स्तोत्रसंहिता 135
135
स्तोत्र 135
1याहवेहचे स्तवन करा.
याहवेहच्या नामाचे स्तवन करा;
तुम्ही, जे याहवेहचे सेवक आहात, ते सर्व याहवेहचे स्तवन करोत.
2व तुम्हीही, जे याहवेहच्या आवासात,
आमच्या परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात सेवा करतात.
3याहवेहचे स्तवन करा, कारण ते चांगले आहेत;
त्यांच्या नावाचा महिमा गा, कारण ते करणे मनोरम आहे.
4कारण याकोबाला आपलेसे करावे,
इस्राएलला त्यांची मौल्यवान संपत्ती म्हणून याहवेहने त्यांना निवडले.
5मला माहीत आहे की याहवेह महान आहेत,
ते देवाधिदेव आहेत.
6याहवेह, स्वर्गात तसेच पृथ्वीवर,
सागरांमध्ये आणि त्याच्या अत्यंत खोलात देखील,
त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.
7पृथ्वीच्या दिगंतापासून ते मेघ वर चढवितात;
पर्जन्यवृष्टीसह ते विजा पाठवितात
आणि आपल्या भांडारातून ते वारे प्रवाहित करतात.
8त्यांनी प्रत्येक इजिप्ती ज्येष्ठ संतानाचा नाश केला,
मनुष्य तसेच जनावरांच्या कळपातील प्रथम वत्साचा.
9हे इजिप्त, त्यांनीच तुझ्यामध्ये महान चमत्कार केले,
जे फारोह आणि त्याच्या सर्व लोकांविरुद्ध होते.
10त्यांनीच मोठमोठ्या राष्ट्रांवर प्रहार केले,
आणि बलाढ्य राजांचा वध केला.
11अमोरी लोकांचा राजा सीहोन,
बाशानचा राजा ओग
आणि कनानाच्या सर्व राजाचा त्यांनी वध केला.
12तत्पश्चात त्यांची भूमी त्यांनी वतन म्हणून,
आपली प्रजा इस्राएली लोकांना देऊ केली.
13हे याहवेह, तुमचे नाव चिरकाल टिकते;
तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकणारी आहे.
14कारण याहवेह आपल्या लोकांना निर्दोष प्रमाणित करतील,
आणि आपल्या सेवकांवर करुणा करतील.
15परंतु राष्ट्रांच्या मूर्ती चांदीच्या आणि सोन्याच्या आहेत,
त्या तर मानवी हातांनी घडविलेल्या आहेत.
16त्यांना तोंडे आहेत, परंतु बोलता येत नाही,
त्यांना डोळे आहेत, परंतु ते बघू शकत नाहीत.
17त्यांना कान आहेत, परंतु ऐकू येत नाही,
ना त्यांना श्वास घेता येतो.
18जे मूर्ती घडवितात ते त्यांच्यासारखेच होतील,
आणि सर्वजण जे त्यांच्यावर भरवसा ठेवतात तेही तसेच होतील.
19हे संपूर्ण इस्राएला, याहवेहचे स्तवन कर;
अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा.
20अहो, लेवीच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा;
त्यांचे भय धरणार्या लोकांनो, याहवेहचे स्तवन करा.
21सीयोनातून याहवेहचे स्तवन होवो,
अहो यरुशलेमातील सर्व रहिवाशांनो, याहवेहचे स्तवन करा.
याहवेहचे स्तवन करा.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 135: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.