YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 13

13
वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अधीन असणे
1प्रत्येकाने प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अधीन असावे, कारण परमेश्वराने जो नेमून दिला नाही, असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत, ते स्वतः परमेश्वराने नेमलेले आहेत. 2यास्तव, जो अधिकारी व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तो परमेश्वराने स्थापित केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करीत असतो आणि जे असे करतात, ते स्वतःवर दंड ओढवून घेतील. 3जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करील. 4कारण तुमचे हित करण्यासाठी तो परमेश्वराचा नेमलेला सेवक आहे. परंतु तुम्ही अयोग्य केले, तर त्याची भीती बाळगा, कारण तो तरवार व्यर्थ धारण करीत नाही. अयोग्य ते करणार्‍याला शासन करण्यासाठी तो परमेश्वराचा सेवक, न्यायनीतिचा कारभारी आहे. 5यास्तव केवळ संभवनीय दंडाकरिताच नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळे अधिकार्‍यांच्या अधीन राहणे आवश्यक आहे.
6या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी परमेश्वराचे सेवक आहेत आणि त्यांना पूर्णवेळ सेवा करणे आवश्यक आहे. 7प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तेथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जेथे सन्मान तेथे सन्मान, जेथे आदर तेथे आदर द्या.
प्रीती नियम पूर्ण करते
8इतरांवर प्रीती करण्याशिवाय कोणाचे ॠणी राहू नका, कारण जो कोणी दुसर्‍यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. 9या आज्ञा आहेत, “तू व्यभिचार करू नको,” “तू खून करू नको,” “तू चोरी करू नको,” “तू लोभ धरू नको,”#13:9 निर्ग 20:13-15, 17; अनु 5:17-19, 21 आणि इतर दुसर्‍या कोणत्याही आज्ञा असतील तरी, “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा,”#13:9 लेवी 19:18 या एका आज्ञेत सर्व आज्ञा समाविष्ट आहेत. 10प्रीती शेजार्‍याचे काही वाईट करीत नाही, म्हणूनच ती नियमशास्त्राची परिपूर्ती करते.
दिवस समीप आला आहे
11आणखी हे करा, सध्याचा समय ओळखून घ्या: झोपेतून उठण्याची वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या अधिक जवळ आले आहे. 12रात्र संपत आली आहे; दिवस लवकरच येऊन ठेपेल, म्हणून अंधाराची कृत्ये सोडून द्या आणि प्रकाशाचे शस्त्र धारण करा. 13दिवस आहे तोपर्यंत प्रत्येक गोष्ट शिष्टाचारास धरून करा. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका. 14यापेक्षा, प्रभू येशू ख्रिस्तांना परिधान करा व देहाच्या वासनांचा उपभोग घेण्याचा विचार करू नका.

सध्या निवडलेले:

रोमकरांस 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन