लेवीय 5
5
1जर पाहिलेल्या किंवा माहीत झालेल्या गोष्टींबद्दल साक्ष देण्यासाठी सार्वजनिकरित्या केलेला आरोप जे ऐकतात पण काही बोलत नाहीत, तर ते पाप करतात, त्यांना जबाबदार धरले जाईल.
2एखादी व्यक्ती अजाणतेने विधिनियमानुसार अशुद्ध ठरविलेल्या वस्तूला म्हणजेच खाण्यास निषिद्ध असलेल्या ग्रामपशूच्या किंवा वनपशूच्या मृत शरीराला, किंवा सरपटणार्या अशुद्ध प्राण्याच्या मृत शरीराला स्पर्श करेल, तर ती व्यक्ती अशुद्ध झाली. निषिद्ध असलेल्या मृत शरीराचा स्पर्श झाला, हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले, तर ती व्यक्ती दोषी आहे. 3कोणत्याही प्रकारच्या मानवी अशुद्धतेस कोणतीही व्यक्ती अजाणतेने स्पर्श करेल आणि ते अशुद्ध झाले आहेत हे त्यांना समजणार नाही, परंतु नंतर त्यांना त्यांचा दोष समजून आल्यास; 4किंवा जर कोणता व्यक्ती अविचाराने शपथ घेतो, मग ती शपथ चांगली असो वा वाईट असो, नंतर आपण ती शपथ अज्ञानाने घेतली हे त्याला कळून आले, तेव्हा तो दोषी ठरेल. 5जर कोणाला याची जाणीव होते की ते यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी आहेत, तर त्याने जे पातक केले ते पातक कबूल करावे, 6आणि त्यांनी केलेल्या पापांचा दंड म्हणून कळपातील एक मादी कोकरू किंवा शेळी याहवेहला पापार्पण अशी करावी; आणि याजकाने त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.
7परंतु एखाद्याला याहवेहला कोकरू देणे शक्य नसेल, तर त्याने आपल्या पापांबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक पापार्पणासाठी व एक होमार्पणासाठी आणावी. 8त्याने ती याजकाकडे आणावी आणि याजकाने प्रथम पापार्पणाचा यज्ञ करावा. त्याने त्या पक्ष्याची मान मुरगळावी, परंतु डोके मानेपासून वेगळे करू नये. 9नंतर पापार्पणाचे काही रक्त वेदीभोवती शिंपडावे. बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय. 10दुसरा पक्षी त्याने विधिपूर्वक होमार्पण म्हणून अर्पावा. अशाप्रकारे याजकाने त्यांच्यासाठी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.
11“जर होले किंवा पारव्याची पिल्ले आणण्याइतकीही त्याची ऐपत नसेल, तर त्याने एफाचा दहावा भाग#5:11 अंदाजे 1.6 कि.ग्रॅ. उत्तम पीठ आणावे. ते पापार्पण असल्यामुळे त्याने ते जैतुनाच्या तेलात मिश्रित करू नये किंवा त्यावर धूपही ठेवू नये. 12त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातील मूठभर पीठ घेऊन संपूर्ण पापार्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून याहवेहला इतर अर्पणांचा होम करतात तसे त्याचे वेदीवर होम करावे. हे त्याच्यावतीने पापार्पण होय. 13अशारितीने याजकाने त्यांच्या अशा प्रकारच्या कोणत्याही पापांबद्दल प्रायश्चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल. अन्नार्पणासंबंधी सांगितल्याप्रमाणे, पापार्पणाचे उरलेले पीठ याजकाचे होईल.”
दोषार्पणे
14याहवेह मोशेला म्हणाले: 15“याहवेहशी अविश्वासूपणा करून त्यांची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला, तर त्याने दोषार्पण म्हणून, तू ठरवशील तितक्या निवासमंडपातील चांदीच्या शेकेलांच्या#5:15 अंदाजे 12 ग्रॅ. ठरलेल्या किमतीचा एक निर्दोष मेंढा आणावा. 16पवित्र वस्तू दूषित करून त्यांनी जे पाप केले त्याची ते भरपाई करतील. त्यांनी भरपाईची रक्कम देऊन वर वीस टक्के अधिक दंड द्यावा. त्यांनी दोषार्पणाचा एक मेंढा याजकाकडे आणावा आणि याजक त्यांच्यासाठी तो मेंढा अर्पून प्रायश्चित्त करेल व त्यांची क्षमा होईल.
17“अजाणतेने याहवेहने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, तरी ते दोषी ठरतील आणि त्याकरिता ते जबाबदार असतील. 18त्यांनी निर्दोष मेंढा याजकाकडे न्यावा, तू ठरवशील तेवढ्या किमतीचा तो असावा, म्हणजे याजक तो मेंढा अर्पून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त करेल, आणि अजाणतेने घडलेल्या पापाबद्दल त्यांची क्षमा होईल. 19हे दोषार्पण आहे, याहवेहविरुद्ध चुकीची गोष्ट केल्याने ते दोषी ठरले आहेत.”
सध्या निवडलेले:
लेवीय 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.