एस्तेर 2:5-8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
एस्तेर 2:5-8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश ह्या नावाचा एक बन्यामिनी यहूदी होता; बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यखन्या ह्याच्याबरोबर जे लोक यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यांच्यापैकी हा एक होता. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा उर्फ एस्तेर हिचे पालनपोषण केले होते; तिला आईबाप नव्हते; ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या; तेव्हा एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे ह्याच्या ताब्यात दिले.
एस्तेर 2:5-8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामीनाच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहूदी शूशन शहरात होता. तो याईराचा पुत्र आणि याईर शिमईचा पुत्र आणि शिमई कीश याचा पुत्र होता. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या याच्याबरोबर जे लोक पकडून नेले होते त्यांच्यामध्ये यालाही यरूशलेमेहून पकडून नेले होते. तो आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा, म्हणजे एस्तेर, हिची काळजी घेत असे. कारण तिला आईवडील नव्हते. मर्दखयाने तिला आपली स्वतःची कन्या मानून वाढवले होते. ती तरुण स्त्री सुंदर बांध्याची आणि अतिशय रुपवती होती. जेव्हा राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर, पुष्कळ मुलींना शूशन राजवाड्यात आणून हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता.
एस्तेर 2:5-8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शिमीचा पुत्र याईर, याचा पुत्र मर्दखय हा यहूदी मनुष्य शूशन राजवाड्यात कामास होता. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमातील यहूदीयाचा राजा यकोन्याह च्याबरोबर व इतर अनेकांना बाबेलला बंदिवासात नेले, तेव्हा मर्दखय यालाही पकडून नेले. मर्दखयाला एक चुलतबहीण होती, तिचे नाव हदस्साह होते, जिला त्याने वाढविले होते, कारण तिला आईवडील नव्हते. या तरुणीस एस्तेरही म्हणत असत, जी बांधेसूद व देखणी होती. एस्तेरचे आईवडील मरण पावल्यामुळे मर्दखयने तिला आपल्या कुटुंबात स्वतःच्या मुलीसारखे वाढविले होते. जेव्हा आता राजाची आज्ञा जाहीर करण्यात आली, तेव्हा अनेक तरुण कुमारिका शूशन राजवाड्यातील अंतःपुरात आणण्यात आल्या व हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आल्या. एस्तेरलाही राजवाड्यात आणून अंतःपुराचा अधिकारी हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आले.