YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 33

33
स्तोत्र 33
1अहो नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद करा,
कारण त्यांची प्रशंसा करणे सरळ माणसांना शोभादायक आहे.
2वीणेवर याहवेहस धन्यवाद द्या;
दशतंतू वाद्यावर त्यांचे संगीत गा.
3त्यांच्यापुढे नवीन गीत गा;
जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा.
4कारण याहवेहची वचने सरळ आहेत;
आपल्या प्रत्येक कार्यात ते विश्वासयोग्य आहेत.
5याहवेहला नीती आणि न्याय प्रिय आहेत,
पृथ्वी त्यांच्या वात्सल्यमय प्रीतीने भरून गेली आहे.
6याहवेहच्या शब्दाने स्वर्ग अस्तित्वात आला;
त्यांच्या मुख श्वासाने सर्व नक्षत्रे निर्माण झाली.
7बुधल्यात पाणी भरावे, त्याप्रमाणे ते महासागराचे पाणी एकवटीत आहेत;
त्यांच्या भांडारात सागरांचा साठा करीत आहेत.
8संपूर्ण पृथ्वीने याहवेहचे भय धरावे;
जगातील सर्व लोकांनी त्यांची आदरयुक्त भीती बाळगावी.
9कारण त्यांनी केवळ शब्द उच्चारला आणि जगाची उत्पत्ती झाली,
त्यांच्या आज्ञेने ते स्थिर झाले.
10याहवेह राष्ट्रांच्या योजना व्यर्थ करतात;
ते लोकांचे बेत निष्फळ करतात.
11परंतु याहवेहच्या योजना सर्वकाळ स्थिर राहतात;
त्यांच्या हृदयातील हेतू प्रत्येक पिढीसाठी कायमस्वरूपी असतात.
12ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत,
ज्या लोकांना त्यांनी स्वतःच्या वतनाकरिता निवडले ते धन्य.
13याहवेह स्वर्गातून खाली पाहतात
आणि संपूर्ण मानवजातीला न्याहाळतात;
14ते आपल्या निवासस्थानामधून
पृथ्वीवरील सर्व लोकांना पारखतात.
15त्यांनीच सर्वांची हृदये घडविली,
तेच प्रत्येकाचे कार्य पारखतात.
16कोणताही राजा सैन्याच्या संख्येने विजय प्राप्त करतो असे नाही;
कोणताही योद्धा आपल्या महान शक्तीने स्वतःचा बचाव करू शकतो असेही नाही.
17युद्धात विजय प्राप्तीसाठी घोड्यावर भिस्त ठेवणे निरर्थक आहे;
घोडा बळकट असेल पण तो कोणाचा बचाव करू शकत नाही.
18-19परंतु जे त्यांचे भय धरतात,
ज्यांची आशा त्यांच्या अक्षय प्रीतीवर आहे, त्यांच्यावर याहवेहची दृष्टी असते.
ते त्यांना मृत्यूपासून सोडवून,
दुष्काळात त्यांच्या प्राणाचे रक्षण करतात.
20आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत;
केवळ तेच आमचे साहाय्य आणि ढाल आहेत.
21त्यांच्यामध्येच आमच्या हृदयात आनंद आहे,
कारण त्यांच्या पवित्र नावावर आमचा विश्वास आहे.
22याहवेह तुमची अक्षय प्रीती आमच्या सभोवती असू द्या,
कारण आमच्या आशेचे स्थान केवळ तुम्हीच आहात.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 33: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन