6
1याहवेह मोशेला म्हणाले: 2“जर कोणी त्याच्या शेजारच्या मनुष्यावर त्याने सोपविलेल्या काही गोष्टीबाबत फसवणूक करून किंवा त्याची काळजी न घेता किंवा काहीतरी चोरी करून किंवा त्यांच्या शेजार्याला फसवून याहवेहविरुद्ध विश्वासघात केला असेल, तर तो पाप करतो 3किंवा जर कोणाला हरवलेली वस्तू सापडली आणि त्याबद्दल ते खोटे बोलतील आणि तिच्याविषयी खोटी शपथ वाहतील किंवा जर लोकांनी केलेल्या अशा पापाबद्दल ते खोटे बोलतील, 4अशा कोणत्याही प्रकारे जर ते पाप करतील आणि त्यांच्या पापांची त्यांना जाणीव होईल, तेव्हा त्यांनी ती चोरलेली वस्तू किंवा बळजबरीने जे घेतले असेल ते किंवा जे काही त्यांच्यावर सोपविलेले असेल किंवा हरवलेली संपत्ती सापडल्यास ती परत करावी— 5किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी खोटी शपथ घेतली असेल तर, ज्या दिवशी दोषार्पण आणतील, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गुन्ह्याबद्दल वीस टक्के अधिक दंड म्हणून त्या वस्तूच्या मालकाला द्यावा. 6आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा. 7याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.”
होमार्पणे
8याहवेह मोशेला म्हणाले, 9“अहरोन आणि त्याच्या पुत्रांना अशी आज्ञा कर, होमार्पणासाठी पाळावयाचे नियम हे आहेत: होमार्पण रात्रभर वेदीवर ठेवून ते सकाळपर्यंत राहू द्यावे आणि त्या वेदीवरील अग्नी जळत ठेवावा. 10नंतर याजकाने त्याची तागमिश्रित वस्त्रे, त्याचबरोबर त्याची अंतर्वस्त्रे अंगावर घालावी आणि वेदीवरील अग्नीत भस्म झालेली होमार्पणाची राख काढावी आणि ती वेदीच्या बाजूला ठेवावी. 11मग त्याने आपली वस्त्रे बदलून, दुसरी वस्त्रे घालावी आणि ती राख छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी न्यावी. 12वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा, तो विझू देऊ नये. तो पेटलेला ठेवण्यासाठी याजकाने रोज सकाळी वेदीवर लाकडे ठेवावी व त्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या चरबीचे हवन करावे. 13वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा; तो कधीही विझू देऊ नये.
अन्नार्पणे
14“अन्नार्पणासंबंधी नियम आहेत ते हे: अहरोनाच्या पुत्रांनी याहवेहसमोर वेदीपुढे अर्पण करावे. 15मग याजकांनी सुगंधी मसाले व जैतुनाचे तेल व धूप घ्यावा आणि मळलेला अन्नार्पणातील मूठभर सपीठ घ्यावे व संपूर्ण अर्पणाचा स्मरणभाग म्हणून वेदीवर त्याचे हवन करावे. हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असेल. 16उर्वरित भाग अहरोन आणि त्याचे पुत्र खातील, परंतु त्यांनी ते खमीर न घालता पवित्रस्थानात खावे; त्यांनी ते सभामंडपाच्या अंगणात खावे. 17तो खमिरासह भाजू नये. मला अर्पिलेल्या होमार्पणाचा हा भाग मी माझ्या अर्पणातून याजकांना त्यांचा वाटा म्हणून दिला आहे. दोषार्पण व पापार्पण त्याप्रमाणेच हे देखील परमपवित्र आहे. 18अहरोनाच्या संतानांतील फक्त पुरुषांनी ते खावे आणि याहवेहला अर्पिलेला अन्नार्पणाचा हा भाग त्यांच्यासाठी पिढ्यान् पिढ्या कायमचा वाटा राहावा. जे कोणी यास स्पर्श करतील, ते पवित्र#6:18 त्याने पवित्र असणे गरजेचे आहे गणले जातील.”
19याहवेह मोशेला हे देखील म्हणाले, 20“ज्या दिवशी अहरोन व त्याच्या पुत्रांचा याजकीय सेवेसाठी अभिषेक होईल, त्या दिवशी त्यांनी एफाचा दहावा हिस्सा#6:20 अर्थात् 1.6 कि.ग्रॅ. उत्तम सपीठ, अर्धे सकाळी व अर्धे सायंकाळी, अन्नार्पण म्हणून नेमाने याहवेहला अर्पावे. 21ते अन्नार्पण तव्यावर तेलात चांगले परतावे आणि मग याहवेहला अर्पण म्हणून आणावे, कारण हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असे अर्पण आहे. 22त्याच्या पुत्रांपैकी जो पुत्र त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून नियुक्त होईल तो ते तयार करेल. याहवेहचा हा वाटा सर्वकाळचा आहे आणि तो पूर्णपणे जाळून टाकावा. 23याजकाचे प्रत्येक धान्यार्पण पूर्णपणे जाळून टाकले जाईल; ते खाऊ नये.”
पापार्पणे
24याहवेह मोशेला म्हणाले, 25“अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग, पापार्पणासंबंधी नियम हे आहेत: ज्या स्थळी होमार्पणाच्या पशूंचा वध करतात त्याच स्थळी या पापार्पणाच्या पशूचाही याहवेहसमोर वध करावा. हे परमपवित्र आहे. 26ज्या याजकाने हा पापार्पणविधी केला असेल, त्याने सभामंडपाच्या अंगणात पवित्रस्थानात ते खावे. 27जे काही या मांसाला स्पर्श करेल ते पवित्र होईल आणि जर काही रक्त वस्त्रावर उडाले असेल, तर ते तुम्ही पवित्रस्थानी धुवावे. 28ज्या मातीच्या पात्रात मांस शिजविले असेल, ते पात्र फोडून टाकावे पण तांब्याच्या पात्रात शिजविले असेल; तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे. 29याजकीय घराण्यातील कोणीही पुरुष ते खाऊ शकतात; ते परमपवित्र आहे. 30परंतु कोणतेही पापार्पण, ज्याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी सभामंडपात आणले जाते ते खाऊ नये; ते जाळून टाकावे.”