YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 5

5
छावणीची शुद्धता
1याहवेहने मोशेला म्हटले, 2इस्राएली लोकांना आज्ञा दे की, ज्यांना चर्मरोग#5:2 कातडीच्या वेगवेगळ्या आजारांसाठी हा शब्द वापरला जात असे. आहे किंवा कोणत्याही प्रकारचा स्राव आहे किंवा जो मृतदेहाच्या विधीमुळे अशुद्ध झाला आहे, त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे. 3मग ते स्त्री असो किंवा पुरुष; त्यांना बाहेर पाठवावे. ज्या छावणीत मी तुमच्यामध्ये राहतो, ती त्यांच्यामुळे भ्रष्ट होऊ नये, म्हणून त्यांना बाहेर पाठवावे. 4त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले; त्यांनी त्यांना छावणीबाहेर पाठविले. याहवेहने मोशेला सूचना दिली होती तसेच त्यांनी केले.
अपराधाबद्दल भरपाई
5याहवेह मोशेला म्हणाले, 6“इस्राएली लोकांस सांग, ‘जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री एखाद्याविरुद्ध कोणताही अपराध करेल, तो याहवेहच्या विरुद्ध विश्वासघात असून तो दोषी आहे. 7त्यांनी केलेले पाप कबूल करावे. त्यांनी केलेल्या पापाची पूर्ण भरपाई करून द्यावी, त्यात त्याचा पाचवा भाग मिळवून ज्या व्यक्तीविरुद्ध पाप केला आहे त्याला द्यावा. 8परंतु पापाची भरपाई करण्यासाठी त्या व्यक्तीचा कोणीही जवळचा नातेवाईक नसेल तर ती भरपाई याहवेहची असावी आणि पापासाठी प्रायश्चित करण्याच्या मेंढ्यासह ती याजकाकडे द्यावी. 9सर्व पवित्र भेटी, ज्या इस्राएली लोक याजकाकडे आणतात त्या याजकाच्या व्हाव्या. 10पवित्र वस्तू त्यांच्या मालकाच्या आहेत, परंतु ते जे याजकाला देतात, ते याजकाच्या मालकीचे होईल.’ ”
अविश्वासू पत्नीसाठी परीक्षा
11मग याहवेह मोशेला म्हणाले, 12“इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जर एखाद्या मनुष्याच्या पत्नीचे वाकडे पाऊल पडले आणि ती त्याच्याशी अविश्वासूपणे वागली, 13जेणेकरून दुसर्‍या पुरुषाचे तिच्याशी लैंगिक संबंध असले आणि हे तिच्या पतीपासून गुपित असेल आणि तिची अशुद्धता उघडकीस आली नाही (कारण तिच्याविरुद्ध कोणीही साक्षीदार नाही आणि ती त्या कृत्यात पकडली गेली नाही), 14आणि जर तिच्या पतीला मत्सराची भावना झाली आणि तो आपल्या पत्नीवर संशय घेतो की ती अशुद्ध आहे—किंवा त्याच्या मनात मत्सराची भावना निर्माण झाली आणि ती जरी अशुद्ध नसली तरीही तो संशय घेतो— 15तर त्याने आपल्या पत्नीला याजकाकडे न्यावे. त्याने तिच्या वतीने सोबत एक एफाचा दहावा भाग#5:15 अंदाजे 1.6 कि.ग्रॅ. जवाचे पीठ आणावे. त्याने त्यावर जैतुनाचे तेल ओतू नये किंवा त्यावर धूप ठेवू नये, कारण हे मत्सरासाठी केलेले अन्नार्पण आहे, अपराधाची आठवण देणारे स्मरणाचे अर्पण आहे.
16“ ‘याजकाने त्या स्त्रीला आणावे आणि तिला याहवेहसमोर उभे करावे. 17मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे आणि निवासमंडपाच्या भूमीवरील थोडी धूळ घेऊन त्या पाण्यात टाकावी. 18नंतर याजकाने तिला याहवेहपुढे उभे केल्यानंतर, त्याने तिचे केस मोकळे सोडावे आणि तिच्या स्मरणाचे अर्पण, मत्सरासाठी केलेले अन्नार्पण तिच्या हातावर ठेवावे व त्याने शाप आणणारे कडू पाणी आपल्या हाती घ्यावे. 19मग याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, “जर कोणी पुरुषाने तुझ्याशी लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत आणि तू आपल्या पतीशी विवाहित असताना निर्दोष असून वाकडे पाऊल टाकले नाही, तर या कडू पाण्यापासून मिळणारा शाप तुला अपाय न करो. 20परंतु जर तू तुझ्या पतीशी विवाहित असतानाही वाकडे पाऊल टाकले आहे आणि आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवून स्वतःला भ्रष्ट केले आहेस— 21यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो. 22शाप देणारे हे पाणी तुझ्या शरीरात जावो, म्हणजे तुझे पोट फुगेल किंवा तुझा गर्भपात होईल.”
“ ‘मग त्या स्त्रीने म्हणावे, “आमेन. असेच होवो.”
23“ ‘तेव्हा याजकाने हे शापाचे शब्द एका गुंडाळीवर लिहून ते शब्द त्या कडू पाण्यात धुवावे. 24ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल. 25याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे. 26त्या अन्नार्पणाचे प्रतीक म्हणून याजकाने त्या अर्पणातील मूठभर अन्न घेऊन ते वेदीवर जाळावे; व त्यानंतर त्याने ते पाणी त्या स्त्रीला प्यायला द्यावे. 27जर ती आपल्या पतीशी अविश्वासू राहून तिने स्वतःला भ्रष्ट केले असेल, तर त्याचा परिणाम असा असेल: जेव्हा तिला ते शाप आणि कडवट कष्ट आणणारे पाणी पाजले जाईल, ते तिच्या शरीरात जाईल, तिचे पोट फुगेल आणि तिचे उदर गर्भपात करेल आणि ती शापित होईल. 28पण त्या स्त्रीने जर स्वतःला भ्रष्ट केलेले नाही आणि ती शुद्ध असेल, तर ती निर्दोष ठरविली जाईल आणि तिला मुलेबाळे होतील.
29“ ‘जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीशी विवाहित असतानाही स्वतःला भ्रष्ट करते तेव्हा हा मत्सराचा नियम असावा, 30किंवा जेव्हा एखाद्या पुरुषाच्या मनात मत्सराची भावना येते, कारण तो आपल्या पत्नीवर संशय घेतो, याजकाने तिला याहवेहसमोर उभे करावे आणि हा संपूर्ण नियम तिला लागू करावा. 31तिचा पती कोणत्याही अन्यायापासून निर्दोष असेल, परंतु ती स्त्री आपल्या पापाचे परिणाम भोगेल.’ ”

सध्या निवडलेले:

गणना 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन