लेवीय 19
19
वैयक्तिक आचरणासंबंधीचे नियम
1याहवेह मोशेला म्हणाले, 2“सर्व इस्राएली लोकांस सांग: ‘तुम्ही पवित्र असावे, कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, पवित्र आहे.
3“ ‘तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
4“ ‘मूर्तीकडे वळू नका आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
5“ ‘जेव्हा तुम्ही याहवेहला शांत्यर्पणे करता, तेव्हा ती अशा प्रकारे अर्पण करा की तुमच्यावतीने मान्य करण्यात येतील. 6तुम्ही अर्पिलेला यज्ञपशू त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी खावा; पण तिसर्या दिवशी उरलेले जाळूनच टाकले पाहिजे. 7जर कोणी तिसर्या दिवशी त्यातील काही खाल्ले तर ते अशुद्ध आहे आणि ते स्वीकारले जाणार नाही. 8जो कोणी ते खाईल तो दोषी ठरेल, कारण ज्यागोष्टी याहवेहला पवित्र आहेत, त्याला त्यांनी अपवित्र केले आहे. अशा व्यक्तीला त्यांच्या लोकांमधून बहिष्कृत करावे.
9“ ‘तुम्ही पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्यातील पिकांची कापणी करू नये आणि शेतात हंगामानंतर राहिलेला सरवा गोळा करू नये. 10तुमच्या द्राक्षमळ्यावर दुसर्यांदा जाऊ नका अथवा पडलेली द्राक्षे गोळा करू नका. गोरगरिबांसाठी आणि परदेशीयांसाठी ती तिथेच राहू द्यावी. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
11“ ‘तुम्ही चोरी करू नये.
“ ‘खोटे बोलू नये.
“ ‘एकमेकांना फसवू नये.
12“ ‘तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहू नये आणि तुमच्या परमेश्वराचे नाव अपवित्र करू नये. मी याहवेह आहे.
13“ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्याला लुबाडू नये.
“ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.
14“ ‘तुम्ही बहिर्यांना शाप देऊ नये किंवा आंधळ्याच्या समोर अडखळण ठेवू नये, परंतु तुमच्या परमेश्वराची भीती बाळगावी. मी याहवेह आहे.
15“ ‘न्याय देताना अन्याय करू नका; तुम्ही गरिबांमध्ये भेदभाव करू नये, उच्च लोकांच्या आदराचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ नये, तर तुम्ही तुमच्या शेजार्याचा योग्य न्याय करावा.
16“ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये.
“ ‘तुमच्या शेजार्याचा जीव धोक्यात येईल असे काहीही करू नका. मी याहवेह आहे.
17“ ‘तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली मनुष्याचा तुमच्या अंतःकरणात द्वेष करू नये. तुमच्या शेजार्याला उघडपणे ताकीद द्यावी म्हणजे तुम्ही त्यांच्या पापाचे सहभागी होणार नाही.
18“ ‘सूड उगवू नका किंवा तुमच्या लोकांमध्ये कोणाचाही द्वेष करू नका, तर जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करावी. मी याहवेह आहे.
19“ ‘माझ्या आज्ञा पाळा.
“ ‘तुम्ही आपल्या पशूंना भिन्न जातीच्या जनावरांशी संग करू देऊ नये.
“ ‘तुमच्या शेतात दोन प्रकारच्या बियांची पेरणी करू नका.
“ ‘दोन प्रकारच्या कापडांपासून विणलेली वस्त्रे वापरू नयेत.
20“ ‘एखादा मनुष्य एखाद्या गुलाम स्त्रीसोबत झोपेल जी एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, परंतु ज्याला खंडणी दिली गेली नाही किंवा तिला स्वातंत्र्य दिले गेले नाही, तर त्याला योग्य शिक्षा#19:20 किंवा चौकशी झाली पाहिजे. तरीही त्यांना मृत्युदंड दिला जाऊ नये, कारण तिला मुक्त केले गेले नाही. 21त्या मनुष्याने याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा आणलाच पाहिजे. 22त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मेंढ्याद्वारे याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.
23“ ‘तुम्ही आपल्या देशात प्रवेश कराल व तिथे सर्व प्रकारची फळझाडे लावाल. तेव्हा पहिली तीन वर्षे त्या झाडांची फळे खाऊ नका, कारण ती बेसुंती समजावी व तुम्हाला निषिद्ध आहेत, 24चौथ्या वर्षी त्याची सर्व फळे पवित्र होतील, याहवेहच्या स्तुतीप्रीत्यर्थ ते द्यावे. 25परंतु पाचव्या वर्षी ती फळे तुम्ही खावी. अशा प्रकारे तुमचे पीक वाढेल. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
26“ ‘तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नये.
“ ‘तुम्ही जादूटोणा करू नये किंवा शकुन पाहू नये.
27“ ‘तुम्ही आपले केस कापतांना बाजूचे केस कापून गोलाकार देऊ नये किंवा आपल्या दाढीचे टोक कापू नये.
28“ ‘मृत्यू पावलेल्यासाठी तुम्ही आपल्या शरीरावर जखमा करून घेऊ नये किंवा शरीर गोंदून घेऊ नये. मी याहवेह आहे.
29“ ‘तुम्ही आपल्या कन्यांना वेश्याकर्माला लावून त्यांना भ्रष्ट करू नये, नाहीतर देश व्यभिचारी होऊन दुष्टाईने भरून जाईल.
30“ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा; मी याहवेह आहे.
31“ ‘तुम्ही शकुनविद्या, ज्योतिष किंवा चेटक्यांची सल्लामसलत घेऊन स्वतःला भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
32“ ‘परमेश्वराची भीती बाळगून आपल्यापेक्षा वडील माणसांपुढे उभे राहून त्यांना मान द्या. त्यांना आदर दाखवा, मी याहवेह आहे.
33“ ‘तुम्ही तुमच्या देशात असलेल्या परदेश्यांचा गैरफायदा घेऊ नये. त्यांच्याशी वाईट वागू नये. 34जे परदेशी तुमच्यामध्ये राहत आहेत ते तुमच्या स्वदेशीय सारखेच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना वागवावे. जशी स्वतःवर तशी त्यांच्यावर प्रीती करावी, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी होता. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
35“ ‘लांबी, वजन किंवा प्रमाण मापण्यात अप्रामाणिक मापे वापरू नका. 36तोलण्यात खरे तराजू आणि वजन उपयोगात आणावे आणि मापण्यात तुम्ही खरे एफा#19:36 एफा हे घन पदार्थाचे माप होते ज्याची क्षमता अंदाजे 22लीटर होती. आणि हीन#19:36 हीन हे द्रव पदार्थाचे माप होते ज्याची क्षमता अंदाजे 3.8 लीटर होती. उपयोगात आणावे; कारण ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले तो याहवेह मी तुमचा परमेश्वर आहे.
37“ ‘माझे सर्व विधी आणि माझे सर्व नियम याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्यांचे पालन करावे. मी याहवेह आहे.’ ”
सध्या निवडलेले:
लेवीय 19: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.