5
व्यभिचाराविरुद्ध ताकीद
1माझ्या मुला, माझ्या सुज्ञानाकडे लक्ष दे,
माझ्या अंतर्ज्ञानाच्या शब्दांकडे तुझे कान लाव;
2म्हणजे विवेकबुद्धीने कसे वागावे हे तुला समजेल;
आणि तुझी जीभ ज्ञानाचे रक्षण करेल.
3कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते,
आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो;
4परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते,
आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.
5तिचे पाय मृत्यूकडे जातात;
तिची पावले सरळ अधोलोकी नेतात.
6जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही;
तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते.
7मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका;
माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका.
8तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव,
तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस,
9असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्यांना द्यावा
आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी,
10तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये
आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्याचे घर समृद्ध होऊ नये.
11तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल
तेव्हा तू दुःखाने विव्हळशील.
12तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला!
माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली!
13मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे
किंवा मला मार्गदर्शन करणार्यांकडे मी कानाडोळा करीत असे.
14आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे
गंभीर अडचणीत आलो.”
15तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी.
तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.
16तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय,
तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय?
17ते फक्त तुझ्यासाठीच असावेत,
अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत.
18तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो;
आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे.
19प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती—
तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत,
तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.
20माझ्या मुला, तू दुसर्या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस?
आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?
21कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत,
आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.
22दुष्ट मनुष्याचा नाश स्वतःच्याच पातकांनी होतो;
त्याचीच पातके दोर बनून त्याला पाशात पकडून ठेवतात.
23कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल,
आणि स्वतःच्याच अतिमूर्खपणाने ते फसविले जातील.