येक प्राणी जे जमिनीवर सरपटणारे आहेत त्यांच्यासंबंधी हे नियम आहेत. 47शुद्ध व अशुद्ध प्राणी तुम्ही खावे वा खाऊ नये यामधील फरक दाखविण्यासाठी हे नियम आहेत.”

सध्या निवडलेले:

लेवीय 11: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन