मार्क 6
6
संदेष्ट्याचा अवमान
1येशू तेथून निघाले व शिष्यांसह स्वतःच्या गावी परतले. 2शब्बाथ आला, त्यावेळी त्यांनी तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि ज्या सर्वांनी त्यांचे शिक्षण ऐकले ते आश्चर्यचकित झाले.
त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे कोठून प्राप्त झाले? कशाप्रकारचे हे सज्ञान त्यांना देण्यात आले आहे? हा अद्भुत चमत्कारसुद्धा कसे करतो? 3हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ,#6:3 ग्रीक योसे ग्रीक, पर्यायी शब्द योसेफ शिमोन, यहूदा हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले.
4मग येशू त्यांना म्हणाले, “संदेष्ट्याचा मान होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर व नातेवाईक यांच्यात तो मान्यता पावत नाही.” 5काही आजार्यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तेथे त्यांनी काही चमत्कार केले नाहीत. 6त्यांचा अविश्वास पाहून त्यांना नवल वाटले.
येशू बारा शिष्यांना पाठवितात
मग येशू खेड्यापाड्यातून शिक्षण देत फिरले. 7त्यांनी बारा जणांना आपल्याकडे बोलावले आणि त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला.
8त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्या सोबत काहीही घेऊ नका, ना अन्न, ना झोळी, ना कमरपट्ट्यात पैसे. 9जोडे घाला, पण अतिरिक्त कपडे घेऊ नका. 10ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, त्यावेळी ते गाव सोडेपर्यंत तेथेच राहा. 11एखाद्या ठिकाणी तुमचे स्वागत झाले नाही किंवा तुमचे ऐकण्यास कोणी तयार झाले नाही, तर ते ठिकाण सोडून द्या व तुमच्या पायांची धूळ तेथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.”
12त्याप्रमाणे ते बाहेर पडले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा असा संदेश दिला. 13त्यांनी पुष्कळ भुते काढली, अनेक आजार्यांना तैलाभ्यंग केले आणि त्यांना बरे केले.
बाप्तिस्मा करणार्या योहानाचा शिरच्छेद
14हेरोद राजाने याबद्दल ऐकले, कारण येशूंचे नाव सर्वठिकाणी प्रसिद्ध झाले होते. काहीजण म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरणातून उठला आहे आणि म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसत आहे.”
15आणखी दुसरे म्हणाले, “हा एलीया आहे.”
तर आणखी काही लोकांनी असा दावा मांडला की, “तो प्राचीन संदेष्ट्यांसारखा एक संदेष्टा आहे.”
16परंतु हेरोदाने हे ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला, तोच पुनः जिवंत झाला आहे!”
17कारण हेरोदाने योहानाला बांधून तुरुंगात टाकण्यासाठी हुकूम दिला होता. हेरोदाने हे यासाठी केले की त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्याशी त्याने लग्न केले होते. 18कारण योहान हेरोदाला म्हणत असे, “आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिला तू ठेवावे हे कायद्याने अयोग्य आहे.” 19यामुळे हेरोदियाने योहानाविरुद्ध डाव धरला होता आणि ती योहानाचा जीव घेण्यास पाहत होती. परंतु ती काही करू शकत नव्हती, 20कारण हेरोद योहानाला भीत असे आणि तो नीतिमान व पवित्र मनुष्य आहे म्हणून त्याचे संरक्षण करत असे. हेरोद योहानाचे बोलणे ऐकून, गोंधळात पडत असे, तरी त्याचे ऐकून घ्यावयास त्याला आवडत असे.
21अखेर योग्य समय आला. हेरोदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दरबारातील मुख्य अधिकारी आणि लष्करातील सेनापती#6:21 सेनापती अर्थात् एक हजार सैनिकांवर अधिकारी तसेच गालील प्रांतातील प्रमुख नागरिक यांना मोठी मेजवानी दिली. 22त्या समारंभात हेरोदियेची कन्या आत आली व नृत्य करून तिने हेरोदाला संतुष्ट केले आणि त्याचबरोबर मेजवानीसाठी आलेल्या इतर पाहुणे मंडळीलाही खुश केले.
हेरोद राजाने मुलीला म्हटले, “तुला हवे असेल ते माग आणि ते मी तुला देईन.” 23शपथ घेऊन व वचन देऊन तो तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्याइतके जे काही तू मला मागशील, ते मी तुला देईन.”
24ती बाहेर गेली आणि आपल्या आईला विचारले, “मी काय मागू?” आईने सल्ला दिला,
“बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर माग.”
25घाईघाईने ती मुलगी राजाकडे परत आली आणि त्याला म्हणाली, “मला बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर तबकात घालून आता हवे आहे.”
26तेव्हा राजा अतिशय अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे तिला नकार देणे त्याला बरे वाटले नाही. 27शेवटी राजाने आपल्या एका शिरच्छेद करणार्याला तुरुंगात पाठवून योहानाचे शिर आणण्याची आज्ञा केली. त्या माणसाने योहानाचा तुरुंगात शिरच्छेद केला, 28आणि त्याचे शिर तबकात घालून त्या मुलीला दिले व तिने ते आपल्या आईला दिले. 29ही घटना ऐकल्यानंतर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि कबरेत ठेवले.
येशू पाच हजारांना अन्न देतात
30नंतर प्रेषित येशूंभोवती गोळा झाले आणि आपण काय केले व काय शिकविले यासंबंधीचा सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला. 31नंतर येशूंनी सुचविले, “तुम्ही माझ्याबरोबर या, आपण शांत ठिकाणी जाऊ आणि थोडा विसावा घेऊ.” कारण इतके लोक ये जा करीत होते की, त्यांना जेवण करण्यासाठी वेळ मिळाला नाही.
32त्याप्रमाणे होडीत बसून ते एकांतस्थळी गेले. 33अनेकांनी त्यांना जाताना पाहिले व त्यांना ओळखले. तेव्हा नगरातील लोक त्यांच्याकडे पायी आले आणि त्यांच्या अगोदर तेथे पोहोचले. 34जेव्हा येशू होडीतून उतरले आणि त्यांनी मोठा समुदाय लोटला आहे हे पाहिले तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. येशूंनी त्यांना पुष्कळ गोष्टी शिकविण्यास सुरुवात केली.
35दिवस मावळण्याच्या सुमारास, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, “ही ओसाड जागा आहे,” शिवाय “उशीरही होत चालला आहे. 36या लोकांना आसपासच्या खेड्यात आणि गावात जाऊन खाण्यासाठी अन्न विकत घ्यावे म्हणून निरोप द्या.”
37यावर येशू म्हणाले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”
त्यांनी विचारले, “इतक्या लोकांना जेवू घालावयाचे म्हणजे अर्ध्या वर्षाच्या मजुरी#6:37 अर्ध्या वर्षाच्या मजुरी मूळ दोनशे दिनार पेक्षा अधिक रक्कम खर्च करावी काय?”
38ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.”
त्यांना कळाले तेव्हा ते म्हणाले, “पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
39मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले. 40त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले. 41मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले. 42ते सर्वजण पोटभर जेवले व समाधान पावले, 43आणि शिष्यांनी जेवणानंतर उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या भरल्या. 44तेथे जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
येशू पाण्यावर चालतात
45लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पलीकडे असलेल्या बेथसैदा या ठिकाणी त्यांच्यापुढे जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. 46त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले.
47रात्र झाली, तेव्हा होडी सरोवराच्या मध्यावर गेली होती आणि ते एकटेच जमिनीवर होते. 48तेथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले, 49परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालत जाताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले, 50कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले.
पण तत्काळ येशू त्यांना म्हणाले, “धीर धरा, मी आहे! भिऊ नका.” 51मग ते होडीत चढले आणि वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले. 52कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती.
53ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तेथे लावली, 54ते होडीतून उतरले न उतरले तोच, लोकांनी येशूंना ओळखले; 55लोक त्या संपूर्ण परिसरात धावत गेले आणि आजारग्रस्त लोकांना अंथरुणावर घालून ते जेथे कोठे आहे असे त्यांनी ऐकले तेथे त्यांच्याकडे घेऊन गेले. 56आणि जेथे कुठेही येशू गेले—खेडयापाडयात, शहरांत—बाजारपेठेत लोक आजार्यांना घेऊन जात आणि तुमच्या झग्याच्या काठाला तरी स्पर्श करू द्या अशी त्यांना विनंती करत आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.
सध्या निवडलेले:
मार्क 6: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.