एके दिवशी येशू मंदिराच्या अंगणात लोकांना शिकवीत होते आणि शुभवार्तेची घोषणा करीत होते, तेव्हा मुख्य याजक आणि यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले. त्यांनी येशूंना विचारले, “आम्हाला हे सांगा की तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करत आहात? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?”
येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा: योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?”
या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण म्हणालो, ‘स्वर्गापासून होता,’ तर ते विचारतील, ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’ पण जर आपण म्हणालो ‘मनुष्यापासून होता,’ तर सर्व लोक आपल्याला दगडमार करतील. कारण योहान संदेष्टा होता, याबद्दल लोकांची पुरेपूर खात्री होती.”
शेवटी त्यांनी उत्तर दिले, “तो कुठून होता हे आम्हाला माहीत नाही.”
यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.”
नंतर लोकांकडे वळून येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने एक द्राक्षमळा लावला. तो मळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन तो बर्याच दिवसासाठी दूर निघून गेला. हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे, म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्यांकडे पाठविला. परंतु शेतकर्यांनी त्याला मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठवून दिले. त्याने दुसर्या सेवकाला त्यांच्याकडे पाठविले, परंतु त्यांनी त्यालासुद्धा मारले आणि लज्जास्पद वागणूक दिली व रिकाम्या हाताने परत पाठविले. तरी त्याने तिसर्याला पाठविले आणि त्यांनी त्याला जखमी केले आणि मळ्याबाहेर फेकून दिले.
“तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी स्वतःशीच म्हणाला, ‘मी काय करावे बरे? आता माझा पुत्र ज्याच्यावर मी प्रीती करतो त्याला त्यांच्याकडे पाठवितो. कदाचित ते त्याचा मान राखतील.’
“पण शेतकर्यांनी मालकाच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे. आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ तेव्हा त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून त्याला मारून टाकले.
“आता त्या द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करेल? तो येईल आणि त्या भाडेकर्यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्यांना देईल.”
लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते म्हणाले, “परमेश्वर करो असे कधीही न होवो!”
येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले व विचारले, “तर मग,
“ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला,
तोच कोनशिला झाला’ असे जे धर्मशास्त्रात लिहिले आहे, त्याचा अर्थ काय आहे?
जे सर्व त्या खडकावर आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.”
प्रमुख याजक आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी हा दाखला ऐकला, तेव्हा येशूंना ताबडतोब अटक करण्याचा मार्ग ते शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले पण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
त्यांच्यावर बारकाईने पाळत ठेऊन, त्यांनी गुप्तहेरांना प्रामाणिक माणसे आहेत असे ढोंग करून त्यांच्याकडे पाठविले यासाठी की येशूंना त्यांच्या शब्दात पकडावे आणि त्यांना राज्यपालाच्या अधिकारकक्षेत आणावे. त्या गुप्तहेरांनी येशूंना प्रश्न विचारला: “गुरुजी, हे आम्हाला माहीत आहे की तुम्ही जे योग्य आहे ते बोलता व शिकविता आणि पक्षपात न करता परमेश्वराचा मार्ग सत्याने शिकविता. आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
येशूंनी त्यांच्या मनातील कपट ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, “मला एक नाणे दाखवा. या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचे नाव आहे?”
“कैसराचे,” त्यांनी उत्तर दिले.
मग येशू म्हणाले, “कैसराचे ते कैसराला, जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”
अशा रीतीने लोकांपुढे त्यांना ते शब्दात पकडू शकले नाही. त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि गप्प राहिले.