YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 23

23
ढोंग्याविरुद्ध इशारा
1मग येशू लोकसमुदायाला आणि आपल्या शिष्यांना म्हणाले: 2“नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी मोशेच्या सिंहासनावर बसतात. 3त्यांच्या सांगण्याप्रमाणे करा, पण ते जे करतात ते आचरण करू नका, कारण ते सांगतात त्याप्रमाणे ते करीत नाहीत. 4ते जड, अवघड ओझी बांधतात व इतर लोकांच्या खांद्यावर लादतात, परंतु ती हालविण्यास स्वतःचे बोटही लावण्याची त्यांची इच्छा नसते.
5“जे काही ते करतात ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी असते: ते वचने लिहिलेल्या चामड्याच्या पट्ट्या लोकांना दिसाव्या म्हणून रुंद करतात, आणि आपल्या झग्यांचे गोंडे लांब करतात. 6मेजवान्यात मानाची स्थाने आणि सभागृहांमध्ये प्रमुख जागेवर बसणे, हे त्यांना प्रिय आहे. 7बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे आणि ‘रब्बी’#23:7 रब्बी म्हणजे गुरुजी संबोधने त्यांना कितीतरी प्रिय आहेत.
8“परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात. 9आणि या पृथ्वीवर कोणालाही ‘पिता’ म्हणून संबोधू नका, कारण तुम्हाला एकच पिता आहे व ते स्वर्गात आहे. 10‘शिक्षण देणारा’ असे स्वतःला म्हणवून घेऊ नका, कारण एकटे ख्रिस्त हेच एक तुमचे ‘मार्गदर्शक’ आहे. 11जो तुम्हामध्ये सर्वात मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे. 12कारण जे स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.
परूशी व नियमशास्त्र शिक्षकांवर सात अनर्थ
13“अहो परूश्यांनो, आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुम्हाला धिक्कार असो. कारण तुम्ही लोकांच्या तोंडावर स्वर्गाचे द्वार बंद करिता, आणि स्वतःही प्रवेश करीत नाही, ना जे प्रवेश करू इच्छितात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. 14ते देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना कडक शिक्षा होईल.#23:14 काही मूळप्रतींमध्ये हे वचन सापडत नाही, मार्क 12:40; लूक 20:47
15“अहो नियमशास्त्र शिक्षकांनो आणि परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला धिक्कार असो. एका माणसाचे परिवर्तन करण्याकरिता तुम्ही भूमार्गाने आणि जलमार्गाने प्रवास करता आणि जेव्हा त्याचे परिवर्तन होते, तेव्हा तुम्ही त्याला आपल्यापेक्षा दुप्पट प्रमाणात नरकपुत्र करून ठेवता.
16“आंधळ्या मार्गदर्शकांनो, तुमचा धिक्कार असो! ‘परमेश्वराच्या मंदिराची शपथ घेऊन तुम्ही म्हणता, मंदिराची शपथ मोडली तरी चालेल पण मंदिरातील सोन्याची घेतलेली शपथ कधीही मोडता कामा नये.’ 17अहो आंधळ्या मूर्खांनो! ते सोने श्रेष्ठ आहे की त्या सोन्याला पवित्र करणारे ते मंदिर श्रेष्ठ आहे? 18तुम्ही असेही म्हणता, ‘मंदिरातील वेदीची शपथ घेतली आणि ती मोडली तरी चालेल,’ पण वेदीवरील दानाची शपथ घेतली तर तो त्यास बंधनकारक आहे. 19अहो आंधळ्यांनो, ती देणगी श्रेष्ठ आहे की त्या देणगीला पवित्र करणारी वेदी श्रेष्ठ आहे? 20लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही वेदीची शपथ वाहता त्यावेळी वेदीबरोबर वेदीवरील सर्व वस्तुंचीही शपथ वाहता, 21आणि ज्यावेळी तुम्ही मंदिराची शपथ वाहता त्यावेळी मंदिराबरोबरच मंदिरात राहणार्‍या परमेश्वराचीही शपथ वाहता. 22ज्यावेळी तुम्ही स्वर्गाची शपथ वाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या सिंहासनाची आणि खुद्द परमेश्वराची शपथ वाहता.
23“तुम्हा परूश्यांचा व नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरे या मसाल्यांचा दशांश देता, परंतु न्याय, दया आणि विश्वासूपणा या अत्यंत महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. या गोष्टी तर तुम्ही कराव्‍यात, पण त्याचबरोबरच ज्या अधिक महत्वाच्या गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित करू नये. 24तुम्ही आंधळे मार्गदर्शक! तुम्ही एक चिलट गाळून काढता पण उंट गिळून टाकता.
25“तुम्हा परूश्यांचा आणि नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही आपली ताटवाटी बाहेरून घासून पुसून स्वच्छ करता पण अंतर्भाग लोभ आणि असंयम यांनी भरलेला आहे. 26आंधळ्या परूश्यांनो! पहिल्यांदा ताटवाटी आतून स्वच्छ करा म्हणजे ती बाहेरून देखील स्वच्छ होतील.
27“अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो; कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांप्रमाणे आहात. त्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आत मृतांच्या हाडांनी व सर्वप्रकारच्या अशुद्धतेने व दुष्कृत्याने भरलेल्या असतात. 28त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, पण आतून तुम्ही कबरांसारखे आहात, तुम्ही ढोंगाने आणि दुष्कृत्याने भरलेले आहात.
29“अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो. तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमानांच्या कबरा सजविता 30तुम्ही म्हणता, ‘आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात राहत असतो, तर संदेष्ट्यांचे रक्त सांडण्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर कधीही भाग घेतला नसता.’ 31पण असे बोलताना, तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता की तुम्ही संदेष्ट्यांचे खून पाडणार्‍या वाडवडिलांची संताने आहात. 32मग जा आणि जे तुमच्या पूर्वजांनी आरंभिले होते ते पूर्ण करा.
33“अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून आपली सुटका कशी कराल? 34यास्तव मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी आणि शिक्षक पाठवीत आहे. काहींचा तुम्ही वध कराल आणि क्रूसावर द्याल; काहींना सभागृहात फटके माराल आणि नगरोनगरी त्यांच्या पाठीस लागाल. 35नीतिमान हाबेलाच्या रक्तापासून मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये ज्याचा वध तुम्ही केला तो बरख्याचा पुत्र जखर्‍या याच्या रक्तापर्यंत, जे सर्व नीतिमान रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले त्याचा दोष तुम्हावर येईल. 36मी तुम्हाला सत्य सांगतो की, तो याच पिढीवर येईल.
37“हे यरुशलेमे, यरुशलेमे! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती. 38आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे. 39मी तुला सांगतो की, ‘प्रभुच्या नावाने येणार्‍याचे स्वागत असो, असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.’ ”#23:39 स्तोत्र 118:26

सध्या निवडलेले:

मत्तय 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन