YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीतरत्न 5

5
नायक
1माझ्या भगिनी, माझ्या वधू, मी माझ्या बागेत आलो आहे;
सुगंधी द्रव्यांबरोबर मी माझा गंधरसही गोळा केला आहे.
मी मधाबरोबर आणि माझ्या मधाचे पोळे खात आहे.
मी माझे द्राक्षारस आणि दूध प्यालो आहे.
मित्र
माझ्या मित्रांनो, खा आणि प्या;
प्रीतीच्या आनंदाने भरून जा.
नायिका
2मी झोपले होते परंतु माझे हृदय जागेच होते.
ऐका! माझा प्रियकर दरवाजा ठोकीत आहे:
“माझ्यासाठी उघड, माझ्या भगिनी, माझ्या प्रिये,
माझी कबुतरी, माझ्या सर्वांग सुंदरी.
माझे डोके दवबिंदूने चिंब भिजले आहे,
माझे केस रात्रीमुळे ओलसर झाले आहे.”
3माझा पोशाख मी काढून ठेवला आहे—
तो मी पुन्हा घालू काय?
मी माझे पाय धुतले आहेत,
ते मी पुन्हा मळवू काय?
4माझ्या प्रियसख्याने बाहेरून हात घालून कडी उघडण्याचा प्रयत्न केला;
तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी धडधडू लागले.
5माझ्या प्रियकरासाठी दार उघडण्यास मी उठले,
आणि दाराच्या कडीवर
आणि माझ्या हातांतून गंधरसाचे अत्तर पाझरले,
माझ्या बोटांतून गंधरस स्त्रवला.
6माझ्या प्रियसख्यासाठी मी दार उघडले,
पण तो तिथून निघून गेला होता; तेव्हा माझे हृदय गळून गेले.
मी त्याला चोहीकडे शोधले, पण तो कुठेच सापडला नाही.
मी त्याला हाक मारली,
पण त्याने उत्तर दिले नाही.
7पहारेकरी नगरात गस्त घालत असता
त्यांना मी सापडले.
त्यांनी मला मारहाण केली; मला जखमी केले;
तटावरील पहारेकर्‍यांनी
तर माझी ओढणी काढून घेतली!
8यरुशलेमच्या कन्यांनो, मला हे वचन द्या, मी तुम्हावर एक कामगिरी सोपविते—
जर तुम्हाला माझा प्रियकर सापडला,
तर तुम्ही त्याला काय सांगाल?
मी त्याच्या प्रेमासाठी झुरत आहे, असे सांगा.
मैत्रिणी
9तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे,
हे परमसुंदरी?
तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे,
की तू आम्हाला शपथ देऊन ही कामगिरी सोपवावीस?
नायिका
10माझा प्रियकर तेजस्वी आणि लालबुंद,
दहा हजारात श्रेष्ठ आहे.
11त्याचे मस्तक शुद्ध सोन्यासारखे आहे;
त्याचे केस कुरळे असून
डोमकावळ्यासारखे काळेभोर आहेत.
12ओढ्याच्या काठावर असलेल्या,
कबुतरांप्रमाणे त्याचे डोळे आहेत,
जसे ते दुधात धुतलेले,
रत्नजडित केल्यासारखे आहेत.
13त्याचे गाल सुगंधी वनस्पतीच्या वाफ्यासारखे
अत्तर दरवळणारे आहेत.
त्याचे ओठ गंधरस गाळणार्‍या
कमळपुष्पासारखे आहे.
14त्याचे बाहू पुष्कराजाने
सुशोभित केलेल्या सुवर्णस्तंभासारखे आहेत.
त्याचे शरीर नीलम रत्नांनी सुशोभित करून
उजळ केलेल्या हस्तिदंतासारखे आहे.
15त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले
संगमरवरी स्तंभच आहेत.
त्याचे रूप लबानोनासारखे आहे,
उत्तम देवदारूसारखे आहे.
16त्याचे मुख परममधुर आहे;
तो सर्वस्वी सुंदर आहे.
यरुशलेमच्या कन्यांनो,
हाच माझा प्रियकर, हाच माझा मित्र आहे.

सध्या निवडलेले:

गीतरत्न 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन