17
रक्त खाण्यास मनाई आहे
1याहवेह मोशेला म्हणाले, 2“अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांसाठी याहवेहने ज्या आज्ञा दिल्या त्या या आहेत: 3इस्राएलाच्या घराण्यातील कोणत्याही मनुष्याने बैल, कोकरू किंवा शेळी यांचा छावणीत किंवा छावणीबाहेर वध केला, 4परंतु याहवेहच्या निवासमंडपासमोर आणि तो प्राणी सभामंडपाच्या दाराशी याहवेहला अर्पण करण्याकरिता आणला नाही, तर त्या मनुष्याला रक्तपाताचा दोष लागेल; त्याने रक्त सांडले आहे, म्हणून त्याला आपल्या लोकातून बहिष्कृत करावे. 5या आज्ञेचा उद्देश असा आहे की, इस्राएली लोक जे उघड्या मैदानात यज्ञपशू मारीत होते, ते त्यांनी सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे याहवेहपुढे आणावे आणि शांत्यर्पणाचे यज्ञ म्हणून याहवेहला अर्पण करावे. 6याजकाने सभामंडपाच्या दाराशी असलेल्या याहवेहच्या वेदीवर रक्त शिंपडून याहवेहला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा. 7यापुढे ज्यांच्याबरोबर ते स्वतःच व्यभिचार करतात, त्या बोकडाच्या मूर्तींना#17:7 किंवा अशुद्ध आत्म्यांना, त्यांचे कोणतेही अर्पण करू नये. हा नियम त्यांच्यासाठी आणि येणार्या पिढ्यांसाठी लागू आहे.”
8तू त्यांना सांग: इस्राएली किंवा तुमच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी यांनी होमार्पण किंवा यज्ञार्पण केले, 9आणि याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी तो प्राणी अर्पण करण्यास आणला नाही, तर त्याला आपल्या लोकांमधून बहिष्कृत करावे.
10इस्राएलांच्या घराण्यातील कोणीही किंवा त्यांच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी, जो रक्त खातो त्या माणसाविरुद्ध मी माझे मुख फिरवेन आणि मी त्यांना लोकांमधून बहिष्कृत करेन. 11कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर शिंपडण्यासाठी ते दिले आहे; रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते. 12म्हणून मी इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुमच्यामधील कोणीही किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी यापैकी कोणीही रक्ताचे सेवन करू नये.”
13“ ‘इस्राएली किंवा तुमच्यामध्ये असलेला कोणीही विदेशी शिकारीला गेला असता, त्याने खाण्यास योग्य असलेला पशू किंवा पक्षी यांची शिकार केली, तर त्याचे रक्त जमिनीवरच ओतून मातीने झाकून टाकावे, 14कारण रक्त हे प्रत्येक प्राण्याचे जीवन आहे. म्हणून इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुम्ही कोणत्याही प्राण्याचे रक्त खाऊ नका, कारण प्रत्येक प्राण्याचे जीवन हे त्याचे रक्त आहे; जो कोणी रक्ताचे सेवन करेल त्याला बहिष्कृत केलेच पाहिजे.”
15“ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल. 16पण जर त्याने आपली वस्त्रे धुतली नाहीत व स्नान केले नाही, तर तो दोषीच राहील.’ ”