6
मूर्खपणाबाबत चेतावणी
1माझ्या मुला, जर तू तुझ्या शेजार्याला जामीन राहिला आहेस,
जर अनोळखी व्यक्तीचे कर्ज फेडण्यास तू वचनबद्ध झालास,
2तर तू जे काही बोललास, त्यामुळे तू जाळ्यात सापडला आहेस,
तुझ्या मुखातील वचनाने तू स्वतःला पाशात गुंतवून घेतले आहेस.
3म्हणून माझ्या मुला, स्वतःला सोडवून घेण्यासाठी तू असे कर,
कारण तू तुझ्या शेजार्याच्या हाती सापडला आहेस:
तर आता स्वतःला विनम्र करून त्याच्याकडे जा,
आणि तुझ्या शेजार्याची झोप उडवून टाक!
4तुझ्या डोळ्यांना झोप येऊ देऊ नकोस,
तुझ्या पापण्यास डुलक्या घेऊ नयेत.
5शिकार्याच्या हातातून निसटलेल्या हरिणासारखे,
पारध्याच्या जाळ्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे तू स्वतःला मुक्त कर.
6अरे आळशा, मुंगीकडे जा;
तिचे मार्ग लक्षात घे आणि शहाणा हो!
7तिला कोणीही अधिकारी,
मुकादम किंवा अधिपती नाही,
8तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते
आणि कापणीच्या हंगामात तिचे अन्न गोळा करते.
9परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील?
तुझ्या झोपेतून तू केव्हा जागा होणार आहेस?
10आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी
उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—
11आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल
आणि हत्यारबंद मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.
12त्रास देणारा आणि दुष्कर्मी मनुष्य,
जो विपरीत गोष्टी बोलत फिरतो,
13तो आपले डोळे मिचकावितो,
आपल्या पायांनी इशारे करतो,
आणि आपल्या हाताच्या बोटांनी खुणावतो.
14जो त्याच्या हृदयात फसवणुकीच्या दुष्ट योजना करतो—
तो नेहमीच भांडणाला चेतावणी देतो.
15म्हणून त्याच्यावर अचानक आपत्ती येईल;
अकस्मात त्याचा नाश होईल, त्यावर कोणताही इलाज नसेल.
16याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात,
त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:
17गर्विष्ठ नजर,
खोटे बोलणारी जीभ,
हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,
18हृदय, जे दुष्ट योजना करते
पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात.
19खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो,
आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.
व्यभिचाराविरुद्ध इशारा
20माझ्या मुला, तू तुझ्या पित्याची आज्ञा पाळ,
आणि आपल्या आईचे शिक्षण सोडू नकोस.
21त्यांचे उपदेश तू सतत आपल्या हृदयात बाळग;
ते तुझ्या गळ्यात बांधून ठेव.
22तू चालशील, तेव्हा ते तुला मार्ग दाखवेल;
तू झोपशील, तेव्हा ते तुझे संरक्षण करतील;
आणि तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलतील.
23कारण ही आज्ञा एक दीपक आहे,
आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे;
आणि ही सुधारणा व बोधवचने
जीवनाचे मार्ग आहेत.
24ते तुला तुझ्या शेजार्याच्या पत्नीपासून दूर ठेवतात,
वाईट स्त्रीच्या लाडिक शब्दांपासून सांभाळतात.
25तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस,
किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस.
26कारण एका भाकरीचे मोल देऊन वेश्या मिळू शकते,
परंतु दुसर्या मनुष्याची पत्नी तुझ्या जीविताची शिकार करते.
27मनुष्याने आपल्या उराशी निखारे बाळगले,
तर त्याची वस्त्रे जळून जाणार नाहीत काय?
28मनुष्य जळत्या कोळशावरून चालल्यास
त्याचे पाय पोळणार नाहीत काय?
29तो असा मनुष्य आहे जो दुसर्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो;
तिला स्पर्श करणार्या कोणाही मनुष्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
30भुकेला असताना भूक भागविण्यासाठी जो चोरी करतो,
त्याचा लोक तिरस्कार करीत नाहीत.
31तरीही जर तो चोर सापडला जातो, तर त्याला सातपट भरपाई करावी लागते,
त्याला त्याच्या घरातील सर्व संपत्ती विकावी लागते.
32परंतु जो मनुष्य जारकर्म करतो त्याच्याकडे समज नसते;
जो कोणी तसे करतो तो स्वतःचाच नाश करतो.
33त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील,
आणि त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही.
34कारण मत्सर नवर्यास संतप्त करतो
आणि जेव्हा तो सूड घेतो, तेव्हा तो दयामाया दाखविणार नाही.
35तो कोणतीही नुकसान भरपाई स्वीकारणार नाही;
कितीही मोठी लाच असली तरी ती तो घेण्यास नकार देईल.