4
नायक
1किती सुंदर आहेस तू, माझ्या प्रिये!
आहा, किती सुंदर आहेस!
तुझ्या पडद्याआड तुझे नयन कबुतरे आहेत.
तुझे केस त्या शेरडांच्या कळपाप्रमाणे आहेत
ज्या गिलआदाच्या टेकड्यांवरून झळकतात.
2तुझे दात नुकत्याच
धुतलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत,
प्रत्येकाला आपले जुळे आहेत;
त्यापैकी कोणीही एकटे नाहीत.
3किरमिजी सुताप्रमाणे तुझे ओठ आहेत;
तुझे ओठ मनमोहक आहेत.
ओढणीआड असलेले तुझे गाल
डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
4तुझी मान दावीदाने बांधलेल्या बुरुजाप्रमाणे आहे,
जो शिलाकृतीने बांधला आहे;
ज्यावर योद्धांच्या एक हजार ढाली
लटकलेल्या आहेत.
5तुझे स्तन दोन हरिणींसारखे आहेत,
जुळ्या मृगांसारखे
ते मनोरम आहेत, कमळपुष्पांमध्ये चरतात
6दिवस उजाडेपर्यंत,
आणि छाया नाहीशी होईपर्यंत,
मी गंधरसाच्या पर्वतावर
व बोळाच्या टेकडीवर जाईन.
7माझ्या प्रिये, तू सर्वांगी सुंदर आहेस;
तुझ्यात काहीही उणीव नाही.
8माझ्या वधू, लबानोनाहून तू माझ्यासोबत ये,
लबानोनाहून माझ्यासोबत ये,
अमानाह डोंगराच्या माथ्यावरून,
सनीर व हर्मोनच्या शिखरावरून,
सिंहाच्या गुहांपासून
आणि चित्ते वावरतात त्या डोंगरावरून खाली उतरून ये.
9अगे माझ्या भगिनी, माझी वधू;
तुझ्या एकाच नजरेने
तुझ्या माळेच्या एकाच मणीने
तू माझे हृदय चोरून घेतले आहेस.
10माझ्या भगिनी, माझ्या वधू, तुझे प्रेम किती हर्षित करणारे आहे!
तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा कितीतरी उत्तम आहे,
इतर सुगंधी द्रव्यांपेक्षा
तुझ्या अत्तराचा सुगंध अधिक मनमोहक आहे.
11माझ्या वधू, तुझे ओठ मधाच्या पोळ्याप्रमाणे मध गाळतात;
दूध आणि मध तुझ्या जिभेखाली आहेत.
तुझ्या वस्त्रांचा सुगंध
लबानोनाच्या सुगंधासारखा आहे.
12माझ्या भगिनी, माझ्या वधू तू एका बंद केलेली बाग आहेस;
तू एक कुंपणाने घेरलेल्या झर्यासारखी, शिक्कामोर्तब कारंज्याप्रमाणे आहेस.
13तुझी रोपे तर डाळिंबाचा मळा आहे,
ज्यात सर्वोत्कृष्ट फळे,
मेंदी आणि सुगंधी अगरू आहेत,
14अगरू आणि केशर,
वेखंड आणि दालचिनी,
सर्व प्रकारची सुगंधी झाडे,
तसेच गंधरस आणि जटामांसी
आणि सर्व उत्तम मसाले आहेत.
15या बागेतील पाण्याचा झरा,
लबानोन पर्वतावरून खाली वाहणार्या
वाहत्या पाण्याची विहीर अशी तू आहेस.
नायिका
16उत्तरेच्या वार्या, जागा हो,
आणि दक्षिणेच्या वार्या, ये;
माझ्या बागेतील सुगंध चोहीकडे पसरावा,
म्हणून माझ्या बागेवरून वाहत जा.
माझ्या प्रियकराला त्याच्या बागेत येऊ द्या,
आणि बागेतील सर्वोत्कृष्ट फळे खाऊ द्या.