14
1सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते,
परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते.
2जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो,
परंतु जे त्यांचा तिरस्कार करतात त्यांचा मार्ग कपटी असतो.
3मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते,
पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात.
4जिथे कुठे बैल नाहीत तेथील गोठा रिकामा राहतो,
परंतु बैलाच्या शक्तीने विपुल धान्याचा उपज होतो.
5खरा साक्षीदार कधीच फसवणूक करीत नाही,
परंतु खोटा साक्षीदार मुखातून असत्य ओततात.
6टवाळखोर ज्ञान शोधतो आणि ते त्याला मिळत नाही,
परंतु ज्ञान विवेकी मनुष्याकडे सहजपणे येते.
7मूर्खापासून दूर राहा;
त्यांच्या बोलण्यातून तुला ज्ञान मिळणार नाही.
8सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते,
पण मूर्खाची मूर्खता धोका आहे.
9मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते,
परंतु नीतिमान लोकांमध्ये सदिच्छा असतात.
10प्रत्येक अंतःकरणाला स्वतःचे दुःख माहीत असते;
आणि इतर कोणीही त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही.
11दुष्टांचे घर नाश केले जाईल,
परंतु नीतिमानाचा तंबू समृद्ध होईल.
12एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो;
परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो.
13हसत असतानाही हृदयात वेदना असू शकते,
उल्हासाचा अंत दुःखातही होऊ शकतो.
14विश्वासहीनांना त्यांच्या मार्गाची फळे पूर्ण भोगावी लागतील,
तसेच चांगल्या माणसांना त्यांच्या चांगुलपणाची.
15साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात.
परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो.
16सुज्ञ मनुष्य याहवेहचे भय बाळगतो आणि वाईटापासून दूर राहतो.
परंतु मूर्ख तापट डोक्याचा आहे आणि तरीही त्याला सुरक्षित वाटते.
17तापट मनुष्य मूर्खपणाच्या गोष्टी करतो,
आणि दुष्टसंकल्पांची योजना करणाऱ्याचा तिरस्कार केला जाईल.
18साध्याभोळ्याला मूर्खपणाचा वारसा मिळतो,
तर सुज्ञाला सुज्ञतेचा मुकुट मिळतो.
19दुष्ट माणसे चांगल्या माणसांसमोर,
आणि पापी माणसे नीतिमानांच्या द्वारासमोर शरणागती पत्करतील.
20गरिबांना त्यांचे शेजारीसुद्धा टाळतात,
परंतु श्रीमंतांना मात्र खूप मित्र असतात.
21शेजार्यांचा द्वेष करणे पाप आहे;
परंतु जे गरजवंतावर दया करतात ते धन्य!
22वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय?
परंतु चांगल्या योजना करणार्यांना प्रीती आणि विश्वासूपणा मिळतो.
23सर्व कष्टाच्या कामाने नफा मिळतो,
पण व्यर्थ बडबड भिकेला लावते.
24सुज्ञांची संपत्ती त्यांचा मुकुट असतो,
परंतु मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच उत्पन्न करते.
25सत्य सांगणारा साक्षीदार प्राण वाचवितो,
परंतु खोटा साक्षीदार विश्वासघातकी आहे.
26याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे,
आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते.
27याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे,
ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते.
28वाढती लोकसंख्या राजाचे वैभव आहे;
पण लोकच नसले तर अधिपती नष्ट होतो!
29जो सहनशील आहे, तो मोठा शहाणा आहे;
पण उतावळ्या स्वभावाचा मनुष्य मूर्खता प्रकट करतो.
30शांत हृदय शरीर निरोगी ठेवते;
परंतु ईर्षा हाडे कुजविते.
31गरिबांवर जुलूम करणारा आपल्या उत्पन्नकर्त्याचा अपमान करतो;
पण ज्यांना गरजवंताची दया येते, ते परमेश्वराचा सन्मान करतात.
32नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात.
पण जेव्हा संकट येते तेव्हा दुर्जन चिरडले जातात.
33सुज्ञता विवेकी माणसाच्या हृदयास विश्रांती आणते;
पण मूर्खासही ती स्वतःची ओळख करून देते.#14:33 किंवा परंतु मूर्खाचे अंतःकरण तिला ओळखत नाही
34नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते.
पण पाप कोणत्याही लोकास निंदनीय ठरविते.
35सुज्ञ सेवक राजाला प्रसन्न करतो,
परंतु निर्लज्ज सेवक राजास क्रोधिष्ट करतो.