YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 26

26
आज्ञापालनाने मिळणारे आशीर्वाद
1“ ‘तुम्ही आपणासाठी घडीव मूर्ती किंवा कोरीव मूर्ती किंवा मूर्तिस्तंभ यांची स्थापना करू नये, अथवा आपल्या देशात नतमस्तक होण्यासाठी कोरीव दगड ठेवू नये. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
2“ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे.
3“ ‘माझ्या विधीनुसार तुम्ही चालाल आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल, 4तर मी हंगामात तुमच्यासाठी पाऊस पाठवेन आणि जमीन पीक देईल आणि झाडे फळ देतील. 5द्राक्षमळ्याची कापणी होईपर्यंत तुझी मळणी सुरूच राहील आणि द्राक्षांची कापणी पेरणी होईपर्यंत चालू राहील आणि पोटभर अन्न खाऊन तुम्ही तृप्त व्हाल आणि देशात सुरक्षित राहाल.
6“ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही. 7तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि तुमच्यासमोर ते तलवारीने पडतील. 8तुम्हातील पाचजण शंभरांचा व शंभर दहा हजारांचा पाठलाग करून सर्व शत्रूंचा पराजय करतील आणि तुमचे शत्रू तलवारीने तुमच्यासमोर पडतील.
9“ ‘मी तुमच्यावर कृपादृष्टी करेन, तुम्हाला बहुगुणित करेन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करेन. 10तुम्ही अजूनही मागील कापणी खात राहाल, तुमच्या शेतात इतके भरपूर पीक येईल की, ते साठविण्यासाठी तुम्हाला जुने धान्य बाहेर काढावे लागेल. 11मी तुमच्यामध्ये वस्ती करेन#26:11 किंवा निवासमंडप व मला तुमचा तिटकारा वाटणार नाही. 12मी तुमच्यामध्ये चालेन; मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. 13इजिप्तच्या लोकांचे तुम्ही गुलाम राहू नये म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्त देशामधून बाहेर आणले; तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. मी तुमच्या बेड्या तोडून टाकल्या आणि तुम्ही ताठ मानेने चालाल असे मी केले आहे.
आज्ञाभंगाबद्दल मिळणारी शिक्षा
14“ ‘पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि या सर्व आज्ञा पाळल्या नाही, 15आणि माझे विधी तुम्ही स्वीकारले नाही आणि माझे नियम तुच्छ लेखून माझ्या आज्ञा पाळण्यात कसूर केली आणि माझ्या कराराचा भंग केला, 16तर मी तुमच्यासोबत हे करेन: तुम्हाला एकाएकी भयंकर भीतीने ग्रासून टाकेन, तुम्हाला क्षयरोग होईल व असे भयंकर ज्वर तुम्हाला पछाडतील की त्यामुळे तुमचे नेत्र अंधुक होतील आणि तुमची शक्ती कोमेजून जाईल. तुम्ही केलेली धान्याची पेरणी व्यर्थ जाईल, कारण तुमचे पीक तुमचे शत्रू खाऊन टाकतील. 17मी तुम्हापासून आपले मुख फिरवेन आणि तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. ज्यांचा तुम्ही द्वेष करता तेच तुमच्यावर सत्ता गाजवतील आणि कोणी पाठलाग करीत नसतानाही तुम्ही पळाल.
18“ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करेन. 19मी तुमच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा करेन आणि तुमचे आकाश लोखंडासारखे व पृथ्वी कास्यासारखी करून टाकेन. 20तुमची मेहनत व्यर्थ गोष्टींमुळे नाश पावेल, कारण तुमची जमीन पिके देणार नाही व तुझ्या देशातील झाडांना फळे येणार नाहीत.
21“ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझे ऐकले नाही, तर मी तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट पीडा आणेन. 22मी तुमच्यावर जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुमच्या लेकरांना उचलून नेतील, गुरांचा नायनाट करतील आणि तुमची संख्या कमी करतील; आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओसाड होतील.
23“ ‘एवढे करून सुद्धा तुमच्यात सुधारणा झाली नाही आणि माझ्याविरुद्ध तुम्ही वागत राहिलात, 24तर मी तुमच्याविरुद्ध होईन आणि तुमच्या पापाबद्दल सात वेळा तुम्हाला ताडण करेन. 25माझा करार मोडल्याबद्दल तुमच्यावर तलवार आणेन. तुम्ही आपआपल्या शहरांत एकत्र व्हाल, तेव्हा तिथे मी तुमच्यामध्ये प्राणघातक रोग पाठवेन आणि तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हाती देण्यात येईल. 26मी तुमच्या भाकरीचा पुरवठा बंद करेन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर भाकर भाजू शकतील आणि त्या भाकरीचे वजन करून देतील. तुम्ही खाल परंतु तृप्त होणार नाहीत.
27“ ‘एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकणार नाही आणि माझ्याविरुद्ध वागाल, 28तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन. 29तुम्ही तुमच्या पुत्रांचे व तुमच्या कन्यांचे मांस खाल. 30तुमच्या उच्च स्थानांचा मी नाश करेन; तुमच्या धूपवेद्या मी मोडून टाकीन; तुमची प्रेते#26:30 किंवा तुमची अंत्यसंस्काराची अर्पणे कुजण्यासाठी मी ती मूर्तीच्या समवेतच राहू देईन आणि मी तुमचा तिरस्कार करेन. 31तसेच मी तुमची शहरे उजाड करेन, तुमची पवित्रस्थाने ओसाड करेन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास घेणार नाही. 32मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील. 33मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल. 34जेव्हा तुम्ही शत्रूंच्या देशात असाल, तुमचा देश उजाड होईल; तेव्हा भूमीला विश्रांती मिळेल व भूमी तिच्या शब्बाथ वर्षांचा संपूर्ण वेळ आनंद करेल. 35अनेक वर्षे ती उजाड होती, तुम्ही तिथे राहत असताना शब्बाथाच्या काळामध्ये तिला विश्रांती मिळाली नाही म्हणून ती आता विश्रांती घेईल.
36“ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्‍याने उडून जाणार्‍या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील. 37कोणी पाठलाग करीत नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंसमोर उभे राहू शकणार नाही. 38तुम्ही राष्ट्रांत पांगून नाश पावाल; तुमच्या शत्रूंचा देश तुम्हाला गिळून टाकील. 39तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील.
40“ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील, 41ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील, 42तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन. 43कारण ती भूमी ओसाड पडल्यामुळेच शब्बाथांचा आनंद उपभोगू शकत आहे. ते त्यांच्या पापांची परतफेड करतील कारण त्यांनी माझे नियम नाकारले आणि माझ्या विधींचा तिरस्कार केला. 44त्यांनी इतके केले असतानाही जेव्हा ते शत्रूंच्या देशात असतील, मी त्यांचा नकार करणार नाही किंवा नाश करणार नाही किंवा त्यांच्याशी केलेला करार मोडणार नाही. कारण मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे. 45परंतु त्यांचा परमेश्वर होण्याचा, त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार मी आठवेन. सर्व राष्ट्रे पाहत असताना मी त्यांच्या वाडवडिलांना इजिप्त देशाबाहेर घेऊन आलो होतो. मी याहवेह आहे.’ ”
46हे ते नियम, विधी व सूचना आहेत, ज्या याहवेहने आपल्यात व इस्राएली लोकांमध्ये मोशेद्वारे सीनाय पर्वतावर स्थापित केल्या.

सध्या निवडलेले:

लेवीय 26: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन