मत्तय 12

12
येशू हा साबाथचा प्रभू
1एका साबाथ दिवशी येशू शेतामधून जात होता, तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली, म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले. 2हे पाहून परुशी त्याला म्हणाले, “पाहा, साबाथ दिवशी जे मना केलेले आहे ते आपले शिष्य करत आहेत.”
3त्याने त्यांना म्हटले, “दावीदला व त्याच्याबरोबरच्या माणसांना जेव्हा भूक लागली, तेव्हा त्यांनी काय केले? 4म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर फक्त याजकांनी खाव्यात अशा समर्पित भाकरी त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय? 5किंवा याजक मंदिरात साबाथ दिवशी साबाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? 6मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असे काहीतरी येथे आहे. 7‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता, तर तुम्ही निर्दोष लोकांना दोष लावला नसता; 8कारण मनुष्याचा पुत्र साबाथचा प्रभू आहे.”
पक्षाघात झालेला मनुष्य
9नंतर येशू तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला. 10तेथे पक्षाघात झालेला एक मनुष्य होता. काही लोकांनी येशूला दोष लावता यावा म्हणून विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”
11तो त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, ज्याचे एकच मेंढरू असेल आणि साबाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? 12मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती जास्त आहे! म्हणून साबाथ दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे.” 13त्यानंतर येशूने त्या माणसाला म्हटले, “तुझा हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि तो बरा होऊन अगदी दुसऱ्या हातासारखा झाला.
येशूला ठार मारण्याचा कट
14परुश्यांनी मात्र बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली.
15पण हे ओळखून येशू तेथून निघून गेला. बरेच लोक त्याच्यामागे गेले. त्यांतील सर्व आजारी लोकांना त्याने बरे केले. 16“मला प्रकट करू नका”, असे त्याने त्यांना बजावून सांगितले. 17हे त्याने अशाकरता केले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे. ते असे:
18पाहा, हा माझा सेवक,
ह्याला मी निवडले आहे,
तो मला परमप्रिय आहे,
त्याच्याविषयी मी प्रसन्न आहे,
त्याच्यावर मी माझा आत्मा पाठवीन
व तो परराष्ट्रीयांना माझा न्याय कळवील.
19तो वाद घालणार नाही, ओरडणार नाही,
त्याचा आवाज रस्त्यावर कोणाला ऐकू
येणार नाही,
20चेपलेला बोरू तो मोडणार नाही,
मिणमिणती वात तो विझवणार नाही,
न्यायनिवाड्याचा विजय होईपर्यंत
तो असे करत राहील
21आणि परराष्ट्रीय त्याच्याकडे
आशेने पाहतील.
येशू आणि बालजबूल
22एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला. 23तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्‍चर्यचकित होऊन म्हणाला, “हा दावीदचा पुत्र असेल काय?”
24परंतु परुशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती बालजबूल त्याला साहाय्य करतो म्हणून भुते काढणे त्याला शक्य होते.”
25त्याने त्यांच्या मनातील विचार ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा कुटुंब टिकत नाही. 26सैतान सैतानाशीच लढत असेल तर त्याच्या राज्यात फूट पडली आहे. मग त्याचे राज्य कसे टिकणार? 27मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग तुम्ही चुकत आहात, हे तेच तुम्हांला दाखवून देतील! 28मात्र मी देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे, त्याअर्थी देवाचे राज्य तुमच्यासाठी आले आहे.
29किंवा बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.
30जो माझ्या बाजूचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकतो. 31म्हणून मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांबद्दल माणसांना क्षमा मिळेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे, त्याबद्दल क्षमा मिळणार नाही. 32मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल, तर त्याबद्दल त्याला क्षमा मिळेल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल, त्याबद्दल त्याला आताच्या किंवा येणाऱ्या युगातही क्षमा मिळणार नाही.
33झाड चांगले तर त्याचे फळ चांगले, झाड वाईट तर त्याचे फळ वाईट, असे म्हणतात; कारण झाड फळावरून ओळखले जाते. 34अहो सापांच्या पिल्‍लांनो, तुम्ही दुष्ट असता, तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? अंतःकरणात जे भरून उरले आहे तेच मुखावाटे निघणार. 35चांगला माणूस त्याच्या चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो आणि वाईट मनुष्य त्याच्या वाईट भांडारातून वाईट ते काढतो.
36मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक निरर्थक शब्दाचा हिशोब न्यायाच्या दिवशी सर्वांना द्यावा लागेल; 37कारण तुझ्या शब्दांवरून तुला दोषी किंवा निर्दोष घोषित केले जाईल.”
चिन्ह दाखविण्याबाबत येशूला विनंती
38तेव्हा शास्त्री व परुशी ह्यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, “गुरुवर्य, तुमच्याकडून चिन्ह पाहावे, अशी आमची इच्छा आहे.”
39येशूने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय तुम्हांला दुसरे चिन्ह मिळणार नाही. 40कारण जसा योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. 41निनवेचे लोक ह्या पिढीबरोबर न्यायकाळी उठून तुम्हांला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. 42दक्षिणेची राणी न्यायाच्या दिवशी ह्या पिढीबरोबर उठून तुम्हांला दोषी ठरवील; कारण ती शलमोनचे ज्ञान ऐकायला तिच्या देशातून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा कोणी येथे आहे.
अपुऱ्या सुधारणेपासून धोके
43अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो. परंतु तशी जागा त्याला मिळाली नाही 44तर तो म्हणतो, “ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन’ आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे, स्वच्छ व व्यवस्थित असे आढळते. 45नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपल्याबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे वस्ती करतात. अर्थात, त्या माणसाची दशा पूर्वीपेक्षा अधिक वाईट होते. तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.”
येशूची आई व भाऊ
46येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले होते. 47[तेव्हा कोणा एकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपल्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले आहेत.”]
48परंतु त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” 49आणि त्याच्या शिष्यांकडे हात करत तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ! 50जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”

Podkreślenie

Udostępnij

Kopiuj

None

Chcesz, aby twoje zakreślenia były zapisywane na wszystkich twoich urządzeniach? Zarejestruj się lub zaloguj