प्रकटीकरण 5
5
ग्रंथपटाची गुंडाळी आणि कोकरा
1जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली ग्रंथपटाची गुंडाळी मी पाहिली. ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती. 2एक बलवान देवदूत मोठ्याने घोषणा करीत होता: “हे शिक्के फोडून, या ग्रंथपटाची गुंडाळी उघडावयास पात्र असा कोणी आहे का?” 3पण स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली, कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा त्यात लिहिलेले पाहण्यास समर्थ नव्हता. 4तेव्हा मी फार रडलो. कारण ती गुंडाळी उघडावयास किंवा त्यात पाहावयास योग्य असा कोणीही सापडला नाही. 5पण त्या चोवीस वडिलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! कारण पाहा, यहूदा वंशाचा सिंह, दावीदाचा मूळ विजयी झाला आहे. सातही शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यास तो समर्थ आहे.”
6मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठवलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत. 7कोकरा पुढे आला, आणि जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातातून त्यांनी ती गुंडाळी घेतली. 8कोकर्याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांनी कोकर्याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एक एक वीणा आणि सोन्याची धूपपात्रे होती. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत. 9ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द हे असे:
“ती गुंडाळी घ्यावयास व
त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात,
कारण तुमचा वध करण्यात आला होता
आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी
प्रत्येक वंशातून, भाषेतून, आणि राष्ट्रातून लोक विकत घेतले,
10तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी
याजक केले आहेस; ते पृथ्वीवर राज्य करतील.”
11तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजिव प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती उभे होते. 12ते मोठ्याने म्हणत होत:
“ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा
सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव
आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!”
13मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते:
“जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्याला
उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य
युगानुयुग असो!”
14तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, “आमेन,” आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली.
सध्या निवडलेले:
प्रकटीकरण 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.