Logótipo YouVersion
Ícone de pesquisa

मार्क 16

16
येशूंचे पुनरुत्थान
1शब्बाथ संपल्यानंतर, मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी जाऊन येशूंच्या शरीराला अभिषेक करावा म्हणून सुगंधी मसाले विकत आणले. 2आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस, सूर्योदय झाल्यावर, त्या कबरेकडे जाण्यास निघाल्या. 3“आपल्यासाठी कबरेच्या द्वाराशी असलेली धोंड कोण बाजूला करील?” याविषयी त्या आपसात चर्चा करीत होत्या.
4त्यांनी वर पाहिले तो, तेव्हा ती धोंड जी अतिशय मोठी होती, ती प्रवेशद्वारातून बाजूला लोटलेली आहे, असे त्यांना दिसले. 5त्यांनी कबरेच्या आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला चमकदार पांढरी वस्त्रे परिधान केलेला एक तरुण तेथे बसला होता हे पाहून त्या भयभीत झाल्या.
6“भिऊ नका,” तो म्हणाला, “क्रूसावर खिळलेल्या ज्या नासरेथकर येशूंना तुम्ही शोधीत आहात. ते येथे नाहीत, ते पुन्हा उठले आहेत. त्यांना ठेविले होते ती जागा पाहा! 7पण जा, ही बातमी त्यांच्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांगा, ‘ते तुमच्या पुढे गालीलात जात आहेत. जसे त्यांनी तुम्हाला सांगितले होते तसे ते तेथे तुम्हाला भेटतील.’ ”
8त्या स्त्रिया कबरेपासून बाहेर निघाल्या आणि दूर पळाल्या, त्या भयभीत झाल्या होत्या व थरथर कापत होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या घाबरल्या होत्या.#16:8 काही प्रतींमध्ये वचन 8 आणि 9 खालीलप्रमाणे समाप्ती दिसते: त्यांनी लगेचच पेत्राच्या अवतीभोवती असणार्‍यांना बोध कळविले. यानंतर, येशूंने स्वतः त्यांच्यातून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जे अविनाशी व पवित्र असे तारण दिले आमेन. काही पूर्वीच्या व दुसर्‍या काही जुन्या प्रतींमध्ये वचन 9–20 दिसत नाही.
9येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे उठले. ते सर्वप्रथम मग्दालिया मरीयेला, ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती तिला प्रकट झाले. 10जे लोक येशूंबरोबर होते आणि जे शोक व विलाप करीत होते, त्यांच्याकडे जाऊन तिने हे वर्तमान त्यांना सांगितले. 11येशू जिवंत आहे आणि तिने त्यांना प्रत्यक्ष बघितले होते, हे जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही.
12नंतर त्याच दिवशी शहरातून चाललेल्या दोघांना येशूंनी वेगळया रुपात दर्शन दिले. 13ते परत आले व इतरांना अहवाल दिला, परंतु त्यांच्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नाही.
14नंतर, अकरा शिष्य जेवण करण्यास बसले असताना, ते त्यांना प्रकट झाले. ज्यांनी त्यांना मरणातून उठलेले पाहिले होते, त्यांच्या वार्तेवर त्यांनी विश्वास ठेविला नाही, म्हणून त्यांनी अविश्वास व हृदयाच्या कठीणपणा बद्दल त्यांचा निषेध केला.
15ते त्यांना म्हणाले, “सर्व सृष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला शुभवार्तेचा प्रचार करा. 16जे विश्वास ठेवतील आणि बाप्तिस्मा घेतील, त्यांचे तारण होईल. पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील, ते दंडास पात्र ठरतील. 17आणि विश्वास ठेवणार्‍याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील. 18ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्‍यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.”
19प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर, ते स्वर्गात वर घेतले गेले आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसले. 20मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.

Atualmente selecionado:

मार्क 16: MRCV

Destaque

Partilhar

Copiar

None

Quer salvar os seus destaques em todos os seus dispositivos? Faça o seu registo ou inicie sessão