जखर्याह 8
8
यरुशलेमला आशीर्वादाचे याहवेहचे अभिवचन
1सर्वसमर्थ याहवेहचे वचन मला प्राप्त झाले.
2सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “सीयोनेबाबत मला अत्यंत ईर्षा वाटते; मी तिच्याबद्दल ईर्षेने ज्वलंत झालो आहे.”
3याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.”
4सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पुन्हा एकदा त्या नगरीतील परिपक्व वयाचे स्त्री व पुरुष यरुशलेमच्या रस्त्यांवर बसतील, प्रत्येकजण वयातीत असल्यामुळे आपल्या काठ्या टेकीत येतील, 5आणि नगरातील रस्ते तिथे खेळणार्या मुलांनी व मुलींनी भरून जातील.”
6सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “त्यावेळी हे अवशिष्ट लोकांना अद्भुत वाटेल, परंतु मला ते अद्भुत वाटेल का?” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
7सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी माझ्या लोकांना पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून सोडवून आणेन. 8त्यांनी यरुशलेमात राहावे यासाठी मी त्यांना पुन्हा आणेन; आणि ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा विश्वासयोग्य आणि न्यायी परमेश्वर होईन.”
9सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “आता हे शब्द ऐका, ‘तुमचे बाहू बलवंत करा, जेणेकरून मंदिर बांधून पूर्ण होईल.’ जेव्हा सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराचा पाया घातला, तेव्हा जे संदेष्टे तिथे हजर होते, त्यांनी तुम्हाला हे सांगितले होते. 10त्या वेळेपर्यंत लोकांना कामासाठी मजुरी नव्हती किंवा जनावरे भाड्याने मिळत नव्हती. शत्रूच्या भयापायी कामधंदे करण्यास इतरत्र जाणे सुरक्षित नव्हते, कारण मी तुम्हा प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याविरुद्ध केले होते. 11पण आधी मी वागलो तसे मी आता या अवशिष्ट लोकांशी वागणार नाही,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
12“ते बियाणे चांगले वाढेल, द्राक्षवेली फळे देतील, भूमी पीक देईल, आणि आकाश त्याचे दव पाडेल. मी या लोकांच्या अवशिष्टास त्यांचा वारसाहक्क म्हणून हे सर्व देईन. 13जसे तुम्ही, यहूदीया व इस्राएल सर्व राष्ट्रात शाप#8:13 किंवा तुम्ही शापाखाली होता म्हटले जात असत, तर मी तुम्हाला वाचवून तुम्हाला आशीर्वाद#8:13 किंवा आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या नावाचा उपयोग केला जाईल असे करेन. तुम्ही भिऊ नका तर तुमचे बाहू बलवान करा.”
14सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जसा तुमच्यावर अरिष्ट आणण्याचा व तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला तेव्हा मुळीच करुणा न करण्याचा मी निर्धार केला, 15तर आता मी यहूदीया व यरुशलेमचे परत भले करण्याचा निर्धार केला आहे. तुम्ही भिऊ नका. 16आता तुम्ही या गोष्टी करावयाच्या आहेत: एकमेकांशी सत्य बोला, सत्यता व शांततेने तुमच्या न्यायलयात योग्य निर्णय द्या; 17एकमेकांविरुद्ध दुष्ट कारस्थान करू नका आणि खोटी शपथ घेण्याची आवड धरू नका. मला या सर्वाचा अतिशय तिरस्कार वाटतो,” असे याहवेह जाहीर करतात.
18सर्वसमर्थ याहवेहकडून मला वचन आले.
19सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “चवथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यातील उपवास आता यहूदीयाच्या घराण्यास आनंदाचा व उल्हासाचा काळ व हर्षोत्सव म्हणून पाळले जातील. म्हणून सत्य व शांती यावर प्रीती करा.”
20सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जगभरचे लोक व अनेक नगरांमधील रहिवासी येतील, 21आणि एका नगरामधील रहिवासी दुसऱ्या नगरात जातील व त्यांना म्हणतील, ‘चला आपण याहवेहला विनंती करू व सर्वसमर्थ याहवेहचा शोध घेऊ. मी स्वतःच जात आहे.’ 22आणि पुष्कळ लोक आणि बलाढ्य राष्ट्रे देखील यरुशलेमला येतील व सर्वसमर्थ याहवेहकडे विनंती करतील.”
23सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “त्या दिवसात सर्व राष्ट्रांतील व सर्व भाषिक अशी दहा माणसे एका यहूदीच्या अंगरख्याच्या टोकास पकडून म्हणतील, ‘आम्हाला तुमच्याबरोबर येऊ द्या, कारण परमेश्वर तुम्हासोबत आहेत असे आम्ही ऐकले आहे.’ ”
सध्या निवडलेले:
जखर्याह 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.