उत्पत्ती 6

6
मानवांची दुष्टाई
1नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांना कन्या झाल्या;
2तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.
3तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशे वीस वर्षांचा काळ देईन.”
4त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.
5पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले;
6म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.
7तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन; मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे.”
8परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती.
नोहा तारू बांधतो
9ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.
10नोहाला शेम, हाम व याफेथ असे तीन मुलगे झाले.
11त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.
12देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती.
13मग देव नोहाला म्हणाला, “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन.
14तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर; त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव.
15तारू करायचे ते असे : त्याची लांबी तीनशे हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात असावी.
16तारवाला उजेडासाठी खिडकी कर; तिचा माथा वरपासून एक हात असेल अशी कर; तारवाच्या एका बाजूला दार ठेव; त्याला खालचा; दुसरा व तिसरा असे मजले कर.
17पाहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल;
18तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो, तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना ह्यांना घेऊन तारवात जा.
19सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी दोन-दोन जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने.
20पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणार्‍या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणरक्षणार्थ तुझ्याकडे येतील.
21खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्याजवळ आणून त्याचा साठा कर; ते तुला व त्यांना खायला मिळेल.”
22नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.

Podkreślenie

Udostępnij

Kopiuj

None

Chcesz, aby twoje zakreślenia były zapisywane na wszystkich twoich urządzeniach? Zarejestruj się lub zaloguj