मार्क 11
11
येशूंचा राजा म्हणून यरुशलेममध्ये प्रवेश
1ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले, 2“समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून इकडे आणा. 3‘तुम्ही हे का करीत आहात?’ असे जर कोणी तुम्हाला विचारले, तर एवढेच म्हणा की, ‘प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लगेच त्याला पाठवून देतील.’ ”
4ते निघाले व त्यांना एका रस्त्यावर फाटकाच्या बाहेर शिंगरू बांधलेले आढळले. ते सोडू लागले, 5त्यावेळी उभ्या असलेल्या काहींनी विचारले, “तुम्ही बांधलेल्या शिंगरूचे काय करत आहात?” 6येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी उत्तर दिले. तेव्हा त्या माणसांनी त्यांना जाऊ दिले. 7जेव्हा त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले आणि त्यावर बसण्यासाठी आपले वस्त्रे शिंगराच्या पाठीवर घातले, तेव्हा येशू त्यावर बसले. 8अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले आणि दुसर्यांनी शेतातून तोडून आणलेल्या डाहळ्या रस्त्यावर पसरल्या. 9मग जे त्यांच्यापुढे गेले आणि जे त्यांच्यामागून चालले ते मोठ्याने ओरडून म्हणाले:
“होसान्ना!”
“प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!”#11:9 स्तोत्र 118:25‑26
10“आमचा पिता दावीदाचे येणारे राज्य आशीर्वादित होवो!”
“सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”
11येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि ते मंदिराच्या अंगणात गेले. त्यांनी सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले, कारण आता उशीर झाला होता, म्हणून आपल्या बारा शिष्यांबरोबर ते बेथानीस गेले.
अंजिराच्या झाडाला शाप आणि मंदिराचे अंगण स्वच्छ करणे
12दुसर्या दिवशी ते बेथानी सोडत असताना, येशूंना भूक लागली. 13काही अंतरावर पानांनी बहरलेले एक अंजिराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले, त्यावर काही फळे सापडतील या शोधार्थ ते तिथे गेले. तिथे पोहोचल्यावर, त्यांना फक्त पानांशिवाय काही आढळले नाही, कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता. 14तेव्हा येशू झाडाला म्हणाले, “तुझे फळ कोणीही कधीही न खावो.” त्यांचे हे बोलणे शिष्य ऐकत होते.
15यरुशलेमला पोहोचल्यावर, येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्या सर्वांना ते बाहेर घालवून देऊ लागले. पैशाची अदलाबदल करणार्यांचे मेज आणि कबुतरे विकणार्यांची आसने त्यांनी उधळून लावली. 16त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारातून विक्रीच्या मालाची नेआण करण्यासही त्यांनी मनाई केली. 17येशू त्यांना शिकवीत होते, ते म्हणाले, “असे लिहिले नाही का: माझ्या घराला ‘सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना घर म्हणतील,’#11:17 यश 56:7 परंतु तुम्ही ती ‘लुटारूंची गुहा केली आहे.’ ”#11:17 यिर्म 7:11
18येशूंनी काय केले, हे प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षकांनी ऐकले, तेव्हा त्यांना कसे ठार मारता येईल याचा मार्ग ते शोधू लागले. त्यांना येशूंची भीती वाटत होती. कारण त्यांच्या शिक्षणामुळे सर्व समुदाय आश्चर्यचकित झाला होता.
19संध्याकाळ झाली, तेव्हा येशू व त्यांचे शिष्य शहराच्या बाहेर गेले.
20सकाळी जात असताना अंजिराचे झाड मुळापासून सुकून गेले आहे असे त्यांना दिसले! 21पेत्राला आठवण आली आणि त्यांनी येशूंना म्हटले, “गुरुजी, पाहा! ज्याला आपण शाप दिला ते अंजिराचे झाड वाळून गेले आहे!”
22येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वरावर विश्वास ठेवा, 23मी तुम्हाला निश्चित#11:23 काही मूळ प्रतींमध्ये जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर येशू म्हणाले खरोखर सांगतो की, जर कोणी या डोंगराला, ‘ऊठ आणि समुद्रात जाऊन पड,’ असे म्हणेल आणि अंतःकरणात संशय न धरता आपण म्हटले तसे होईल असा विश्वास धरला, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी केली जाईल. 24यास्तव मी तुम्हाला सांगतो की, प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल. 25आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्याची क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला तुमच्या पातकांची क्षमा करतील. 26पण तुम्ही क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.”#11:26 हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही
येशूंच्या अधिकारास आव्हान
27ते परत यरुशलेमला आले, तेव्हा येशू मंदिराच्या आवारात चालत असता, मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले. 28“कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” असे त्यांना विचारू लागले.
29येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर द्या आणि मी हे कोणत्या अधिकाराने करीत आहे, हे मी तुम्हाला सांगेन. 30मला सांगा, योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?”
31या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा ‘स्वर्गापासून होता’ असे जर आपण म्हणालो तर ते विचारतील ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’ 32पण जर आपण म्हणालो, ‘मनुष्यांपासून होता,’ ” त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण योहान संदेष्टा होता असे प्रत्येकजण मानत होता.
33शेवटी त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला माहीत नाही.”
यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.”
सध्या निवडलेले:
मार्क 11: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.