योहान 18
18
येशूंना अटक
1त्यांची प्रार्थना आटोपल्यावर, येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेले. दुसर्या बाजूला एक बाग होती, ते व त्यांचे शिष्य तेथे गेले.
2आता यहूदा, ज्याने त्यांचा विश्वासघात केला, त्याला ही जागा माहीत होती, कारण येशू आपल्या शिष्यांना बर्याच वेळा तेथे भेटत होते. 3तेव्हा सैनिकांची एक तुकडी, प्रमुख याजक आणि परूशी यांच्याकडील अधिकारी यांना वाट दाखवीत यहूदा त्यांना बागेत घेऊन आला. त्यांच्याजवळ मशाली, कंदीले व हत्यारे होती.
4येशू, जे सर्व आपणावर येणार ते पूर्णपणे जाणून होते, त्यांनी बाहेर जाऊन त्यांना विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?”
5त्यावर त्यांनी उत्तर दिले, “नासरेथकर येशू.”
तेव्हा येशू म्हणाले, “तो मी आहे,” आणि विश्वासघात करणारा यहूदाही त्यांच्याबरोबर तेथे उभा होता. 6जेव्हा येशूंनी म्हटले, “मी तो आहे,” तेव्हा ते मागे सरकून भूमीवर पडले.
7त्यांना पुन्हा विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?”
त्यांनी म्हटले, “नासरेथकर येशू.”
8येशू म्हणाले, “तो मी आहे असे मी तुम्हाला सांगितले आहेच, आणि जर तुम्ही मला शोधत आहात, तर या माणसांना जाऊ द्यावे. 9जे आपण मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही,”#18:9 योहा 6:39 हे शब्द त्यांनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
10तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती तरवार उपसून त्याने प्रमुख याजकाच्या दासावर वार केला व त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.
11येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तरवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?”
12मग यहूदी अधिकार्यांनी, सैनिकांनी व त्यांच्या सेनापतींनी येशूंना अटक केली. त्यांना बांधले. 13प्रथम त्यांनी येशूंना हन्नाकडे नेले, त्या वर्षी महायाजक कयफा होता आणि हन्ना त्याचा सासरा होता. 14याच कयफाने यहूदी पुढार्यांसोबत अशी मसलत केली होती की, लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे अधिक हितावह आहे.
पेत्राचा प्रथम नाकार
15शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला. 16परंतु पेत्राला बाहेर दाराजवळ थांबावे लागले. तो दुसरा शिष्य, ज्याला मुख्य याजकाची ओळख होती, तो परत आला, व दारावर राखण ठेवणार्या दासीशी बोलला, व त्यांनी पेत्राला आत आणले.
17मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?”
त्याने उत्तर दिले, “मी नाही.”
18थंडी पडल्यामुळे, शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला.
प्रमुख याजकाकडून येशूंची चौकशी
19दरम्यान, प्रमुख याजकाने येशूंना त्यांच्या शिष्यांविषयी आणि त्यांचे शिक्षण त्याविषयी प्रश्न विचारले.
20येशूंनी त्याला उत्तर दिले, “मी जगापुढे उघडपणे बोलतो, कारण मी सभागृहांमध्ये व मंदिरात जेथे सर्व यहूदी एकत्रित येतात तेथे नियमितपणे शिक्षण दिले आहे. मी गुप्तपणे काहीही बोललो नाही. 21मला का विचारता? ज्यांनी माझे ऐकले त्यांना विचारा. मी काय बोललो ते त्यांना माहितच असेल.”
22येशूंनी असे म्हटल्यावर, जवळ असणार्या अधिकार्यांपैकी एकाने येशूंच्या तोंडावर चापट मारली व, “या रीतीने तू प्रमुख याजकाला उत्तर देतो काय?” त्याने दरडावून मागणी केली.
23येशूंनी उत्तर दिले, “मी जर काही चुकीचे बोललो असेल तर तसे सिद्ध करा. परंतु मी सत्य बोललो असेन, तर तुम्ही मला का मारले?” 24मग हन्नाने येशूंना बांधलेल्या अवस्थेतच प्रमुख याजक कयफा याजकडे पाठविले.
पेत्राचा दुसरा व तिसरा नाकार
25दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना, त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?”
पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.”
26परंतु ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग, प्रमुख याजकाच्या दासांपैकी एक होता. त्याने पेत्राला विचारले, “मी तुला येशूंबरोबर बागेत पाहिले नाही का?” 27पेत्राने पुन्हा नकार दिला आणि तेवढ्यात कोंबडा आरवला.
पिलातापुढे येशू
28मग यहूदी पुढार्यांनी येशूंना कयफाकडून रोमी राज्यपालाच्या राजवाड्यात नेले. तोपर्यंत पहाट झाली होती आणि आपण नियमशास्त्रानुसार अशुद्ध होऊ नये आणि आपल्याला वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः राजवाड्यात गेले नाहीत. 29तेव्हा पिलात त्यांच्याकडे बाहेर आला आणि त्याने त्यांना विचारले, “या मनुष्याविरुद्ध तुमचे काय आरोप आहेत?”
30पिलाताला उलट जबाब देत ते म्हणाले, “तो गुन्हेगार नसता तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केलेच नसते!”
31पिलात त्यांना म्हणाला, “त्याला घेऊन जा आणि तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.”
ते विरोध करून म्हणाले, “मृत्युदंड देण्याचा अधिकार आम्हाला नाही. 32आपण कोणत्या प्रकारे मरणार असे जे येशूंनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.”
33मग पिलात राजवाड्यामध्ये परतला आणि त्याने येशूंना आपल्यापुढे बोलावून विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
34“ही तुमची स्वतःची कल्पना आहे की, इतरजण माझ्याबद्दल तुमच्याजवळ हे बोलले?” येशूंनी विचारले.
35तेव्हा प्रत्युत्तर करीत पिलात म्हणाला, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनीच तुला माझ्या स्वाधीन केले नाही का? तू काय केले?”
36मग येशूंनी उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. जर असते तर, यहूदी पुढार्यांनी मला अटक करू नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य दुसर्या ठिकाणचे आहे.”
37यावरून पिलात त्याला म्हणाला, “मग तू राजा आहेस!”
येशूंनी उत्तर दिले, “तू म्हणतो मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात.”
38पिलाताने उलट विचारले, “सत्य काय आहे?” मग तो पुन्हा यहूदी जेथे जमले होते तेथे बाहेर गेला व त्यांना म्हणाला, “त्याच्यावर आरोप करण्यासाठी मला कसलाही आधार सापडत नाही. 39परंतु वल्हांडण सणाच्या निमित्ताने मी तुम्हासाठी एका कैद्याला सोडावे अशी तुमची रीत आहे. तर मी या ‘यहूद्यांच्या राजाला’ सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?”
40ते ओरडले, “नाही, त्याला नको! आम्हाला बरब्बा हवा आहे!” बरब्बाने तर बंडात भाग घेतला होता.
सध्या निवडलेले:
योहान 18: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.