YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटीकरण 18

18
बाबेलच्या पतनाबद्दल शोक
1त्यानंतर स्वर्गातून दुसरा एक देवदूत खाली येताना मी पाहिला. त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या प्रखर तेजाने पृथ्वी उजळून निघाली. 2तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला,
“ ‘पडले! महान बाबेल शहर पडले!’#18:2 यश 21:9
ती भुतांची वस्ती व सर्वप्रकारच्या
अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्वप्रकारच्या गलिच्छ,
ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे!
3कारण जारकर्माचे प्राणघातक
मद्य सर्व राष्ट्रांनी प्राशन केले आहे.
पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे,
आणि जगातील व्यापारी,
आपल्या विलासी जीवनासाठी तिने खर्च केलेल्या द्रव्यामुळे श्रीमंत झाले आहेत.”
बाबेलच्या न्यायापासून सुटून जाण्याचा इशारा
4मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली:
“ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’#18:4 यिर्म 51:45
तिच्या पापात वाटेकरी होऊ नका,
नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल.
5कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत उंच गेली आहे,
आणि परमेश्वराने तिच्या गुन्ह्याची आठवण केली आहे.
6तिने जसे तुम्हाला केले, तसेच किंबहुना अधिक, तिला करा.
तिच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल तिला दुप्पट शिक्षा करा.
तिने प्याल्यात जितके ओतले,
त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्या स्वतःच्या प्याल्यातून ओता.”
7तिने आपले सगळे आयुष्य विलासात, आणि ऐशआरामात घालविले आहे,
आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या.
ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते,
“मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे.
मी काही विधवा नाही.
मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”
8म्हणूनच तिला मरण,
शोक व दुष्काळ या सर्वांच्या पीडा एकाच दिवशी भोगाव्या लागतील.
अग्निने तिला जाळून टाकण्यात येईल.
सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर तिचा न्यायनिवाडा करणार आहे.
पृथ्वीवर बाबेलसाठी विलाप
9“पृथ्वीवरील ज्या राजांनी, तिच्याबरोबर जारकर्म केले व तिच्या विलासामध्ये, सामील झाले होते. ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील, 10तेव्हा ते तिच्याकरिता ऊर बडवून शोक करतील. ते म्हणतीलः
“ ‘हाय हाय! महान बाबेल नगरी,
ती सामर्थ्यशाली नगरी!
एका क्षणात तिच्यावर न्यायाची कुर्‍हाड कोसळली आहे!’
11“पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडून शोक करतील, कारण आता त्यांचा माल विकत घेण्‍यास कोणीच उरले नाही: 12सोने, चांदी, हिरे, रत्ने, तलम कापड, जांभळे आणि किरमिजी रेशमी कापड, सर्वप्रकारचे चंदनी व सुगंधी लाकूड, हस्तदंती माल, मोलवान लाकडाचे कोरीव नक्षीकाम, पितळ, लोखंड, संगमरवरी दगड, 13तसेच दालचिनी व मसाले, उटणी, धूप, अत्तर, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, उत्तम मैदा व गहू, गुरेढोरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम म्हणून विकण्यात येणारी माणसे या सर्व वस्तुंचे ती सर्वात मोठी गिर्‍हाईक होती.
14“ते म्हणतील, ‘ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापासून घेतली गेली आहेत, सर्व विलास आणि वैभवी गोष्टी तुझ्यापुढून गेली आहेत; त्याचा कधीच पुनर्लाभ होणार नाही.’ 15जे व्यापारी तिला हे पदार्थ विकून श्रीमंत झाले, ते आता तिची पीडा बघून भयभीत होतील. दूर उभे राहून रडत व शोक करतील. 16ते आक्रोश करून म्हणतीलः
“ ‘हाय! हाय! ही इतकी सुंदर महानगरी!
जांभळ्या, किरमिजी तलम वस्त्रांनी सजलेल्या,
सोन्यामोत्यांच्या अलंकारांनी नटलेल्या स्त्रीसारखी ही सुंदर महानगरी!
17एका क्षणात सारी संपत्ती नष्ट झाली!’
“प्रत्येक जहाजाचे कप्तान, आणि खलाशी व समुद्रापासून उत्पन्न मिळविणारे सर्वजण दूर अंतरावर उभे राहतील, 18धुराच्या उसळणार्‍या लोटांकडे पाहत शोकाकुल होऊन ते रडत म्हणतील, ‘या महान नगरीसारखी दुसरी नगरी सार्‍या जगात शोधून तरी सापडेल काय?’ 19मोठ्या दुःखाने आपल्या डोक्यात धूळ टाकून ते रडत व आक्रोश करीत म्हणतीलः
“ ‘हाय, हाय! किती महान नगरी होती ही!
ज्या सर्वांकडे जहाजे होती ते
तिच्यामुळेच श्रीमंत झाले,
आणि आता एका तासात ती उद्ध्वस्त झाली!’
20“पण हे स्वर्गा!
त्याचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही,
परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा!
कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध
परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.”
बाबेलचा विनाश
21मग एका बलवान देवदूताने, जात्याच्या तळीच्या आकाराचा एक मोठा दगड उचलून समुद्रात टाकला व तो ओरडून म्हणालाः
“ती महान नगरी बाबेल अशाच
हिंसक रीतीने खाली फेकल्या जाईल व
ती कायमची नाहीशी होईल.”
22त्या नगरीत आता कर्णे, वीणा, बासरी,
यांचा सूरही कधी ऐकू येणार नाही.
तेथे कसल्याच प्रकारचे उद्योगधंदे
पुन्हा आढळणार नाहीत.
तेथे गिरणीचा आवाज
पुन्हा ऐकू येणार नाही.
23दिव्यांचा उजेड यापुढे
तुझ्यावर प्रकाशणार नाही
आणि वधूवरांची वाणी ऐकू येणार नाही.
तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते.
सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती.
24पृथ्वीवर सांडलेले सर्व संदेष्टे आणि पवित्रजन,
यांचे रक्त तिच्यामध्ये आढळले.

सध्या निवडलेले:

प्रकटीकरण 18: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन