YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 7

7
दोषार्पणे
1“दोषार्पण जे परमपवित्र आहे त्यासंबंधी जे नियम आहेत ते हे: 2ज्या स्थळी होमार्पणाचे यज्ञपशू मारले जातात, त्याच निर्धारित स्थळी दोषार्पणाच्या यज्ञपशूचा वध करावा आणि त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे. 3मग याजकाने त्याची सर्व चरबी: चरबीदार शेपूट, आतड्यावरील चरबी, 4कंबरेजवळील चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग तुम्ही गुरद्यासह काढून टाकावे. 5आणि याजकाने या सर्वांचे याहवेहला अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करावे. हे दोषार्पण होय. 6याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला हा बली खाण्याचा अधिकार असून त्यांनी तो बली पवित्रस्थानातच बसून खावा; कारण हे परमपवित्र आहे.
7“पापार्पणासारखेच दोषार्पण आहे; त्या दोघांचे नियम सारखेच आहेत. अर्पिलेला हा बली प्रायश्चित्तविधी करणार्‍या याजकाच्याच अधिकाराचा होईल. 8जो याजक एखाद्या मनुष्याच्या वतीने होमार्पण करेल, त्या अर्पण पशूच्या कातडीवर त्या याजकाचाच हक्क असेल. 9भाजलेल्या किंवा शिजविलेल्या किंवा तळलेल्या प्रत्येक अन्नधान्याचे अर्पण, विधी करणार्‍या याजकाचे होईल, 10अन्नधान्याचे प्रत्येक अर्पण, जैतुनाच्या तेलात मिश्रण केलेली किंवा कोरडी, अहरोनाच्या सर्व पुत्रांच्या सामूहिक मालकीची आहेत.”
शांत्यर्पण
11“याहवेहसाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:
12“उपकारस्तुती म्हणून केलेल्या शांत्यर्पणात तेल लावलेल्या बेखमीर जाड भाकरी, बेखमीर व वरून तेल लावलेल्या पातळ पापड्या, नीट मळलेल्या व तेल मिसळलेल्या उत्तम पिठाच्या जाड भाकरी असाव्यात. 13उपकारस्तुतीच्या या शांत्यर्पणासह खमीर घालून केलेल्या जाड भाकरींचेही अर्पण करावे. 14या अर्पणातील काही भाग संपूर्ण अर्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून प्रत्येक प्रकारची भाकर वेदीपुढे याहवेहला अर्पण करावी, म्हणजे याजक जो वेदीवर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडतो त्या याजकाचाच त्यावर हक्क असेल. 15उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये.
16“परंतु यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वैच्छिक असेल, तर अर्पणातील भाग त्या दिवशीच खावे, पण उरलेले भाग दुसर्‍या दिवशी खाण्यास हरकत नाही. 17अर्पणातील काही मांस तिसर्‍या दिवसापर्यंत शिल्लक राहिले असेल तर ते अग्नीत जाळून टाकावे. 18शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्‍या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल.
19“ ‘ज्या मांसाचा स्पर्श एखाद्या विधिनियमानुसार अपवित्र वस्तूला झाल्यास ते खाऊ नये; ते जाळून टाकावे. दुसरे मांस जो कोणी विधिपूर्वक शुद्ध आहे, तो ते खाऊ शकतो. 20परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे. 21जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्‍या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ”
चरबी व रक्ताचे सेवन निषिद्ध
22याहवेह मोशेला म्हणाले, 23“इस्राएली लोकांस सांग: तुम्ही बैलांची, मेंढरांची किंवा शेळ्यांची चरबी खाऊ नये. 24मेलेल्या प्राण्याची चरबी किंवा हिंस्त्र श्वापदाने फाडलेल्या प्राण्याची चरबी सापडली तर ती इतर कामासाठी वापरता येईल, परंतु तुम्ही ती खाऊ नये. 25याहवेहला केलेल्या होमार्पणातील चरबी जो कोणी खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा. 26जिथे कुठे तुम्ही राहाल, पशूचे किंवा पक्ष्याच्या रक्ताचे केव्हाही सेवन करू नये. 27जो कोणी ते खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा.”
याजकाचा वाटा
28याहवेह मोशेला म्हणाले, 29इस्राएली लोकांस सांग: जो कोणी याहवेहसाठी शांत्यर्पण आणेल, त्याने त्याचा काही भाग याहवेहला अर्पणासाठी वेगळा आणावा. 30त्याने तो स्वहस्ते याहवेहस अर्पण करावा. चरबी व ऊर यांचे अर्पण आणून वेदीसमोर ओवाळले जाऊन ते याहवेहला ओवाळणीचे अर्पण करावे. 31मग याजक चरबीचे वेदीवर हवन करेल, पण ऊर अहरोन व त्याच्या पुत्रांचे होईल. 32तू त्याची उजवी मांडी शांत्यर्पणाचा भाग म्हणून याजकास द्यावी. 33अहरोनाच्या पुत्रांपैकी जो शांत्यर्पणातील रक्त व चरबी अर्पण करेल, त्याला त्याचा वाटा म्हणून उजवी मांडी देण्यात यावी. 34कारण ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही इस्राएली लोकांतर्फे याजक अहरोन आणि त्याच्या पुत्रांना दिली आहेत. शांत्यर्पणाचा हा भाग त्यांचा सर्वकाळचा वाटा म्हणून देण्यात यावा.
35होमार्पणातील हा भाग याहवेहची सेवा करण्यासाठी नेमलेल्या सर्व याजकांना, म्हणजेच अहरोन व त्याच्या पुत्रांना दिला पाहिजे. 36कारण याहवेहनी त्यांचा अभिषेक केला, त्याच दिवशी त्यांनी इस्राएली लोकांना आज्ञा दिली की, त्यांनी हा सर्वकाळचा वाटा त्या वंशाला पिढ्यान् पिढ्या द्यावा.
37होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकांच्या अभिषेकाचे अर्पण व शांत्यर्पण यांच्या विधीसंबंधीचे हे नियम आहेत. 38याहवेहनी हे नियम सीनाय पर्वतावर मोशेला दिले. सीनायच्या रानात इस्राएली लोकांना याहवेहप्रीत्यर्थ कोणती अर्पणे आणावी म्हणून मोशेला हे नियम देण्यात आले.

सध्या निवडलेले:

लेवीय 7: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन