नहेम्या 3
3
तट बांधणारे लोक
1मुख्य याजक एल्याशीब आणि इतर याजकांनी काम सुरू करून मेंढे वेस परत बांधली. ती समर्पित केली आणि तिला दारे लावली, हनानेल मनोऱ्यापासून शंभराचा बुरूज येथपर्यंत बांधकाम केले. 2यरीहो शहराच्या लोकांनी त्याच्या पुढचे बांधकाम केले आणि त्यांच्या शेजारी इम्रीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले.
3मासे फाटक हस्सनाहच्या पुत्रांनी बांधली. त्यांनी तुळया बसविणे, दरवाजे, कड्या व अडसर लावणे आणि गज बसविणे इत्यादी कामे केली. 4हक्कोसचा पुत्र उरीयाह, त्याचा पुत्र मरेमोथाने तटाचा पुढचा भाग दुरुस्त केला. त्याच्या शेजारी मशुल्लाम, बेरेख्याहचा पुत्र, जो मशेजबेलचा पुत्र, त्याने दुरुस्ती केली आणि बाअनाहाचा पुत्र सादोक दुरुस्ती करीत होते. 5त्यांचा पुढील भाग तकोवाच्या लोकांनी दुरुस्त केला. परंतु त्यांच्यातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांच्या मुकादमाच्या देखरेखीखाली कोणत्याही कामाची जबाबदारी घेण्याचे टाळले.
6येशनाह#3:6 किंवा जुने वेस पासेआहचा पुत्र यहोयादा व बसोदयाहचा पुत्र मशुल्लाम यांनी दुरुस्त केली. त्यांनी तुळया घातल्या, दरवाजे उभे केले, त्यांना कड्या, अडसर व लोखंडी गज लावले. 7त्यांच्या शेजारी, पश्चिम फरातच्या राज्यपालाच्या सत्तेखाली असलेल्या गिबोन व मिस्पाह येथील लोकांनी डागडुजीचे काम केले. गिबोनी मलतियाह व मेरोनोथी यादोन आले होते. 8हरहयाहचा पुत्र उज्जीएल व्यवसायाने सोनार होता, त्यानेही पुढच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी अत्तरे तयार करणारा हनन्याह होता. त्यानेसुद्धा डागडुजी केली. या दोघांनी यरुशलेमातील रुंद भिंती पर्यंत डागडुजी केली. 9यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हूरचा पुत्र रफायाहने त्यांच्या शेजारच्या तटाची डागडुजी केली. 10हरूमाफाचा पुत्र यदायाहने आपल्या स्वतःच्या घरासमोरील तटाची डागडुजी केली आणि त्याच्या शेजारीच हशबन्याहचा पुत्र हट्टूशने डागडुजी केली. 11यानंतर हारीमाचा पुत्र मल्कीयाह आणि पहथ-मोआबाचा पुत्र हश्शूब यांनी एका विभागाची आणि भट्टी मनोऱ्याची डागडुजी केली. 12त्याच्या शेजारी यरुशलेमच्या दुसर्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हल्लोहेशचा पुत्र शल्लूमाने व त्याच्या कन्यांनी डागडुजी केली.
13हानून व जानोह येथील लोकांनी खोरे वेशीची डागडुजी केली. तिचे दरवाजे उभे करून त्यांना कड्या, अडसर व गजही लावले. नंतर त्यांनी उकिरडा वेशीपर्यंतच्या एक हजार हात#3:13 अंदाजे 450 मीटर लांबीच्या तटाची दुरुस्ती केली.
14रेखाबाचा पुत्र मल्कीयाहने उकिरडा वेस दुरुस्त केली. मल्कीयाह हा बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी होता. ती वेस बांधल्यावर, त्याने तिचे दरवाजे उभे केले व त्यांना कड्या, अडसर व गज लावले.
15कोल-होजेचा पुत्र शल्लूम मिस्पाह जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने झरा वेशीची दुरुस्ती करून ती परत बांधली, तिच्यावर छत टाकले व दरवाजे उभे करून त्यांना अडसर व गज लावले. नंतर शेलाह#3:15 किंवा सिलोम तळ्यापासून राजाच्या बागेपर्यंतच्या, यरुशलेमच्या दावीदाच्या नगराच्या उतारावरील पायर्यापर्यंतच्या कोटाची त्याने दुरुस्ती केली. 16त्याच्या पलीकडे अजबुकाचा पुत्र नहेम्याह होता. तो बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. त्याने दावीद राजाच्या कबरस्तानापर्यंत, कृत्रिम तळ्यापर्यंत आणि वीरांचे गृह या ठिकाणापर्यंत दुरुस्ती केली.
17त्याच्या शेजारी लेवी बानीचा पुत्र रहूमच्या देखरेखीखाली डागडुजी करीत होता. त्याच्या शेजारी कईलाह जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्याह होता. त्याने आपल्या जिल्ह्यांच्या वतीने डागडुजी केली. 18त्याच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिनुई#3:18 किंवा बव्वई च्या देखरेखीखाली लेव्याच्या वंशजांनी डागडुजी केली. हा बवई कईलाह जिल्ह्याच्या दुसर्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. 19त्यांच्या शेजारी येशूआच्या पुत्र मिस्पाहचा अधिकारी एजेरने एका भागात जिथे तट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते, तिथे डागडुजी केली. 20त्यांच्या शेजारी जक्काईचा#3:20 जक्काई काही हस्तलिखितांमध्ये ज़ब्बाई पुत्र बारूख होता. त्याने कोटाच्या वळणापासून थेट मुख्य याजक एल्याशीबच्या घराच्या दारापर्यंत उत्साहाने डागडुजी केली. 21त्याच्या शेजारी हक्कोसचा पुत्र उरीयाहचा पुत्र मरेमोथने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून शेवटापर्यंतचा कोटाचा भाग दुरुस्त केला.
22मग सभोवती राहणारे याजक आले व त्यांनीही पुढील दुरुस्ती केली. 23त्यांच्या शेजारी बिन्यामीन व हश्शूब यांनी आपल्या घरासमोरील भागाची दुरुस्ती केली. त्यांच्या शेजारी मासेयाहचा पुत्र, जो अनन्याहचा पुत्र अजर्याहाने आपल्या घराजवळ डागडुजी केली. 24त्यांच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिन्नुईने अजर्याहच्या घरापासून कोपर्यापर्यंतच्या कोटाचा भाग बांधला. 25उजईचा पुत्र पलालने कोट कोपर्यापासून राजवाड्याच्या वरच्या माळाजवळील तुरुंगाच्या अंगणापर्यंत काम करून बुरुजाचीही डागडुजी केली. त्याच्या शेजारी पारोशाचा पुत्र पदायाहनेही डागडुजी केली. 26ओफेलमध्ये राहणार्या मंदिराच्या सेवकांनी पूर्वेकडील पाण्याच्या वेशीपर्यंत कोटाची दुरुस्ती केली आणि बुरुजाचा पुढे आलेला भागही दुरुस्त केला. 27तकोवा येथील लोकांनी मनोऱ्याच्या बुरुजाच्या समोर असलेला भाग आणि ओफेलाच्या तटापर्यंतचा भाग दुरुस्त केला.
28याजकांनी घोडे वेशीपासून प्रत्येकाने आपल्या घरासमोरील कोटाचा भाग दुरुस्त केला. 29इम्मेराचा पुत्र सादोकानेही आपल्या घरासमोरचा कोट परत बांधला, त्याच्या पलीकडे शखन्याहचा पुत्र शमायाह, जो पूर्ववेशीचा द्वारपाल होता, त्यानेही डागडुजी केली. 30त्याच्या शेजारी शेलेम्याहचा पुत्र हनन्याह, सलाफाचा सहावा पुत्र हानून यांनी दुरुस्ती केली, त्याच्यापुढे बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम होता. त्याने आपल्या घरासमोरची भिंत दुरुस्त केली. 31सोनारांपैकी मल्कीयाहने मंदिराच्या सेवकांच्या व व्यापार्यांच्या घरांपर्यंतच्या निरीक्षण वेशीपर्यंतच्या आणि कोपर्यावरील वरच्या कोठडीपर्यंतच्या कोटाची दुरुस्ती केली. 32इतर सोनारांनी आणि व्यापार्यांनी त्या कोपर्यापासून मेंढेवेशीपर्यंत कोटाची डागडुजी केली.
सध्या निवडलेले:
नहेम्या 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.