स्तोत्रसंहिता 91
91
स्तोत्र 91
1जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो,
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
2मी याहवेहला म्हणेन, “तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत,
माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे.”
3कारण ते पारध्याच्या पाशापासून
आणि प्राणघातक मरीपासून
तुझे रक्षण करतील.
4ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील,
त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल;
त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.
5तुला अंधकाराच्या आतंकाचे भय वाटणार नाही,
किंवा दिवसा सुटणार्या बाणांचेही नाही.
6अंधारात दबा धरून राहणार्या मरीचे,
किंवा भर दुपारी येणार्या आपत्तीचेही भय वाटणार नाही.
7हजार लोक तुझ्याजवळ पडले,
आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले,
तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत.
8तू केवळ आपल्या दृष्टीने निरीक्षण करशील,
आणि दुष्टांना केलेली शिक्षा बघशील.
9जर तू म्हणाला, “याहवेह माझे आश्रयस्थान आहेत,”
आणि तू परमोच्चास आपले निवासस्थान केलेस,
10तर तुला कोणतीही इजा होणार नाही,
किंवा कोणतेही अरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार नाही.
11कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील,
म्हणजे तू जाशील तिथे तुझे रक्षण व्हावे.
12ते तुला त्यांच्या हातांवर उचलून धरतील,
म्हणजे तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये.
13तू सिंह आणि नागाला चिरडशील;
भयंकर सिंहाला व सर्पाला तू आपल्या पायाखाली तुडवशील.
14याहवेह म्हणतात, “तो#91:14 बहुतेक राजा मजवर प्रीती करतो, म्हणून मी त्याला सोडवेन,
त्याचे रक्षण करेन, कारण त्याने माझा नामाधिकार मान्य केला आहे.
15तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन;
त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन;
मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन.
16दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करेन,
आणि त्याला माझ्या तारणाचा अनुभव घडवेन.”
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 91: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.