7
व्यभिचारिणीपासून सावध राहणे
1माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव,
आणि माझ्या आज्ञांचा तुझ्या अंतःकरणात संग्रह करून ठेव.
2माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील;
तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझ्या शिक्षणाचे रक्षण कर.
3तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव;
तुझ्या हृदयाच्या पटलावर त्या लिहून ठेव.
4“तू माझी बहीण आहेस,” असे सुज्ञानाला,
आणि “तू माझा नातेवाईक आहेस.” असे अंतर्ज्ञानाला म्हण.
5म्हणजे व्यभिचारी स्त्रीपासून ते तुला दूर ठेवतील,
वाईट स्त्रीच्या मोहक शब्दांपासून ते तुझे रक्षण करतील.
6माझ्या घराच्या खिडकीच्या
जाळीतून मी खाली पाहिले.
7साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले,
तरुणांचे मी अवलोकन केले,
तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला.
8तो तिच्या रस्त्याच्या कोपर्याजवळून जात होता,
सरळ तिच्या घराच्या दिशेने जात होता.
9दिवसाच्या संधिप्रकाशात,
संध्याकाळच्या अंधारात होता.
10तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली,
तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.
11(ती बेशिस्त आणि उर्मट आहे,
तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;
12आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे
प्रत्येक कोपर्यावर ती लपून बसते.)
13तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले,
आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली:
14आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत,
आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे.
15म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले;
मी तुला शोधले आणि तू मला सापडलास!
16मी माझा पलंग इजिप्त येथील
सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.
17ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी
मी माझी शय्या सुवासिक केली आहे.
18चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ;
आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ!
19कारण माझे पती घरी नाहीत;
ते दूर प्रवासाला गेले आहेत;
20त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे,
आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत.
21तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले;
गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले.
22जसा बैल कापणार्याकडे जातो,
तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला,
हरिण#7:22 किंवा मूर्ख जसे दोर्यांच्या फासात पाय टाकते
23तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो,
ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो,
त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे.
24तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका,
मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या.
25तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका
किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका.
26कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे;
होय, अनेक बलवान पुरुषांना तिने ठार केले आहे.
27तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग,
आणि खाली मृत्यूच्या खोल्यांकडे नेणारा मार्ग आहे.