YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 10

10
स्तोत्र 10
1याहवेह, तुम्ही दूर का उभे आहात?
संकटसमयी तुम्ही स्वतःला का लपविता?
2दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो,
त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात.
3कारण हा दुष्ट मनुष्य स्वतःच्या दुष्ट वासनांची बढाई मारतो;
तो लोभी लोकांना आशीर्वाद देतो व याहवेहची निंदा करतो.
4दुष्ट त्याच्या गर्विष्ठपणामुळे परमेश्वराचा घेतच नाहीत;
परमेश्वराचा विचारही त्याच्या मनात येत नाही.
5दुष्टाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळते;
तुमच्या नियमांचा तो तिरस्कार करतो.
त्याच्या विरोधकांकडे तो तुच्छतेने बघतो.
6तो स्वतःशीच म्हणतो, “मला कधीही काही हलवू शकणार नाही.”
“मला कोणीही काही इजा करणार नाही,” अशी फुशारकी तो मारतो.
7लबाडी व धमक्यांनी त्याचे मुख भरलेले आहे;
त्याच्या जिभेखाली उपद्रव आणि दुष्टता आहे.
8गावात तो दबा धरून बसतो;
गुप्तस्थळी तो निर्दोषाचे रक्त पाडतो.
त्याची नजर असहाय्याची शिकार करण्यासाठी टपलेली असते;
9तो सिंहासारखा दबा धरून बसतो;
तो लाचार लोकांना पकडण्याच्या प्रतिक्षेत असतो;
तो दीनांना पकडून आपल्या जाळ्यात ओढत नेतो.
10बळी पडलेले लोक त्याच्या प्रबळ शक्तीखाली दडपले जातात,
त्याच्या प्रहारांनी चिरडले जातात.
11तो स्वतःशी बोलतो, “परमेश्वराच्या लक्षात हे कधीही येणार नाही,
त्यांनी आपले मुख लपविले आहे, ते हे पाहात नाहीत.”
12याहवेह उठा, परमेश्वरा, आपला हात उगारा!
पीडितांना विसरू नका.
13परमेश्वराला दुष्ट तुच्छ का लेखतो?
“परमेश्वर आपल्या दुष्कृत्यांचा झाडा कधीच घेणार नाही,”
असे तो आपल्या स्वतःशी का म्हणतो?
14परंतु परमेश्वरा, तुम्ही पीडितांच्या यातना पाहता;
तुम्ही त्यांची संकटे लक्षात घेऊन आपल्या नियंत्रणात घ्या.
ते पीडित स्वतःला तुमच्या स्वाधीन करीत आहेत;
कारण तुम्ही पितृहीनांचे साहाय्यकर्ता आहात.
15त्या दुष्टाचे भुजबळ मोडून टाका;
त्याच्या दुष्टपणाचा असा हिशोब घ्या,
की त्याची दुष्टता शोधून सापडणार नाही.
16याहवेह हे सर्वकाळचे राजा आहेत;
त्यांच्या राज्यातून इतर राष्ट्रे नाहीशी झाली आहेत.
17याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता;
त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा.
18गांजलेले व अनाथांचे रक्षण करा,
म्हणजे मर्त्य मानवाची त्यांना पुन्हा कधीही
दहशत वाटणार नाही.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन