लूक 20:1-26
लूक 20:1-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एके दिवशी येशू परमेश्वराच्या भवनात लोकांस शिक्षण देत असता व सुवार्ता सांगत असता, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र वर त्याच्याकडे आले. ते त्यास म्हणाले, “कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस हे आम्हास सांग, तुला हा अधिकार कोणी दिला?” तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगा. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून होता?” त्यांनी आपसात चर्चा केली आणि एकमेकांना म्हणाले, “जर आपण स्वर्गापासून म्हणावे, तर तो म्हणेल, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ पण जर आपण मनुष्यांकडून म्हणावे, तर सर्व लोक आपणास दगडमार करतील कारण त्यांची खात्री आहे की, योहान हा एक संदेष्टा होता.” म्हणून, “तो कोणापासून होता हे आम्हास माहीत नाही.” असे त्यांनी त्यास उत्तर दिले. मग येशू त्यास म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे मीसुद्धा तुम्हास सांगणार नाही.” मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला. हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठवले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठवले. नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठवले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली आणि रिकाम्या हाताने परत पाठवले. तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठवले. पण त्यालाही त्यांनी जखमी करून बाहेर फेकून दिले. द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘मी काय करू? मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्यास मान देतील.’ पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्यास ठार मारू, म्हणजे वतन आपले होईल.’ त्यांनी त्यास द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील? तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.” त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.” येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले, “तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोनशिला झाला. जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल.” नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक लोक यांनी त्याचवेळी त्यास अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यांना त्यास अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्यास बोलण्यांत धरून राज्यपालाच्या आणि अधिकाराच्या अधीन करावे म्हणून आपण प्रामाणिक धार्मिक आहोत असे भासविणारे हेर पाठवले. म्हणून त्या हेरांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता. आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?” ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा. यावर कोणाची प्रतिमा व लेख आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.” तेव्हा लोकांसमोर तो जे काही बोलला त्यामध्ये त्यास धरणे त्यांना शक्य झाले नाही. त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि निरुत्तर झाले.
लूक 20:1-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एके दिवशी येशू मंदिराच्या अंगणात लोकांना शिकवीत होते आणि शुभवार्तेची घोषणा करीत होते, तेव्हा मुख्य याजक आणि यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले. त्यांनी येशूंना विचारले, “आम्हाला हे सांगा की तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करत आहात? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा: योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?” या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण म्हणालो, ‘स्वर्गापासून होता,’ तर ते विचारतील, ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’ पण जर आपण म्हणालो ‘मनुष्यापासून होता,’ तर सर्व लोक आपल्याला दगडमार करतील. कारण योहान संदेष्टा होता, याबद्दल लोकांची पुरेपूर खात्री होती.” शेवटी त्यांनी उत्तर दिले, “तो कुठून होता हे आम्हाला माहीत नाही.” यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.” नंतर लोकांकडे वळून येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने एक द्राक्षमळा लावला. तो मळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन तो बर्याच दिवसासाठी दूर निघून गेला. हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे, म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्यांकडे पाठविला. परंतु शेतकर्यांनी त्याला मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठवून दिले. त्याने दुसर्या सेवकाला त्यांच्याकडे पाठविले, परंतु त्यांनी त्यालासुद्धा मारले आणि लज्जास्पद वागणूक दिली व रिकाम्या हाताने परत पाठविले. तरी त्याने तिसर्याला पाठविले आणि त्यांनी त्याला जखमी केले आणि मळ्याबाहेर फेकून दिले. “तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी स्वतःशीच म्हणाला, ‘मी काय करावे बरे? आता माझा पुत्र ज्याच्यावर मी प्रीती करतो त्याला त्यांच्याकडे पाठवितो. कदाचित ते त्याचा मान राखतील.’ “पण शेतकर्यांनी मालकाच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे. आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ तेव्हा त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून त्याला मारून टाकले. “आता त्या द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करेल? तो येईल आणि त्या भाडेकर्यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्यांना देईल.” लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते म्हणाले, “परमेश्वर करो असे कधीही न होवो!” येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले व विचारले, “तर मग, “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला’ असे जे धर्मशास्त्रात लिहिले आहे, त्याचा अर्थ काय आहे? जे सर्व त्या खडकावर आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.” प्रमुख याजक आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी हा दाखला ऐकला, तेव्हा येशूंना ताबडतोब अटक करण्याचा मार्ग ते शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले पण त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यांच्यावर बारकाईने पाळत ठेऊन, त्यांनी गुप्तहेरांना प्रामाणिक माणसे आहेत असे ढोंग करून त्यांच्याकडे पाठविले यासाठी की येशूंना त्यांच्या शब्दात पकडावे आणि त्यांना राज्यपालाच्या अधिकारकक्षेत आणावे. त्या गुप्तहेरांनी येशूंना प्रश्न विचारला: “गुरुजी, हे आम्हाला माहीत आहे की तुम्ही जे योग्य आहे ते बोलता व शिकविता आणि पक्षपात न करता परमेश्वराचा मार्ग सत्याने शिकविता. आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशूंनी त्यांच्या मनातील कपट ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, “मला एक नाणे दाखवा. या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचे नाव आहे?” “कैसराचे,” त्यांनी उत्तर दिले. मग येशू म्हणाले, “कैसराचे ते कैसराला, जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.” अशा रीतीने लोकांपुढे त्यांना ते शब्दात पकडू शकले नाही. त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि गप्प राहिले.
लूक 20:1-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एके दिवशी तो मंदिरात लोकांना शिक्षण देत व सुवार्ता सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलमंडळासह त्याच्यापुढे येऊन त्याला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण हे आम्हांला सांगा.” तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो; त्याचे मला उत्तर द्या. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा मनुष्यांपासून होता?” तेव्हा ते आपसांत विचार करून म्हणाले, “स्वर्गापासून असे म्हणावे तर हा म्हणेल की, ‘तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ आणि मनुष्यांपासून असे म्हणावे तर सर्व लोक आपल्याला धोंडमार करतील, कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची खातरी आहे.” तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “तो कोणापासून होता हे आम्हांला ठाऊक नाही.” येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो ते मीही तुम्हांला सांगत नाही.” मग तो लोकांना हा दाखला सांगू लागला, कोणाएका मनुष्याने ‘द्राक्षमळा लावला’ आणि तो मळेकर्यांना सोपवून देऊन आपण बरेच दिवस दुसरीकडे जाऊन राहिला. मग मळेकर्यांनी आपणाला द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावीत म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले; परंतु मळेकर्यांनी त्याला ठोक देऊन रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसर्या एका दासाला पाठवले; त्यालाही त्यांनी ठोक देऊन व त्याचा अपमान करून रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने तिसर्याला पाठवले; त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर घालवून दिले. तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, ‘आता मी काय करू? मी आपल्या प्रिय पुत्राला पाठवतो, कदाचित त्याला पाहून ते त्याचा मान राखतील.’ परंतु मळेकरी त्याला पाहून आपसांत विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे; ह्याला आपण जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल.’ मग त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील? तो येऊन त्या मळेकर्यांचा नाश करील व द्राक्षमळा दुसर्यांना देईल.” हे ऐकून ते म्हणाले, “असे न होवो.” त्याने त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, “तर ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे.’ असा जो शास्त्रलेख आहे त्याचा अर्थ काय? जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडेतुकडे होतील; परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगाभुगा करून टाकील.” तेव्हा शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकण्याच्या विचारात होते; पण त्यांना लोकांची भीती वाटली; हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे ते समजले. मग ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत व अधिकारात आणावे म्हणून त्यांनी नीतिमान असल्याची बतावणी केलेले हेर त्याच्याकडे पाठवले. त्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपण योग्य बोलता व शिक्षण देता, आणि तोंडदेखले बोलत नाही, तर देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता हे आम्हांला माहीत आहे. आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “[तुम्ही माझी परीक्षा का पाहता?] मला एक नाणे दाखवा. ह्याच्यावरील मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना लोकांसमक्ष त्याला त्याच्या बोलण्यात धरता येईना, आणि त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.
लूक 20:1-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एके दिवशी येशू मंदिरात शिकवण देत व शुभवर्तमान सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलजनांसह त्याच्यापुढे येऊन त्याला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण, हे आम्हांला सांगा.” त्याने त्यांना उत्तर दिले, “मीदेखील तुम्हांला एक प्रश्न विचारतो. त्याचे मला उत्तर द्या. योहानचा बाप्तिस्मा स्वर्गीय होता किंवा मानवी होता?” ते आपसात विचार करून म्हणाले, “स्वर्गीय असे म्हणावे तर हा म्हणेल, “तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ आणि मानवी असे म्हणावे तर सर्व लोक आपल्यावर धोंडमार करतील कारण योहान संदेष्टा होता, अशी त्यांची खातरी पटलेली आहे.” म्हणून त्यांनी उत्तर दिले, “तो कोणत्या प्रकारचा होता, हे आम्हांला ठाऊक नाही.” नंतर येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो, हे मीसुद्धा तुम्हांला सांगणार नाही.” येशू लोकांना एक दाखला सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला आणि तो कुळांकडे सोपवून देऊन स्वतः बरेच दिवस परदेशी निघून गेला. कुळांनी त्याला द्राक्षमळ्यातील त्याच्या हिश्शाची फळे द्यावीत म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले. परंतु कुळांनी त्याला मारहाण करून रिकामे पाठवून दिले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका दासाला पाठवले. त्यालादेखील त्यांनी मारहाण करून व त्याचा अपमान करून काही न देता पाठवून दिले. त्याने तिसऱ्याला पाठवले. त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर हाकलून लावले. शेवटी द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, ‘आता मी काय करू? मी माझ्या प्रिय पुत्राला पाठवतो. निदान ते त्याचा मान राखतील’, परंतु कुळे त्याला पाहून आपसात विचार करून म्हणाली, ‘हा तर वारस आहे, ह्याला आपण ठार मारू म्हणजे वतन आपलेच होईल.’ त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील?”, येशूने विचारले. “तो येऊन त्या कुळांचा नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांकडे सोपवून देईल”, येशूनेच स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर दिले. हे ऐकून लोक म्हणाले, “असे न होवो.” येशूने त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, “तर मग ‘जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे’, असा जो धर्मशास्त्रलेख आहे, त्याचा अर्थ काय? जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगा भुगा करून टाकील.” शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकायच्या विचारात होते, कारण हा दाखला त्याने त्यांना उद्देशून सांगितला, हे ते समजले. पण त्यांना लोकांची भीती वाटली. म्हणून ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात पकडून रोमन राज्यपालांच्या अधिकाराखाली व सत्तेखाली आणावे म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाचे ढोंग केलेले हेर त्याच्याकडे पाठवले. त्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या बोलण्यात व शिकवणीत आपण पक्षपात करीत नसता. किंबहुना आपण देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता, हे आम्हांला माहीत आहे. आम्ही कैसरला कर द्यावा, हे योग्य आहे की नाही?” तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा. ह्याच्यावरील मुद्रा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.” त्यांना त्याला लोकांसमक्ष त्याच्या बोलण्यात धरता येईना. त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.