लेवीय 23
23
नेमून दिलेले सण
1याहवेह मोशेला म्हणाले, 2“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘हे मी नेमून दिलेले सण आहेत, याहवेहचे नेमून दिलेले सण, जे तुम्ही पवित्र मेळावे असे जाहीर करावे.
शब्बाथ
3“ ‘आठवड्यातील सहा दिवस त्यांनी कामकाज करावे, परंतु सातवा दिवस हा शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे. पवित्र मेळाव्याचा दिवस. तुम्ही कोणतेही काम करू नये; तुम्ही कुठेही राहत असाल तरी याहवेहसाठी हा शब्बाथ आहे.
वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण
4“ ‘याहवेहने नेमून दिलेले हे पवित्र सण आहेत, पवित्र मेळाव्यांची घोषणा तुम्ही त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळांमध्ये करावी: 5याहवेहच्या वल्हांडण सणाची सुरुवात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून होते. 6त्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी याहवेहचा बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; सात दिवस खमीर नसलेली भाकर खावी. 7पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतीही नियमित कामे करू नये. 8सात दिवस याहवेहसाठी अन्नार्पण द्यावे. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.’ ”
प्रथम फळांचा सण
9याहवेह मोशेला म्हणाले, 10“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी जो देश तुम्हाला देणार आहे, जेव्हा तुम्ही तिथे प्रवेश कराल आणि पिकांची कापणी कराल, तेव्हा तुम्ही कापणी केलेल्या पहिल्या धान्याची एक पेंढी याजकाकडे आणावी. 11त्याने याहवेहसमोर पेंढी ओवाळावी, जेणेकरून ते तुमच्यावतीने मान्य केले जाईल; शब्बाथाच्या दुसर्या दिवशी याजकाने ते ओवाळावे. 12आता ज्या दिवशी तुम्ही पेंढी ओवाळाल, त्याच दिवशी तुम्ही याहवेहला एक वर्षाच्या निर्दोष कोकर्याचे होमार्पण करावे. 13त्याच्या धान्यासोबत, जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग जैतुनाच्या तेलात मळून अर्पावा; हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. त्यासोबत पावशेर हीन#23:13 अंदाजे 1लीटर द्राक्षारसही याहवेहला अर्पण करावा. 14तुम्ही आपल्या परमेश्वराला हे सर्व अर्पण आणल्याशिवाय पिकातील कोणताही भाग म्हणजे कोवळी कणसे, त्या धान्याच्या भाकरी किंवा भाजलेले दाणे यापैकी काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहिले तरी येणार्या पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.
आठवड्यांचा सण
15“ ‘शब्बाथाच्या दुसर्या दिवशी, तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुढे पूर्ण सात आठवडे मोजावे. 16पन्नासाव्या दिवशी म्हणजे सात शब्बाथ संपल्यानंतर दुसर्या दिवशी याहवेहला पुन्हा एकदा नवे अन्नार्पण करावे. 17तुम्ही कुठेही राहत असाल तरी अर्पण म्हणून दोन भाकरी आणाव्यात. एका एफाच्या दहा भागातील दोन भाग#23:17 अंदाजे दोन कि.ग्रॅ. सपिठाच्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात, पहिल्या उत्पन्नातून ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी असे अर्पण आणावे. 18या भाकरीबरोबर तुम्ही एक वर्षाची सात निर्दोष नरकोकरे, एक गोर्हा व दोन मेंढे अर्पावे, ते पेयार्पण व अन्नार्पणासह याहवेहला एक होमार्पण असतील, याहवेहला प्रसन्न करणारा एक सुगंध होमार्पण. 19मग याजकाने पापार्पणासाठी एक बोकड व शांत्यर्पणासाठी एक वर्षांचे दोन मेंढे अर्पण करावे. 20याजक ती प्रथम उपजाची भाकर घेऊन तिला ओवाळणी देईल व दोन मेंढ्यांबरोबर ती याहवेहला अर्पण करेल. हे सर्व याहवेहसाठी पवित्र ठरेल व ते याजकासाठी भाग म्हणून असेल. 21त्याच दिवशी तुम्ही एक पवित्र सभा भरवा आणि नियमित कामे करू नका. तुम्ही कुठेही राहिले तरी तुमच्या सर्व भावी पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.
22“ ‘तुम्ही आपल्या जमिनीतील पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्यातील पिकांची कापणी करू नये किंवा खाली पडलेले धान्य गोळा करू नये. हे गरिबांसाठी व तुम्हामध्ये राहणार्या परदेशीयांसाठी ते तसेच राहू द्यावे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
कर्णे वाजविण्याचा सण
23याहवेह मोशेला म्हणाले, 24“इस्राएली लोकास सांग: ‘सातव्या महिन्याचा पहिला दिवस तुम्ही शब्बाथ विश्रांतीसाठी ठेवावा, या दिवशी पवित्र मेळावा करून स्मृतिदिन म्हणून कर्णे फुंकावेत. 25या दिवशी कोणतीही कष्टाची कामे करू नये, परंतु याहवेहला अन्नार्पण म्हणून हवन करावे.’ ”
प्रायश्चित्ताचा दिवस
26नंतर याहवेह मोशेला म्हणाले, 27“सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार#23:27 किंवा उपवास करणे करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे. 28या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल. 29जे कोणी स्वतःचा नकार करणार नाहीत, त्यांचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल. 30जो कोणी त्या दिवशी कोणतेही काम करेल त्याचा मी त्यांच्या लोकांमधून नाश करेन. 31कोणीही या दिवशी कोणतेही कामकाज करू नये, तुम्ही कुठेही राहाल, इस्राएलाच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे. 32तो दिवस तुमच्यासाठी शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे. महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळपासून पुढील संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचा शब्बाथ पाळावा.”
मंडपांचा सण
33याहवेह मोशेला म्हणाले, 34“इस्राएली लोकांना सांग: ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून याहवेहकरिता मंडपाचा सण सात दिवस पाळावा. 35पहिला दिवस हा पवित्र मेळावा आहे. कोणतेही नियमित काम या दिवशी करू नये. 36सात दिवस याहवेहला अन्नार्पण करा आणि आठव्या दिवशी पवित्र मेळावा भरवून याहवेहला अन्नार्पण करा. हा मेळाव्याचा समारोप आहे; कोणतेही नियमित काम करू नका.
37(“ ‘हे याहवेहने स्थापित केलेले सण आहेत, जे तुम्ही याहवेहला अन्नार्पण करण्यासाठी पवित्र मेळावे घोषित करावे; होमार्पण, धान्यार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण आवश्यक त्या दिवशी अर्पणे करावी. 38ही अर्पणे याहवेहच्या शब्बाथांच्या व्यतिरिक्त आहेत आणि हे यज्ञ तुम्ही परमेश्वराला अर्पण करता त्या तुमच्या देणग्या आणि नवस फेडावयाची अर्पणे आणि स्वैच्छिक अर्पणे त्या व्यतिरिक्त आहेत.)
39“ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जेव्हा तुम्ही जमिनीचे पीक गोळा कराल, तेव्हा सात दिवस याहवेहपुढे सण पाळावा. पहिला दिवस हा शब्बाथ, विश्रामदिन आणि आठवा दिवसही शब्बाथाचा विश्रामदिन असेल. 40पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा. 41हा सात दिवसांचा वार्षिक सण तुम्ही याहवेहसाठी प्रत्येक वर्षी पाळावा. हा सर्वकाळचा नियम येणार्या पिढ्यांसाठी आहे; सातव्या महिन्यात हा सण साजरा करावा. 42या सात दिवसात इस्राएली वंशातील सर्वांनी डहाळ्याच्या मंडपात राहावे 43यासाठी की, तुमच्या भावी पिढीला हे कळावे की, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्याला इजिप्तमधून बाहेर काढले तेव्हा मी त्यांना मंडपात राहायला लावले. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
44अशाप्रकारे याहवेहनी नेमून दिलेले हे वार्षिक सण मोशेने इस्राएली लोकांना जाहीर केले.
सध्या निवडलेले:
लेवीय 23: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.