लूक 10
10
येशू बहात्तर शिष्यांना पाठवितात
1यानंतर प्रभुने आणखी बहात्तर#10:1 काही मूळप्रतींमध्ये सत्तर पाहा वचन 17 पासून पुढे शिष्य नेमले आणि त्यांना दोघे दोघे ज्या गावात व ठिकाणात ते जाणार होते तेथे त्यांना आपल्यापुढे पाठविले. 2त्यांनी त्यांना सांगितले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभुने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा. 3जा, मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवीत आहे. 4पैसे किंवा झोळी किंवा पायतण घेऊ नका आणि रस्त्यात कोणाला सलाम करू नका.
5“घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या, ‘या घरास शांती लाभो.’ 6जर शांतिला प्रोत्साहन देणारी एखादी व्यक्ती तेथे असेल तर तुमची शांती त्यांच्यावर राहील; नसेल तर ती तुमच्याकडे परत येईल. 7घरोघरी न जाता तेथेच राहा आणि तुम्हाला जे देण्यात येईल, ते निःशंकपणे खा व प्या. कारण कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे.
8“एखाद्या गावाने तुमचे स्वागत केले, तर तेथे तुमच्या पुढे जे वाढण्यात येईल ते खा, 9आजार्यांस बरे करा आणि त्यांना सांगा, ‘परमेश्वराचे राज्य आता तुमच्याजवळ आले आहे.’ 10पण एखाद्या गावाने तुम्हाला नाकारले, तर त्यांच्या रस्त्यावर जाऊन सांगा, 11‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावाची धूळ इशारा म्हणून झटकून टाकतो. परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे, याची खात्री बाळगा.’ 12मी तुम्हाला सांगतो, तो दिवस या नगरांपेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.#10:12 सुसह्य उत्प 19 पासून
13“खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर ते गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप करीत बसले असते. 14परंतु सोर आणि सीदोन या शहरांना न्याय तुमच्याहून अधिक सुसह्य होईल. 15हे कफर्णहूमा, तू, स्वर्गात घेतला जाशील काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील.#10:15 मृतांचे राज्य
16“जे तुमचे ऐकतात, ते माझे ऐकतात आणि जे तुम्हाला नाकारतात, ते मला नाकारतात. परंतु जे मला नाकारतात, ते ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना नाकारतात.”
17नंतर ते बहात्तर आनंदाने परतले आले आणि म्हणाले, “प्रभुजी, तुमच्या नावाने भुतेदेखील वश होतात.”
18त्यांनी उत्तर दिले, “मी सैतानाला स्वर्गातून वीज कोसळावी तसा कोसळताना पाहिले. 19मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवून टाकण्यासाठी आणि शत्रूवर विजयी होण्याचे सामर्थ्य दिले आहे; तुम्हाला इजा होणार नाही. 20तरीपण दुष्टात्मे तुमची आज्ञा पाळतात, या गोष्टींचा आनंद करण्यापेक्षा, तुमची नावे स्वर्गात नोंदली गेली आहेत याचा आनंद करा.”
21त्यावेळी येशू पवित्र आत्म्याद्वारे आनंदित होऊन म्हणाले, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्यांपासून या गोष्टी गुप्त ठेवल्या आणि लहान बालकांना प्रगट केल्यास म्हणून मी तुमचे आभार मानतो कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.
22“माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणाला ठाऊक नाही आणि पिता कोण आहे, हे पुत्रावाचून व ज्या कोणाला त्यांना प्रकट करण्यासाठी पुत्राने निवडले असतील त्यांनाच प्रकट होईल.”
23नंतर ते आपल्या बारा शिष्यांकडे वळून खासगी रीतीने म्हणाले, “परंतु जे तुम्ही पाहता ते पाहणारे डोळे धन्य. 24कारण मी तुम्हाला सांगतो अनेक संदेष्ट्यांनी आणि राजे यांनी तुम्ही जे पाहिले आणि ऐकले, ते पाहण्याची आणि ऐकण्याची उत्कंठा धरली होती, परंतु ती पूर्ण झाली नाही.”
चांगला शोमरोनी याचा दाखला
25एका प्रसंगी एक नियमशास्त्र तज्ञ येशूंची परीक्षा पाहावी म्हणून आला, “गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्याकरीता मी काय करावे?”
26येशू म्हणाले, “याबाबत नियमशास्त्र काय म्हणते? तू काय वाचतोस?”
27त्याने उत्तर दिले, “ ‘आपला प्रभू परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने’#10:27 अनु 6:5 आणि ‘तुमच्या पूर्ण शक्तीने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.’#10:27 लेवी 19:18”
28“अगदी बरोबर सांगितलेस,” येशू म्हणाले, “तसेच कर म्हणजे तू जगशील.”
29तरी आपले न्यायीपणाचे समर्थन करण्यासाठी त्याने येशूंना विचारले, “माझा शेजारी कोण?”
30उत्तर देत येशू म्हणाले: “एक मनुष्य खाली यरुशलेमाहून यरीहोला जात असताना, चोरांनी त्याच्यावर हल्ला केला, कपडे हिसकावून घेतले, मारहाण केली आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत टाकून ते निघून गेले. 31एक याजक त्या बाजूने आला आणि त्या मनुष्याला तेथे पडलेले पाहून, रस्ता ओलांडून निघून गेला. 32त्याचप्रमाणे एक लेवी आला, त्याने त्याला पाहिले, पण तो तसाच पुढे गेला. 33नंतर एक शोमरोनी, प्रवास करीत जेथे तो होता तेथे आला आणि पाहून, त्याला त्याचा कळवळा आला. 34त्याच्याजवळ जाऊन त्या मनुष्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून पट्ट्या बांधल्या. त्याला आपल्या गाढवावर बसवून तो एका उतारशाळेत आला आणि त्याने त्याची सेवा केली. 35दुसर्या दिवशी त्याने उतारशाळेच्या मालकाला चांदीची दोन नाणी#10:35 एक दिनार मजुराचे एक दिवसाचे वेतन मत्त 20:2 देऊन सांगितले, ‘या माणसाची काळजी घ्या,’ आणि ‘मी परत येईन, त्यावेळी जास्त खर्च झाला असेल तर त्याची भरपाई करीन.’
36“आता या तिघांपैकी चोरांच्या हाती सापडलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता असे तुला वाटते?”
37त्या नियमशास्त्रज्ञाने उत्तर दिले, “ज्याने त्याला दया दाखविली, तोच.”
यावर येशू त्याला म्हणाले, “जा आणि असेच कर.”
मार्था व मरीया यांच्या घरी येशू
38येशू आणि त्यांचे शिष्य त्यांच्या मार्गाने जात असताना एका नगरात आले तेथे मार्था नावाच्या एका स्त्रीने आपल्या घरी त्यांचे स्वागत केले. 39तिला मरीया नावाची एक बहीण होती. ती प्रभुच्या चरणाजवळ बसून त्यांचे शब्द ऐकत होती. 40तरी, सर्व गोष्टींची तयारी करताना मार्था कंटाळून गेली आणि प्रभुला म्हणाली, “प्रभुजी, माझ्या बहिणीने कामाचा भार माझ्या एकटीवरच टाकला आहे, याची तुम्हाला काळजी नाही काय? तिला मला मदत करावयास सांगा.”
41पण प्रभू तिला म्हणाले, “मार्था, मार्था, तू उगाच पुष्कळ गोष्टींची काळजी करीत असते. 42परंतु वास्तविक, केवळ एकाच गोष्टीची#10:42 काही मूळप्रतींमध्ये परंतु केवळ एकाच गोष्टीची गरज आहे गरज आहे. मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
सध्या निवडलेले:
लूक 10: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.