15
1कोमल उत्तराने राग शांत होतो,
परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात.
2सुज्ञाची जिव्हा ज्ञानाने सुशोभित असते,
परंतु मूर्खाचे तोंड मूर्खपणाच ओकते.
3याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत,
सज्जनांवर व दुर्जनांवर त्यांची नजर असते.
4सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे,
पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते.
5मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो,
पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.
6नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते,
परंतु दुष्टांची मिळकत विनाश आणते.
7सुज्ञ व्यक्तीचे मुख ज्ञान पसरवितात,
पण मूर्खांचे ह्रदय सरळ नसते.
8याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे,
पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते.
9दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात,
पण जे नीतिमत्तेचा माग धरतात, त्यांच्यावर ते प्रीती करतात.
10जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते;
आणि जे सुधारणेचा तिरस्कार करतील ते मृत्युमुखी पडतील.
11मृत्यू आणि नाश याहवेह यांच्या दृष्टीपुढे आहेत—
त्याअर्थी त्यांना मानवी हृदयाचे ज्ञान कितीतरी अधिक असेल!
12उपहास करणार्यांना सुधारणेचा राग येतो,
म्हणून ते ज्ञानी लोकांस टाळतात.
13आनंदी मन चेहरा उल्हासित करते,
आणि शोकाकुल हृदयाने आत्मा खिन्न होतो.
14सुज्ञ अंतःकरण ज्ञानाचा माग घेते,
परंतु मूर्खाच्या मुखाचे मूर्खतेनेच पोषण होते.
15पीडित मनुष्याचे सर्व दिवस क्लेशपूर्ण असतात,
परंतु आनंदी अंतःकरणासाठी सर्व दिवस उत्सवाचे असतात.
16अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे,
यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे.
17तिरस्काराने वाढलेल्या पुष्ट वासराच्या मेजवानीपेक्षा
प्रीतीने वाढलेले थोडेसे शाकाहारी जेवण बरे.
18तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो,
तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो.
19आळशी माणसाच्या वाटेवर काटेरी कुंपणासारखे अडथळे असतात,
परंतु नीतिमानाची वाट राजमार्ग असतो.
20समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो,
परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो.
21मूर्खपणा विवेकहीन मनुष्यास आनंदित करतो,
पण विवेकशील मनुष्य सरळ मार्ग धरून राहतो.
22उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात;
परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात.
23समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो—
योग्य वेळी उपयुक्त सल्ला मिळणे किती महत्त्वाचे आहे!
24सुज्ञासाठी जीवनाचा मार्ग वर चढविणारा असतो
तो त्याला खाली मृतलोकात जाण्यापासून रोखतो.
25गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात,
परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात.
26दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात,
परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात.
27लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात,
परंतु जो लाच घेणे घृणित मानतो, तो जगेल.
28नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते,
परंतु दुष्टाच्या मुखातून दुर्वचनाचा प्रवाह निघतो.
29याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात,
पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.
30निरोप्याच्या नजरेतील चमक हृदयाला आनंद देते,
आणि शुभवार्ता हाडांना आरोग्य देते.
31जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो,
तो सुज्ञांसह वास करेल.
32जे शिस्तीकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचा तिरस्कार करतात,
परंतु जो सुधारणेकडे लक्ष लावतो तो समंजसपणा प्राप्त करतो.
33याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय,
आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते.