24
जैतून तेल आणि भाकर याहवेहपुढे ठेवणे
1याहवेह मोशेला म्हणाले, 2“इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे. 3सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात, त्याच्याबाहेर अहरोनाने संध्याकाळपासून सकाळपर्यंत याहवेहसमोर दिवे सतत पेटत ठेवावेत, हा नियम पिढ्यान् पिढ्या असावा. 4याहवेहसमोर असलेल्या शुद्ध सोन्याच्या दीपस्तंभावरील दिव्यांची नियमितपणे व्यवस्था करावी.
5“सपीठ घ्यावे आणि त्याच्या बारा भाकरी तयार कराव्या, प्रत्येक भाकरीसाठी दोन दशांश एफा#24:5 अंदाजे 3.2 कि.ग्रॅ. वापरावा. 6त्यांच्या दोन रांगा आणि प्रत्येक रांगेत सहा भाकरी शुद्ध सोन्याच्या मेजावर मांडून याहवेहसमोर ठेवाव्यात. 7प्रत्येक रांगेभोवती स्मरणभाग म्हणून शुद्ध धूप टाकावा, याचे प्रतीक म्हणून भाकर आणि अन्नार्पण हे याहवेहसाठी अर्पण करावी. 8ही भाकर याहवेहसमोर नियमितपणे मांडून ठेवावी, शब्बाथानंतर शब्बाथ, इस्राएली लोकांसाठी हा शाश्वत करार आहे. 9या भाकरी अहरोन व त्याच्या पुत्रांचा वाटा होय, ज्या त्यांनी पवित्रस्थानात बसून खाव्यात; कारण याहवेहला अर्पण केल्या जाणार्या यज्ञातील हा परमपवित्र भाग आहे. त्याचा त्यावर कायमचा अधिकार आहे.”
ईशनिंदा करणार्याला मृत्युदंड
10एकदा एका इस्राएली स्त्रीचा मुलगा, ज्याचे वडील इजिप्तचे होते, इस्राएली छावणीत गेला. तिथे छावणीत त्याचे आणि एका इस्राएली मनुष्याचे भांडण झाले. 11इस्राएली स्त्रीच्या मुलाने परमेश्वराच्या नावाची निंदा केली आणि तो शिव्याशाप देऊ लागला; तेव्हा त्याला मोशेकडे आणले. (त्याच्या आईचे नाव शेलोमीथ होते, ती दान वंशातील दिब्रीची कन्या होती.) 12तेव्हा याहवेहची इच्छा त्यांना स्पष्ट समजून येईपर्यंत त्यांनी त्याला अटकेत ठेवले.
13मग याहवेहनी मोशेला सांगितले: 14“परमेश्वराच्या नावाची निंदा करणार्याला छावणीच्या बाहेर घेऊन जा. ज्यांनी हे बोलताना ऐकले आहे, त्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. 15इस्राएली लोकांना सांग: ‘जो कोणी आपल्या परमेश्वराला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी; 16याहवेहच्या नावाची जो कोणी निंदा करेल त्याला निश्चित जिवे मारावे. संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. परदेशीय असो किंवा देशात जन्मलेला, जेव्हा ते परमेश्वराच्या नावाची निंदा करतात त्यांना निश्चित जिवे मारावे.
17“ ‘जो कोणी एखाद्या मनुष्याचा जीव घेईल त्याला निश्चित जिवे मारावे. 18जो कोणी एखाद्या मनुष्याच्या प्राण्याची हत्या करतो, तर त्याने निश्चित त्याची परतफेड करावी—जीवनासाठी जीवन. 19जो कोणी आपल्या शेजार्याला दुखापत करतो, त्याला त्याच प्रकारे दुखापत केली पाहिजे: 20हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. ज्याप्रमाणे त्याने एखाद्या व्यक्तीला दुखापत केली आहे, त्यालाही निश्चित तीच दुखापत झाली पाहिजे. 21जो कोणी प्राण्याची हत्या करतो, त्याने निश्चित त्याची परतफेड करावी, परंतु जो कोणी मनुष्याची हत्या करतो त्याला जिवे मारावे. 22परदेशीय किंवा देशात जन्मलेल्यासाठी सारखाच नियम असावा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
23मग मोशे इस्राएली लोकांसोबत बोलला आणि त्यांनी त्या निंदा करणार्याला छावणीबाहेर नेले आणि त्याच्यावर दगडमार केला. याहवेहने मोशेला आज्ञापिल्यानुसार इस्राएली लोकांनी केले.