25
शब्बाथ वर्ष
1सीनाय पर्वतावर याहवेहनी मोशेला सांगितले, 2“इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही पोहोचाल, तेव्हा त्या भूमीने याहवेहसाठी शब्बाथ पाळावा. 3सहा वर्षे तुम्ही आपल्या शेतात पेरणी करावी, द्राक्षमळ्यांची छाटणी करावी आणि त्यांचे पीक जमा करावे. 4पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका. 5आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. कारण जमिनीला हे विश्रांतीचे वर्ष राहील. 6त्या शब्बाथाच्या वर्षी जमीन जे काही पीक येईल ते सर्वांना म्हणजेच तुम्ही, तुमचे नोकरचाकर, तुमच्याकडे असलेले गुलाम आणि तुमच्यात राहणारा कोणीही परदेशीय यांना खाण्याची मोकळीक आहे. 7तसेच जनावरे, वनपशू या दोघांनाही तिथे चरावयाची मोकळीक आहे.
योबेल वर्ष
8“ ‘तुम्ही सात शब्बाथ वर्षे मोजावे; म्हणजेच सात वेळा सात वर्षे; म्हणजे सात शब्बाथ वर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होईल. 9मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी तुम्ही सर्वत्र कर्णे फुंकावे. प्रायश्चित्ताच्या दिवशी संपूर्ण देशात तुम्ही मोठ्या आवाजाचे कर्णे दीर्घकाल वाजवावे. 10पन्नासावे वर्ष पवित्र मानावे आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांना मुक्ततेची घोषणा करावी. तुमच्यासाठी हा महोत्सव असेल; तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या कौटुंबिक मालमत्तेकडे आणि तुमच्या स्वतःच्या कुळाकडे परत जावे. 11पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. 12कारण हे योबेल वर्ष असेल आणि हे तुमच्याकरिता पवित्र असेल; शेतात आपोआप उगविलेले पीक तुम्ही खावे.
13“ ‘या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपल्या स्वतःच्या वतनात परत जावे.
14“ ‘यासाठी की तुम्ही जेव्हा आपल्या लोकांना जमीन विकाल किंवा त्याच्याकडून विकत घ्याल, तेव्हा तुमच्याकडून अन्यायाचा व्यवहार होऊ नये. 15योबेल वर्षानंतरच्या वर्षांच्या संख्येच्या आधारावर तुम्ही तुमच्या लोकांकडून विकत घ्यावयाची आणि पीक कापणीसाठी किती वर्षे शिल्लक आहेत या आधारावर त्याची तुम्हाला विक्री करावयाची आहे. 16जर वर्षे अनेक असतील तर जमिनीची किंमत त्या मानाने जास्त असेल, परंतु ही वर्षे थोडी असल्यास तिची किंमत त्या मानाने कमी असेल; कारण खरोखर विक्री जमिनीची होत नाही, तर ती जमीन किती वेळा पिके देऊ शकेल यावर तिची किंमत अवलंबून राहील. 17एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
18“ ‘माझ्या आज्ञांचे पालन करा आणि माझे विधीचे पालन करण्याची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही देशात सुरक्षितपणे राहाल. 19भूमी भरपूर पीक देईल आणि तुम्ही भरपूर खाल आणि सुरक्षित राहाल. 20तुम्ही असे विचाराल, “जर आम्ही झाडे लावली नाही किंवा आमच्या पिकांची कापणी केली नाही, तर आम्ही सातव्या वर्षी काय खावे?” 21मी तुम्हाला असे आशीर्वादित करेन की जमीन सहाव्या वर्षी तीन वर्षापर्यंत पर्याप्त असे पीक देईल. 22आठव्या वर्षी जेव्हा तुम्ही बी पेराल, तेव्हा तुम्ही मागच्या वर्षात गोळा केलेले पीक खात राहाल आणि नवव्या वर्षाचे पीक येईपर्यंत तुम्ही ते खाऊ शकाल.
23“ ‘तुम्ही जमीन कायमचीच विकू नये. कारण जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या भूमीवर परदेशी आणि परके म्हणून राहत आहात. 24तुमच्या ताब्यात असलेली संपूर्ण जमीन, तुम्ही त्या जमिनीला सोडविण्याची तरतूद केली पाहिजे.
25“ ‘तुमचा इस्राएली सहकारी गरीब झाला आणि त्याने त्यांची काही मालमत्ता विकली, तर त्यांच्या जवळच्या नातलगाने ती खंडणी भरून सोडवून घ्यावी. 26जर सोडवून घेणारा त्याला कोणी नातलग नसला आणि त्याला स्वतःलाच ती खंडणी भरून सोडवून घेण्याची ऐपत वाढली, 27तर योबेल वर्षापर्यंत जमीन आणखी किती वर्षे पीक देऊ शकेल हे पाहून त्या प्रमाणात तिची किंमत भरावी. जमिनीच्या सध्याच्या मालकाने तितके पैसे घेऊन तिच्या मूळ मालकाला ती परत करावी. 28पण मूळ मालक ती सोडवून घ्यावयाला समर्थ नसेल तर योबेल वर्षापर्यंत ती हल्लीच्या मालकाकडेच रहावी. पण योबेल वर्षी ती मूळ मालकाला परत केलीच पाहिजे.
29“ ‘एखाद्याने तटबंदीच्या शहरातील आपले घर विकले असेल, तर त्याला एक वर्षाच्या काळात खंडणी भरून ते परत सोडवून घेता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील. 30नगर तटबंदीच्या आत असलेले घर जर त्याने ते एक वर्षाच्या आत खंडणी भरून सोडवून घेतले नाही, तर ते नव्या मालकाच्या कायमचेच मालकीचे होईल. योबेल वर्षीही ते त्याच्या मूळ मालकाला परत करावे लागणार नाही. 31पण गावातील घर म्हणजे ज्या वस्तीला तटबंदी नाही अशा मोकळ्या वस्तीत असलेले घर मात्र केव्हाही खंडणी भरून सोडविता येईल आणि योबेल वर्षी ते घर मालकाला परत केलेच पाहिजे.
32“ ‘लेवी वंशातील मनुष्याचे घर तटबंदी असलेल्या शहरात असले तरी ते त्याला केव्हाही खंडणी भरून सोडवून घेता येईल. 33म्हणून लेव्यांच्या मालकीचे जे काही आहे ते सोडविता येईल, आणि शहरातील त्यांच्या मालमत्तेतून विकले गेलेले घर योबेल वर्षात सोडविले जाईल, कारण लेवींच्या नगरातील घरेही इस्राएलच्या घराण्यात त्यांची मालमत्ता आहे. 34लेव्यांना त्यांच्या शहराभोवती असलेली कुरणे विकण्यास परवानगी नाही, कारण ती त्यांची कायमचीच मालमत्ता आहे.
35“ ‘जर तुमच्या कोणी इस्राएल बंधूला दारिद्र्य आले आणि ते तुमच्यामध्ये स्वतःचे पालनपोषण करू शकत नसतील, तर जसे तुम्ही परदेशी आणि परक्यांना मदत कराल तशी त्यांना करा, जेणेकरून ते तुमच्यामध्ये राहतील. 36परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये. 37तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये. 38ज्याने तुम्हाला कनान देश देण्यासाठी आणि तुमचा परमेश्वर होण्यासाठी इजिप्त देशातून बाहेर आणले, तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
39“ ‘जर तुमच्यापैकी कोणी इस्राएली गरीब झाला असेल आणि त्याने स्वतःला तुम्हाला विकले असेल, तर तुम्ही त्यांना गुलामासारखे कामे करावयास लावू नये. 40तर रोजदारीवर ठेवलेल्या नोकराप्रमाणे किंवा तुमच्या आश्रिताप्रमाणे तुम्ही त्याला वागणूक द्यावी आणि योबेल वर्षापर्यंत तो तुमची सेवा करेल. 41त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सोडण्यात येईल आणि ते आपल्या कुटुंबातील पूर्वजांच्या वतनात परत जाऊ शकतील. 42कारण इस्राएली तर माझे सेवक आहेत, मी त्याला इजिप्त देशातून बाहेर आणले आहे. म्हणून त्याची सर्वसाधारण गुलामाप्रमाणे विक्री केली जाऊ नये. 43त्यांना जुलमाने वागविले जाऊ नये, परंतु तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे.
44“ ‘तुमचे पुरुष आणि स्त्री गुलाम तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांमधून यावेत; तुम्ही त्यांच्याकडून गुलाम विकत घेऊ शकता. 45तुम्ही तुमच्यामध्ये राहणारे काही तात्पुरते रहिवासी आणि तुमच्या देशात जन्मलेल्या त्यांच्या कुळातील सदस्यांना देखील विकत घेऊ शकता आणि ते तुमची मालमत्ता बनतील. 46तुम्ही ते तुमच्या मुलांना वारसाहक्कात देऊ शकता आणि त्यांना आयुष्यभर गुलाम बनवू शकता, पण तुमच्या इस्राएली बांधवांना अशा प्रकारची कठोर वागणूक तुम्ही देऊ नये.
47“ ‘तुमच्यात राहणारा एखादा परदेशी श्रीमंत झाला व इस्राएली वंशातील कोणी आपल्या दारिद्र्यामुळे स्वतःला त्या परदेश्याला वा परदेशी कुटुंबाला विकून टाकले, 48तर त्याची विक्री झाल्यावरही त्याच्या घराण्यापैकी कोणालाहीः 49त्याचा चुलता, पुतण्या किंवा त्याच्या जवळचा कोणीही खंडणी भरून त्याला सोडवून घेऊ शकेल, त्याला स्वतःलाच पैसा मिळाला तर खंडणी भरून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल. 50त्याने स्वतःला विकले त्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे राहिली असतील तितकी मोजून याकाळात एका मजुराला जितकी मजुरी द्यावी लागेल तितका पैसा भरून त्याची सुटका करावी. 51जर त्याला पुष्कळ वर्षे लागत असतील, तर त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या किमतीचा मोठा भाग त्यांच्यासाठी द्यावा. 52जर योबेल वर्षाला थोडीच वर्षे राहिली असतील तर त्यांनी हिशोब करावा आणि त्यांच्या सुटकेसाठी नियमाप्रमाणे किंमत द्यावी. 53तो दरवर्षी मजुराच्या हिशोबाप्रमाणे त्याच्याबरोबर वागणूक करेल आणि ज्यांच्याकडून सेवा करून घेतात त्यांना कठोर वागणूक देऊ नये.
54“ ‘योबेल वर्षापर्यंतही तो मुक्त झाला नसेल, तर तो व त्याची मुलेबाळे योबेल वर्षी मुक्त होतील, 55कारण इस्राएली लोक माझेच सेवक आहेत; मीच त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.