YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 20

20
रिकामी कबर
1आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटेस, अंधार असताना, मरीया मग्दालिया कबरेकडे गेली आणि प्रवेशद्वारावरून मोठी धोंड बाजूला लोटलेली आहे, असे तिने पाहिले. 2तेव्हा धावतच ती शिमोन पेत्र व दुसरा शिष्य, ज्यावर येशूंची प्रीती होती, त्यांना येऊन म्हणाली, “त्यांनी प्रभुला कबरेतून काढून नेले आहे आणि त्यांना कोठे ठेवले आहे ते आम्हाला माहीत नाही!”
3मग पेत्र आणि दुसरा शिष्य कबरेकडे निघाले. 4दोघेही धावत होते, परंतु तो दुसरा शिष्य पेत्रापुढे धावत गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला. 5त्याने डोकावून आत पाहिले, तेव्हा तेथे त्याला तागाच्या पट्ट्या पडलेल्या दिसल्या, परंतु तो आत गेला नाही. 6एवढ्यात शिमोन पेत्र त्याच्यामागून आला आणि सरळ कबरेच्या आत गेला. त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, 7त्याप्रमाणे जे कापड येशूंच्या डोक्याला गुंडाळून बांधले होते, ते कापड अजूनही त्याच ठिकाणी तागाच्या वस्त्रापासून वेगळे पडलेले होते असे त्याने पाहिले. 8शेवटी दुसरा शिष्य, जो प्रथम कबरेजवळ पोहोचला होता, तोही आत गेला. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. 9कारण त्यांनी मेलेल्यातून पुन्हा उठावे हा शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजला नव्हता. 10नंतर शिष्य एकत्र जिथे राहत होते तिथे ते परत गेले.
येशू मरीया मग्दालिनीला दर्शन देतात
11परंतु मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली. ती रडत असताना, तिने ओणवून कबरेच्या आत डोकावून पाहिले. 12आणि तिला, जेथे येशूंचे शरीर ठेवले होते तेथे, एक उशाशी व दुसरा पायथ्याशी शुभ्र झगा परिधान केलेले दोन देवदूत दिसले.
13त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?”
तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभुला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कोठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.” 14असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही.
15येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?”
तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर त्याला तुम्ही कोठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.”
16येशू तिला म्हणाले, “मरीये.”
त्यांच्याकडे वळून ती अरेमिक, भाषेत म्हणाली “रब्बूनी!” म्हणजे “गुरुजी.”
17येशू म्हणाले, “मला अडवू नकोस, कारण मी अद्याप पित्याकडे वर गेलो नाही. पण तू जा आणि माझ्या भावांना सांग, की ‘मी वर माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे, माझ्या परमेश्वराकडे आणि तुमच्या परमेश्वराकडे जात आहे.’ ”
18मरीया मग्दालिया, शिष्यांकडे बातमी घेऊन आली: “मी प्रभुला पाहिले आहे!” ज्या गोष्टी येशूंनी तिला सांगितल्या होत्या त्या तिने शिष्यांना सांगितल्या.
येशू शिष्यांना दर्शन देतात
19आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी, शिष्य एकत्र जमले असताना, व यहूदी पुढार्‍यांच्या भीतीने सर्व दारे आतून बंद केलेली असताना, येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो!” 20असे बोलल्यावर, त्यांनी आपले हात व आपली कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभुला पाहून शिष्यांना अतिशय आनंद झाला.
21पुन्हा येशू म्हणाले, “तुम्हाला शांती असो! जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो.” 22आणि येशूंनी त्यांच्यावर श्वास फुंकला व म्हटले, “पवित्र आत्मा स्वीकारा. 23तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्यांची क्षमा होईल; पण जर तुम्ही क्षमा केली नाही, तर त्यांची क्षमा होणार नाही.”
येशू थोमाला दर्शन देतात
24येशू आले त्यावेळी बारा पैकी एकजण दिदुम म्हणजे जुळा#20:24 अरेमिक मध्ये थोमा आणि ग्रीकमध्ये दिदुमस दोन्हीचा अर्थ जुळा असा होतो या नावाने ओळखला जाणारा थोमा तेथे शिष्यांबरोबर नव्हता. 25इतर शिष्य त्याला सांगू लागले, “आम्ही प्रभुला पाहिले!”
परंतु तो त्यांना म्हणाला, “त्यांच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून व जेथे खिळे ठोकले होते तेथे माझे बोट घातल्यावाचून आणि माझा हात त्यांच्या कुशीत घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.”
26एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना, थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!” 27नंतर त्यांनी थोमाला म्हटले, “तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो.”
28थोमाने म्हटले, “माझा प्रभू व माझा परमेश्वर!”
29मग येशूंनी त्याला म्हटले, “कारण तू मला पाहिले आहेस, म्हणून तू विश्वास ठेवतोस; परंतु न पाहता विश्वास ठेवणारे ते धन्य होत.”
योहान शुभवार्तेचा उद्देश
30येशूंनी अनेक चिन्हे आपल्या शिष्यांदेखत केली, ती या पुस्तकात कथन केलेली नाहीत. 31परंतु हे यासाठी नोंदले आहेत की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र आहे, व त्यांच्या नावावर विश्वास ठेवून तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभावे.

सध्या निवडलेले:

योहान 20: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन