यिर्मया 30:12-17
यिर्मया 30:12-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण परमेश्वर असे म्हणतो, तुझी जखम बरी न होऊ शकणारी आहे; तुझा घाय संसर्गजन्य आहे. तुझा वाद चालवणारा कोणीही नाही; तुझा घाय बरा करण्यासाठी कोणताही उपाय नाही. तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत, कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे, मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे. तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का ओरडतो? तुझ्या यातना बऱ्या न होऊ शकणाऱ्या आहेत. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे, तुझ्या असंख्य पापामुळे मी तुला या गोष्टी केल्या आहेत. म्हणून जे प्रत्येकजण तुला खाऊन टाकतील ते खाऊन टाकले जातील, आणि तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. कारण ज्या कोणी तुला लुटले त्यांची लूट होईल आणि तुला लुटणाऱ्या सर्वांना मी लुटीस देईन. कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही.
यिर्मया 30:12-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाव बरा होण्यापलिकडे आहे. तुझे समर्थन करण्यासाठी कोणीही नाही, तुझ्या दुखापतीवर काहीही इलाज नाही, तुला आरोग्य प्राप्त होणार नाही. तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत. तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला. “ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील. मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’
यिर्मया 30:12-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे. तुझी दाद लावणारा कोणी नाही; तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही. तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत; ते तुला विचारत नाहीत; तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झाल्यामुळे तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे. तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? तुझी जखम असाध्य आहे; तुझ्या घोर दुष्कर्मांमुळे तुझी पातके फार झाली आहेत; म्हणून मी तुला हे सर्व केले आहे. तुला ग्रासून टाकणार्या सर्वांना ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील; तुझे हरण करणार्यांचे हरण होईल, तुला लुटणार्या सर्वांना मी लुटवीन. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’