13
1सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो,
परंतु उपहास करणारा पुत्र फटकारास प्रतिसाद देत नाही.
2मनुष्याला आपल्या मुखफळांनी उत्तम वस्तू प्राप्त होतील,
परंतु कपटी माणसांना हिंसाचाराची भूक लागते.
3जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो,
परंतु जो विचार न करता बोलतो, त्याचा नाश होतो.
4आळशी मनुष्याची भूक कधीही मिटत नाही,
परंतु परिश्रमी मनुष्याच्या इच्छांचे पूर्णपणे समाधान केले जाते.
5नीतिमान मनुष्य असत्याचा तिरस्कार करतो,
परंतु दुष्ट मनुष्य स्वतःस दुर्गंधपूर्ण करतो
आणि आपली बेअब्रू करून घेतो.
6नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते,
परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते.
7एखादी व्यक्ती श्रीमंतीचा दिखावा करते, परंतु त्याच्याकडे काहीच नसते;
दुसरा एकजण गरीब असल्याचा दिखावा करतो, परंतु त्याच्याकडे खूप संपत्ती असते.
8मनुष्याची श्रीमंती त्याच्या जिवासाठी खंडणी देईल,
परंतु गरीब मनुष्य अशा धमकीला प्रतिसाद देऊ शकत नाही.
9नीतिमानाचा प्रकाश तेजाने चकाकतो,
परंतु दुष्टांची ज्योत विझवली जाते.
10जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे,
परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.
11कपटाने मिळविलेला पैसा झिजून नाहीसा होतो,
पण जो हळूहळू कष्ट करून पैसे जमा करतो, तो त्यात वाढ करतो.
12आशेची प्राप्ती लांबणीवर पडल्याने हृदय खिन्न होते,
परंतु पूर्ण झालेली इच्छा, जीवनाचा वृक्ष ठरते.
13जो शिक्षण तुच्छ लेखतो, तो त्याचा परिणाम भोगेल,
पण जो आज्ञेचा मान राखतो, त्याला चांगले प्रतिफळ मिळेल.
14सुज्ञ मनुष्याचा सल्ला जीवनाचा झरा आहे.
तो मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवितो.
15उत्तम बोधामुळे अनुकूलता मिळते,
परंतु विश्वासहीनांचे मार्ग त्यांना नाशाकडे नेतात.
16जे सर्व समंजस असतात ते सुज्ञतेने#13:16 किंवा स्वतःचे रक्षण करतो वागतात,
परंतु मूर्ख माणसे त्यांचा मूर्खपणा उघड करतात.
17दुष्ट निरोप्या संकटात पडतो,
परंतु विश्वासू राजदूत आरोग्य आणतो.
18जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात,
पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल.
19अभिलाषेची तृप्ती जीवाला मधुरता प्रदान करते,
परंतु मूर्ख वाईटापासून वळण्याचा तिरस्कार करतात.
20सुज्ञ मनुष्याबरोबर मैत्री कर आणि सुज्ञ हो,
कारण मूर्खांच्या सोबतीने नुकसान सहन करावे लागते.
21अरिष्ट पातक्यांच्या पाठीस लागते,
परंतु नीतिमानांना कल्याण हे प्रतिफळ मिळेल.
22चांगला मनुष्य त्यांच्या नातवंडांसाठी वतन ठेवून जातो,
परंतु पापी मनुष्याने साठविलेले धन नीतिमानांसाठी असते.
23विना नांगरलेल्या शेतातही गरिबांसाठी धान्य उत्पन्न होते;
परंतु अन्याय ते हिरावून नेते.
24जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात,
परंतु जे त्यांच्या लेकरांवर प्रेम करतात, ते त्यांना काळजीपूर्वक शिस्त लावतात.
25नीतिमान मनुष्य जिवाचे समाधान होईपर्यंत खातो,
परंतु दुर्जनाचे पोट रिकामेच राहते.