16
प्रायश्चित्ताचा दिवस
1अहरोनाचे दोन पुत्र याहवेहच्या समक्षतेत गेल्यामुळे मरण पावल्यानंतर याहवेह मोशेबरोबर बोलले. 2याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण#16:2 म्हणजे दयासन असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.
3“अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा. 4त्याने तागाचा पवित्र झगा घातला पाहिजे आणि त्याच्या शरीराभोवती तागाचे अंतर्वस्त्र घालावे; तागाच्या वस्त्राने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा. ही पवित्र वस्त्रे आहेत; म्हणून ती अंगावर घालण्यापूर्वी त्याने पाण्याने स्नान करावे. 5मग इस्राएली समुदायाकडून पापार्पणासाठी दोन बोकडे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.
6“अहरोनाने स्वतःच्या पापार्पणाचा गोर्हा परमेश्वराला पहिल्याने अर्पण करून स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी प्रायश्चित्त करावे. 7मग त्याने सभामंडपाच्या दाराशी याहवेहपुढे ती दोन बोकडे आणावी. 8दोन बोकडांवर अहरोनाने चिठ्ठ्या टाकाव्या—याहवेहसाठी एक बोकड आणि पाप वाहून नेण्यासाठी दुसरा बोकड. 9नंतर याहवेहसाठी चिठ्ठी पडलेल्या बोकडाला अहरोनाने घेऊन यावे आणि पापार्पणाचा बळी म्हणून त्याचा यज्ञ करावा. 10परंतु चिठ्ठी टाकून जो दुसरा बोकड आला तो पाप वाहून नेण्यासाठीचा बोकड जिवंत ठेवून याहवेहसमोर आणावा आणि त्याच्यावर प्रायश्चित्ताचा विधी करून, पाप वाहून नेण्यासाठी तो रानात सोडून द्यावा.
11“अहरोनाने स्वतःसाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी पापार्पणाच्या गोर्ह्याचा वध करून प्रायश्चित्त करावे. 12याहवेहच्या वेदीसमोरील धुपाटण्यात जळते निखारे भरून घ्यावेत व कुटून बारीक केलेला व दोन मुठीत भरेल एवढा सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा. 13तो धूप त्याने याहवेहसमोर निखार्यांवर असा टाकावा की, धूपाच्या धुराने दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवलेला कोश व त्यावरील दयासन व्यापून जाईल; म्हणजे तो मरणार नाही. 14मग त्याने गोर्ह्याचे काही रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी दयासनाच्या पूर्वेस शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर सात वेळा शिंपडावे.
15“नंतर त्याने बाहेर जाऊन लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बोकडाचा वध करावा; बोकडाचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि गोर्ह्याचे रक्त त्याने ज्या ठिकाणी शिंपडले, त्याच ठिकाणी म्हणजे दयासनावर व दयासनासमोर ते शिंपडावे. 16कारण इस्राएली लोकांची अशुद्धता आणि बंडखोरी, त्यांची पापे कोणतीही असोत, अशाप्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित्त करावे. त्याचप्रमाणे त्याने सभामंडपासाठीही असेच करावे, कारण तो त्यांच्यामध्ये उभारला असून त्यांच्या अशुद्धतेने वेढला गेला आहे. 17अहरोन प्रायश्चित्त करण्यासाठी परमपवित्रस्थानात जाईल, तेव्हापासून तो परत येईपर्यंत, तो स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबीयांसाठी व सर्व इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित्त करेपर्यंत कोणीही सभामंडपात जाऊ नये.
18“मग त्याने तिथून निघून याहवेहसमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याने गोर्ह्याचे व बोकडाचे रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे. 19काही रक्त घेऊन वेदीवर आपल्या बोटांनी सात वेळा शिंपडावे. अशाप्रकारे इस्राएलांच्या अशुद्धतेपासून वेदी शुद्ध व पवित्र करावी.
20“परमपवित्रस्थान, सभामंडप व वेदी यांच्यासाठी प्रायश्चित्तविधी पूर्ण केल्यानंतर अहरोनाने जिवंत बोकड आणावा. 21मग अहरोन आपले दोन्ही हात बोकडाच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांचे सर्व अन्याय, बंडखोरी—त्यांची सर्व पापे—त्या बोकडाच्या मस्तकावर ठेवावी व नेमलेल्या माणसाद्वारे त्या बोकडाला रानात पाठवून द्यावे. 22जिथे कोणी राहत नाही अशा प्रदेशात तो बोकड लोकांच्या पापाचा भार वाहून नेईल, नंतर त्या मनुष्याने त्या बोकडाला रानात सोडून द्यावे.
23“मग अहरोनाने सभामंडपात पुन्हा यावे व परमपवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागमिश्रित वस्त्रे काढावीत आणि तिथेच ठेवावीत. 24नंतर त्याने पवित्रस्थानी पाण्याने स्नान करावे, आपली नियमित वस्त्रे घालावी. मग त्याने बाहेर यावे व स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्ताचे होमार्पण करावे म्हणून स्वतःसाठी होमार्पण व लोकांसाठीही होमार्पण करावे. 25त्याने पापार्पणासाठी ठेवलेल्या चरबीचा वेदीवर होम करावा.
26“ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बोकड अरण्यात सोडून दिला, त्याने आपली वस्त्रे धुवावी, पाण्याने स्नान करावे आणि त्यानंतर छावणीत परत यावे. 27पापार्पणाच्या ज्या गोर्ह्याचे व बोकडाचे रक्त अहरोनाने प्रायश्चित्तासाठी पवित्रस्थानात नेले होते, त्यांचे मृतदेह, कातडी व आतडी छावणीबाहेर नेऊन अग्नीने जाळण्यात यावीत.” 28ज्या मनुष्याने ते जाळून टाकले, त्याने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे; त्यानंतर छावणीत परत यावे.
29तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये 30कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल. 31तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय. 32अभिषिक्त म्हणून आपल्या वडिलांच्या नंतर नियुक्त केलेल्या याजकाने प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र तागाची वस्त्रे घालावीत 33त्याने परमपवित्रस्थान, सभामंडप, वेदी, याजकवर्ग व इस्राएली लोक यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे.
34“तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.”
याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले.