गीतरत्न 6
6
मैत्रिणी
1हे सर्व स्त्रियांमधील परमसुंदरी,
तुझा प्रियकर कुठे गेला?
कोणत्या मार्गाने वळला आहे,
की तुझ्याबरोबर आम्हीही त्याला शोधू?
नायिका
2माझा प्रियकर त्याच्या बागेत,
आपल्या सुगंधी झाडांच्या वाफ्यात,
तो कमळिनी शोधून
गोळा करण्यास तो गेला आहे.
3मी माझ्या प्रियकराची आहे, आणि माझा प्रियकर माझाच आहे;
कमळिनीमध्ये तो फुले शोधित आहे.
नायक
4माझ्या प्रिये, तू तिरजाह नगरीसारखी सुंदर आहेस,
जसे यरुशलेम मनोहर आहे,
जसे ध्वज फडकविणारे विजयी सैन्य तशी तू ऐश्वर्यशाली आहे.
5माझ्यावरून तू आपली दृष्टी काढ;
कारण तुझे नयन मला भारावून सोडतात.
तुझे केस गिलआद डोंगरावर चकाकणार्या
शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आहेत.
6तुझे दात नुकत्याच धुतलेल्या
मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत.
प्रत्येकाला आपले जुळे आहेत,
त्यात एकही उणा नाही.
7ओढणीआड असलेले तुझे गाल
डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
8तिथे साठ राण्या,
आणि ऐंशी उपपत्नी,
आणि कुमारिका तर असंख्य असतील;
9पण हे माझ्या कबुतरे, तू परिपूर्ण, व निराळी आहेस,
तिच्या आईची एकुलती एक कन्या असून,
जिने तिला जन्म दिला तिची लाडकी आहे.
तरुण स्त्रियांनी तिला पाहून, धन्य म्हटले;
राण्या व उपपत्नी यांनी देखील तिची प्रशंसा केली.
मित्र
10जो पहाटेसारखा प्रसन्न,
चंद्रासारखा मनोरम, सूर्यासारखा प्रकाशमान,
मिरवणुकीतील तार्यासारखे गौरवी दिसणारे असे हे कोण आहे?
नायक
11दर्याखोर्यात वाढत असलेली नवी झाडे,
द्राक्षवेलींना आलेले अंकुर,
आणि डाळिंबाला आलेली फुले
पाहण्यासाठी मी खाली अक्रोडाच्या झाडांच्या मळ्यात गेलो.
12मला समजण्यापूर्वी,
माझ्या इच्छेने मला माझ्या लोकांच्या शाही रथामध्ये स्थान दिले.
मित्र
13परत ये, शुलेमकन्ये परत ये;
आम्ही तुला न्याहाळावे म्हणून परत ये, परत ये!
मित्र
महनाईमचे नृत्य पाहण्यासारखे
तुम्ही शुलेमकन्येला का न्याहाळता?
सध्या निवडलेले:
गीतरत्न 6: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.