YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 5

5
नहेम्याहची गरिबास मदत
1काही काळानंतर स्त्रीपुरुषांनी आपल्या यहूदी बांधवांविरूद्ध तक्रार करण्यास सुरुवात केली. 2काहीजण म्हणाले, “आम्ही व आमचे पुत्र व कन्या असे बरेच लोक आहोत आणि जिवंत राहण्यासाठी आम्हाला धान्याची गरज आहे.”
3दुसरे म्हणाले, “दुष्काळापासून जीव वाचवावा म्हणून धान्य मिळविण्यासाठी आम्हाला आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागली आहेत.”
4आणखी दुसरे काही म्हणाले, “आमची शेते आणि द्राक्षमळे यावरील राजाचा कर भरता यावा म्हणून आम्हाला कर्जाऊ पैसे काढावे लागले आहेत. 5आम्ही त्यांचेच बांधव आहोत आणि आमची मुले त्यांच्या मुलांबाळांसारखीच आहेत, तरीसुद्धा जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळावेत म्हणून आम्हाला आमची मुले व मुली गुलाम म्हणून कामाला लावावी लागतात. आमच्या काही कन्या आम्ही आधीच गुलाम म्हणून विकलेल्या आहेत, पण आम्ही असमर्थ आहोत, कारण आमची शेते व द्राक्षमळेसुद्धा इतरांचे झाले आहेत.”
6जेव्हा मी त्यांचा हा आक्रोश व या तक्रारी ऐकल्या, तेव्हा मी अतिशय संतापलो. 7या परिस्थितीवर विचार केल्यानंतर मी या प्रतिष्ठितांना व अधिकार्‍यांना म्हणालो, “तुम्ही स्वतःच्याच देशबांधवांकडून व्याज गोळा करीत आहात!” मग त्यांचा समाचार घेण्यासाठी मी एक मोठी सभा बोलाविली. 8या सभेत मी त्यांना म्हणालो, “आम्ही गैरयहूद्यांना गुलामगिरीत विकलेल्या आपल्या यहूदी बांधवांना शक्य होईल तितक्यांना परत आणले आहे. आता तुम्ही मात्र तुमच्याच लोकांना विकून, त्यांना पुन्हा आम्हाला विकत आहात! त्यांची सुटका आम्ही किती वेळा करावी?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले कारण त्यांना त्यावर उत्तरच सापडले नाही.
9मग मी पुढे म्हणालो, “तुम्ही जे करीत आहात, ते अयोग्य आहे. आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये आपली निंदा होऊ नये म्हणून तुम्ही परमेश्वराचे भय बाळगू नये काय? 10मी व माझे बंधू, आणि माझे लोक कोणतेही व्याज न घेता पैसे आणि धान्य उसने देत आहोत. आपण हे व्याज घेणे बंद केले पाहिजे! 11त्यांची शेते, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे त्यांना लगेच परत करा व पैसे, धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यावरील एक टक्का जे व्याज म्हणून तुम्ही त्यांच्याकडून घेता ते सोडून द्या.”
12त्यांनी म्हटले, “आम्ही त्यांना सर्वकाही परत देऊ. आणि त्यांच्याकडून काहीही मागणी करणार नाही. तुम्ही म्हणता तसेच आम्ही करू.”
मग मी याजकांना बोलाविणे पाठविले, प्रतिष्ठित व इतर अधिकाऱ्यांकडून त्यांनी जे वचन दिले होते, त्या शपथा घेण्यास लावल्या. 13व माझ्या अंगरख्याची दुमड धरून तो झटकून म्हटले, “जो कोणी या शपथेचे पालन करणार नाही, परमेश्वर त्याची घरे व त्याची संपत्ती असेच झटकून टाकेल. तर असा मनुष्य असाच झटकला जाऊन पूर्णपणे रिकामा होवो!”
यावर सभेतील सर्व लोक म्हणाले, “आमेन” आणि त्यांनी याहवेहची स्तुती केली. सर्व लोकांनी आपल्या वचनाप्रमाणे केले.
14याशिवाय, अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंतच्या—बारा वर्षांच्या संपूर्ण कालावधीत मी यहूदीयाचा राज्यपाल असताना, माझ्या बंधूंनी आणि मी राज्यपालास नेमून दिलेल्या अन्नाचा वाटा घेतला नाही. 15पण माझ्यापूर्वी असलेल्या राज्यपालांनी लोकांवर फारच जड ओझी लादली आणि त्यांच्याकडून अन्न व द्राक्षारसाशिवाय चांदीची चाळीस शेकेल#5:15 अंदाजे 460 ग्रॅ. यांची मागणी ते करीत असत. त्यांचे उपाधिकाराही प्रजेचे शोषण करीत. परंतु मी परमेश्वराच्या भयात राहून त्यांच्याप्रमाणे वागलो नाही. 16याउलट मी सर्व शक्तिनिशी तटाच्या कामास समर्पित राहिलो. माझे सेवकही एकत्र येऊन कामास लागले. आम्ही कोणत्याही जमिनीची खरेदी केली नाही.
17माझ्या मेजावर नियमितपणे दीडशे यहूदी व त्यांचे अधिकारी जेवण करीत असत. त्याचप्रमाणे शेजारच्या राष्ट्रांतून आलेल्या लोकांनाही मी जेवू घालीत असे. 18दररोज एक बैल, सहा पुष्ट मेंढरे, काही पक्षी यापासून बनविलेले अन्न माझ्यासाठी शिजविण्यात येत असे. तसेच दर दहा दिवसांनी मी त्यांना सर्वप्रकारचे द्राक्षारस विपुल प्रमाणात पुरवित असे. इतके असूनही राज्यपालांना जो भोजनभत्ता मिळण्याचा हक्क होता, तो मी कधीही मागितला नाही, कारण या सेवा लोकांना भारी पडत होत्या.
19हे माझ्या परमेश्वरा, मी जे काही या लोकांसाठी केले आहे, त्याबद्दल प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा.

सध्या निवडलेले:

नहेम्या 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन