YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 13

13
त्वचेच्या रोगासंबंधी नियम
1याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, 2“जेव्हा एखाद्या मनुष्याच्या त्वचेवर सूज, पुरळ किंवा पुटकुळी आली आणि त्यामुळे त्याची त्वचा पांढरी झाली असली, तो कुष्ठरोगाचा चट्टा असेल, त्याला अहरोन याजकाकडे किंवा याजक असलेले त्याचे पुत्र#13:2 किंवा वंशज यापैकी एकाकडे आणावे. 3याजकाने त्या व्यक्तीच्या त्वचेवरील चट्टा तपासावा आणि चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील व तो त्वचेपेक्षा खोल गेलेला असेल, तर हा कुष्ठरोग समजावा; आणि याजकाने त्या व्यक्तीचा तपासणी केल्यावर, त्याला विधिनियमानुसार अशुद्ध म्हणून जाहीर करावे. 4जर त्वचेवरील चट्टा पांढरा असेल, परंतु तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झाले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे. 5सातव्या दिवशी, याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवरील चट्टा अधिक पसरलेला नसेल, तर याजकाने त्याला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. 6सातव्या दिवशी, याजकाने त्याची पुन्हा तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला आहे व तो त्वचेवर पसरला नसेल, तर तो शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे; कारण तो साधारण खवंद होय. त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत आणि पूर्ववत शुद्ध व्हावे. 7परंतु याजकापुढे शुद्ध सिद्ध झाल्यावर, तो चट्टा त्वचेवर पसरू लागला, तर त्या व्यक्तीने स्वतःला पुन्हा याजकासमोर हजर करावे. 8याजकाने त्या व्यक्तीचा तपासणी करावी आणि खवंद त्वचेवर पसरलेला दिसून आल्यास, त्याला अशुद्ध असे जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.
9“एखाद्या मनुष्याला कुष्ठरोग झाला असेल, तर त्याला याजकाकडे न्यावे. 10याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवर पांढरी सूज येऊन आणि तेथील केस पांढरे झाले असतील आणि सूजेवर उघडी जखम आढळल्यास, 11तर हा जुना कुष्ठरोग असून याजकाने त्या व्यक्तीला अशुद्ध म्हणून जाहीर करावे, यापुढे त्याला अधिक तपासणीसाठी वेगळे ठेवू नये; कारण तो अशुद्धच आहे.”
12जर कुष्ठरोग सर्व त्वचेवर पसरलेला असेल आणि याजक जितके पाहू शकतो तितके म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पसरलेला असेल तर, 13याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते कोड संपूर्ण शरीरावर पसरलेले असेल तर त्याने त्याला शुद्ध म्हणून जाहीर करावे. कुष्ठरोगापासून बरा झाला आहे, असे जाहीर करावे; कारण तो संपूर्ण शुभ्र झाला आहे, म्हणजेच तो शुद्ध होय. 14परंतु त्यांच्यावर उघडी जखम आढळल्यास, ते अशुद्ध समजावे. 15याजकाने त्वचेवरील जखम पाहून त्या व्यक्तीला अशुद्ध जाहीर करावे; त्वचा नसलेले मांस अशुद्ध असून ते कुष्ठरोग आहे; हा गंभीर आजार आहे. 16परंतु उघडी जखम फिरून पांढरी पडली तर त्या कुष्ठरोग्याने याजकाकडे यावे. 17याजकाने त्यांना तपासावे, जर तो भाग खरोखर पूर्णपणे पांढरा झालेला असेल, तर तो मनुष्य शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे.
18ज्या माणसाच्या त्वचेवर फोड येऊन पुढे तो फोड बरा झाला 19व फोडाच्या जागी तांबूस पांढरा चट्टा राहिला, तर त्याने याजकाकडे तपासणीसाठी गेले पाहिजे. 20याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर तो चट्टा त्वचेखाली खोलवर गेला असेल आणि त्याच्यावरील केस पांढरे झाले असतील, तर याजकाने त्याला अशुद्ध म्हणून जाहीर करावे; कारण फोडामधून कुष्ठरोग निर्माण झाला आहे. 21पण तपासणीनंतर त्या चट्ट्यामध्ये पांढरे केस नाहीत आणि चट्टा त्वचेत खोल गेला नाही व त्याचा रंग करडा आहे, असे याजकाला दिसून आले असेल, तर याजकाने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे. 22त्या कालावधीत तो चट्टा पसरत गेला आहे असे दिसले, तर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो गंभीर आजार आहे. 23पण पांढरा चट्टा वाढला नाही किंवा पसरला नाही. तर तो केवळ फोडाचा व्रण आहे; म्हणून याजकाने तो मनुष्य शुद्ध आहे असे जाहीर करावे.
24एखादा काही कारणाने भाजला व जळालेली जागा लालसर पांढरी किंवा नुसती पांढरी झाली असे दिसून आले, 25तर याजकाने तो चट्टा अवश्य तपासावा. जर चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील, आणि तो त्वचेपेक्षा खोल गेला आहे असे दिसून आले, तर त्या जळालेल्या भागी कुष्ठरोग फुटला असे समजावे; याजकाने त्यास अशुद्ध जाहीर करावे; तो मनुष्य कुष्ठरोगी आहे. 26पण तपासणीनंतर त्या पांढर्‍या चट्ट्यावरील केस पांढरे झालेले नाहीत, आणि पांढरेपणा त्वचेच्या खोलवर गेलेला नाही व तो हळूहळू कमी होत आहे, असे जर याजकाला दिसून आले, तर याजकाने त्याला सात दिवसापर्यंत वेगळे ठेवावे; 27सातव्या दिवशी याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर चट्टा त्वचेवर पसरत गेला असेल, तर याजकाने त्यास अशुद्ध म्हणून जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे. 28पण पांढरा चट्टा त्वचेवर पांगून परसला नाही आणि तो हळूहळू कमी होत आहे, असे दिसून आले, तर याजकाने त्याला शुद्ध जाहीर करावे; तो जळालेल्या जागेत केवळ व्रण आहे आणि त्याला कुष्ठरोग नाही.
29एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असेल 30तर याजकाने त्याची तपासणी करावी. चट्टा त्वचेखाली खोलवर आहे असे वाटत असेल आणि चट्ट्यावर पिवळे केस सापडले असतील, तर याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे; हा डोक्याचा अथवा हनुवटीचा कुष्ठरोग आहे. 31पण तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नाही आणि त्यामध्ये काळे केस नाहीत, असे याजकाच्या तपासणीत दिसून आले तर याजकाने त्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे. 32सातव्या दिवशी याजकाने तपासणी करावी आणि चट्टा जर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेमध्ये खोलवर गेला नसेल किंवा पिवळसर केस दिसून येत नसतील, 33तर व्रणाभोवतीचे केस काढून टाकावे; व्रणावरचे केस मात्र काढू नयेत. मग याजकाने त्या व्यक्तीला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. 34मग याजकाने सातव्या दिवशी तपासणी करावी, आणि व्रण त्वचेवर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेखाली खोलवर गेला नसेल, तर याजकाने त्या व्यक्तीला शुद्ध म्हणून जाहीर करावे आणि ती व्यक्ती कपडे धुतल्यानंतर शुद्ध व्हावी. 35पण तो शुद्ध जाहीर केल्यानंतर तो चट्टा पसरू लागला, 36तर याजकाने तपासणी करावी आणि चट्ट्याभोवतालचे केस पिवळे होतात की नाही याची वाट न पाहता, ती व्यक्ती अशुद्ध असे जाहीर करावे. 37पण चट्टा पसरण्याची क्रिया थांबली असून तिच्यावर काळे केस सापडले, तर ती व्यक्ती बरी झाली असून शुद्ध आहे आणि याजकाने त्याला शुद्ध असे जाहीर करावे.
38एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या त्वचेवर पांढरे चट्टे असतील, 39तर याजक तपासणी करेल आणि त्वचेवरील चट्ट्याचा रंग पांढरट असेल, तर इसब हा चर्मरोग झाला आहे, असे जाहीर करेल; ती व्यक्ती शुद्ध आहे.
40कोणा माणसाच्या डोक्यावरील केस गळून टक्कल झाले असेल तर तो शुद्ध आहे. 41जर त्याच्या मस्तकाच्या पुढच्या भागावरील केस गळून पडले असतील, तर ते केवळ साधे टक्कल आहे, तो शुद्ध होय. 42तरी टक्कलावर तांबूस पांढरा डाग असेल तर तो त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग असण्याचा संभव आहे. 43याबाबतीत याजक त्याची तपासणी करेल आणि डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर अंगावरील त्वचेवर कुष्ठरोगासारखा दिसणारा तांबूस पांढरा चट्टा असेल, 44तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर पडलेला चट्टा कुष्ठरोगाचा आहे; ती व्यक्ती अशुद्ध आहे; याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे.
45असा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने फाटलेले कपडे घालावेत, त्यांच्या केसात फणी न फिरविता ते तसेच वाढू द्यावेत; त्यांनी तोंडाखालील भाग झाकून घ्यावा आणि अशुद्ध! अशुद्ध! असे ओरडावे. 46जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे.
वस्त्रावरील कुष्ठरोग
47एखाद्या लोकरीच्या वा तागमिश्रित सुताच्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला रोगाचा संसर्ग झाला आहे, 48सुताच्या, लोकरीच्या ताण्याने विणलेले वस्त्र वा तागमिश्रित चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोग झाला आहे, असा संशय आला 49आणि जर ते चामड्याच्या, विणलेल्या वस्त्रावर, अथवा चामड्याच्या वस्तूवर हिरवट किंवा तांबूस चट्टा असला, तर तो कुष्ठरोगच आहे, म्हणून तपासणीसाठी ती वस्तू याजकाकडे अवश्य घेऊन जावी. 50-51याजक ती वस्तू सात दिवसापर्यंत वेगळी ठेवील व सातव्या दिवशी त्या चट्ट्याची पुन्हा तपासणी करेल. तो चट्टा पसरला असेल, तर त्या विणलेल्या किंवा चामड्याच्या वस्त्राला वा वस्तूला संसर्गजन्य कुष्ठरोग झाला आहे असे समजावे; ती वस्तू अशुद्ध होय. 52तेव्हा याजकाने ती वस्त्रे, ते कापड किंवा ती विणलेली लोकरीची वा चामड्याची वस्तू संसर्गजन्य आहे असे म्हणून अग्नीत जाळून टाकावी.
53-54पण सातव्या दिवशी ते विणलेले वस्त्र किंवा चामड्याची वस्तू तपासली असता तो चट्टा पसरला नाही, असे याजकाला दिसून आले, तर त्याने कुष्ठरोगाची शंका असलेली वस्तू धुऊन टाकण्याचा आदेश द्यावा व नंतर आणखी सात दिवस ती वेगळी ठेवावी. 55मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो पसरला नाही. तरी तो अशुद्ध आहे असे समजावे; ती वस्तू जाळून टाकावी कारण तिला आतून, बाहेरून, सगळीकडून कुष्ठरोगाचा संसर्ग पोहोचला आहे असे समजावे.
56पण धुतल्यानंतर चट्ट्याचा रंग फिकट झाला आहे, असे याजकाला दिसून आले, तर त्याने चट्टा असलेल्या विणलेल्या कापडाच्या वा चामड्याच्या वस्तूचा तेवढाच भाग कापून टाकावा. 57इतके करूनही जर तो चट्टा या विणलेल्या वस्त्रावर किंवा चामड्याच्या वस्तूवर पुन्हा फुलून निघाला, तर याजकाने ती वस्तू अवश्य जाळून टाकावी, कारण तिला कुष्ठरोग आहे. 58पण ती विणलेल्या कापडाची किंवा चामड्याची वस्तू धुतल्यानंतर तिच्यावरील चट्टा नाहीसा झाला, तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी, म्हणजे ती शुद्ध होईल.
59लोकरीच्या व तागमिश्रित सुताच्या विणलेल्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला, चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहे.

सध्या निवडलेले:

लेवीय 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन